सांप्रत काळी साहित्य संमेलन हा एक ‘इव्हेंट’ बनला असून तेथील अध्यक्ष हे करमणुकीचे साधन बनू लागले आहेत, अशी टीका होत असताना, त्यास पूरक असे वर्तन तरी होऊ नये, याची काळजी खरे तर श्रीपालराव सबनीस यांनी घ्यावयास हवी होती; परंतु संमेलनाध्यक्षपदाचे बिरुद गळ्यात पडल्यापासून अगदी रोजच्या रोज वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यामधून आपली छबी पाहण्याची सवय लागलेल्या सबनीस यांना संमेलन संपताच कसेनुसे होऊ लागले. संमेलनाचे सूप वाजले, तसे अध्यक्षपदाचेही होईल की काय, या घोर चिंतेत असतानाच श्रीपालरावांना अध्यक्षीय भाषणाच्या छपाईचा मुद्दा आठवला आणि ते पुन्हा सरसावून उभे राहिले. त्यांनी साहित्य महामंडळास थेट तंबी दिली की एक तर आपण लिहिलेले बहुमोल विचार तातडीने प्रसिद्ध करावेत, अन्यथा आपण सपत्नीक उपोषणास बसू. त्यामुळे महामंडळाचे पदाधिकारीही हडबडून जाणे स्वाभाविकच. ज्या महामंडळाच्या पुढाकाराने हे संमेलन आयोजित होते, त्यांच्याशीच कुरापत काढण्यामागे श्रीपालरावांच्या माध्यमांच्या ओढीचे कारण सांगितले जाते. संमेलनापूर्वीपासून रोज तडका मारून मसालेदार वक्तव्य करण्याची सवय लागल्यामुळे असेल कदाचित, पण काहीही करून या महामंडळास वठणीवर आणणे हे आद्यकर्तव्य वाटू लागल्याचेच हे लक्षण. संमेलनाचे उद्घाटन अगदी चोवीस तासांवर आले, तरीही अध्यक्षीय भाषणाचा पत्ता नसल्याने घाबरून गेलेल्या महामंडळाने अखेरच्या क्षणी हाती आलेल्या त्या अतिमहत्त्वाच्या दस्तावेजाचे मुद्रण करून मिळण्यासाठी बरीच खटपट केली म्हणे. श्रीपालरावांना ही अडचण येणार हे आधीपासूनच माहीत असल्याने त्यांनी आपल्या भाषणाचे मुद्रण करून घेतले होते आणि माध्यमांच्या हाती ते पडेल, अशी तजवीजही केली होती. आता त्यांचे म्हणणे असे, की एक तर आपले भाषण महामंडळाने प्रसिद्ध करावे किंवा आपणास मुद्रणाचा खर्च तरी द्यावा. त्यांचा हा कांगावा महामंडळाच्या धूर्त पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तत्परतेने हा विषय मार्च महिन्यात होणाऱ्या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर टाकून दिला. आता प्रजासत्ताक दिनापर्यंत हे भाषण छापून मिळणार नाही, हे जसे स्पष्ट झाले, तसेच अध्यक्षांनी केलेल्या खर्चाचा निर्णय महामंडळाच्या नव्या कार्यकारिणीला घ्यावा लागणार असल्याचेही उघड झाले. प्रजासत्ताक दिनी महामंडळाच्या कार्यालयासमोर आता श्रीपालरावांना सपत्नीक उपोषण करणे भाग पडणार आहे. असेही म्हणतात की, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही समोर मांडव टाकून प्रतिउपोषणाची तयारी सुरू केली आहे. प्रसिद्धीच मिळवायची, तर ती एकटय़ा सबनीसांनीच का म्हणून? आपणही त्याचे तेवढेच हकदार आहोत, असे त्यांचे म्हणणे. साहित्य संमेलन हे अशा रीतीने विनोद निर्मितीच्या अंतिम चरणांत पोहोचले असून माध्यमांना त्यामुळे आयतेच कोलीत मिळाले आहे.
सबनीसांचा कांगावा
संमेलन हा एक ‘इव्हेंट’ बनला असून तेथील अध्यक्ष हे करमणुकीचे साधन बनू लागले आहेत
Written by लोकसत्ता टीम
First published on: 25-01-2016 at 03:12 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy of shripal sabnis