शिमगोत्सवात रमणारे अस्सल कोकणी आहेत ते. सोंग करणे हे अंगी मुरलेले, कारण कलावंत दडलाय त्यांच्यात. आली दाटून ऊर्मी, केली त्यांनी नक्कल तर एवढ्या आकांडतांडवाची गरज काय? मागच्या वेळी ‘त्या’ बारा जणांना वर्षभरासाठी बाहेर काढले म्हणून त्याचा वचपा असा काढायचा? म्हणे, सभागृहाचा आखाडा केला… लोक माईक उखडून फेकतात, तो दंड की काय म्हणतात तो पळवतात, कागद फाडतात, घोषणा देतात, कधीकधी अपशब्द वापरतात. आखाडा तेव्हा होतो, नकलेने नाही एवढेही कळत नाही का तुम्हाला? तशीही नकलेची परंपरा ही प्राचीन कलाच. ती फुलताना त्याचा आस्वाद घ्यायचे सोडून कुजवण्याच्या मागे का लागता? एवीतेवी त्या सभागृहात विरंगुळ्याचे क्षण फार कमीच वाट्याला येतात. अशा वेळी साऱ्यांना हसवण्याच्या उदात्त हेतूने जगभरात लोकप्रिय ठरलेल्या कुणाची नक्कल होत असेल तर त्याकडे विनोदबुद्धीने बघायला हवे ना! ते करण्याचे सोडून अंगविक्षेपावर आक्षेप, नकलेतल्या वाक्यावर हरकती, अपमान खपवून घेणार नसल्याची भाषा हे जरा अतीच होतेय असे नाही वाटत? त्यापेक्षा नक्कल चुकली असेल, आवाज हुबेहूब काढता आला नसेल, हातवारे बरोबर केले नसतील तर खिलाडूवृत्तीने तसे समजावून सांगावे! जरा त्या लालू, मुलायमांकडे बघा. स्वत:ची नक्कल स्वत:च बघतात व खळखळून हसत करणाऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थापही देतात. आणि तुम्ही कलेला दाद द्यायचे सोडून थेट माफीचीच मागणी. एरवीही देशभरातल्या नकलाकारांवर सध्या संक्रांत आलीय. ती तुम्हीच आणली असा अनेकांचा वहीम. तिकडे त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळू द्यायचे नाही व इकडे कुणी हक्काचे व्यासपीठ वापरलेच तर पावित्र्यभंगाची भाषा करायची? बरे, ते सध्या ज्या पक्षात आहेत त्यांचा इतिहास तर नकलांना राजमान्यता देण्याचा. त्यांचे तेव्हाचे सर्वोच्च नेते जेव्हा व्यासपीठावरून ‘बाई’ची नक्कल करायचे तेव्हा दिलखुलास हसत दाद देणारे तुम्हीच होतात ना! मग आता एवढ्या संतापाची गरज काय? म्हणे, सभागृहाचा पावित्र्यभंग! विनोदाने नाही होत असला भंगबिंग काही. तो कशाने होतो हे तुम्हाला चांगले ठाऊक व त्यात हातभार लावणारे कोण हेसुद्धा! तसेही करोनामुळे सभांमधून बोलण्याची संधी आक्रसली. विनोदाची कळ आली तरी ‘लोकांना काय वाटेल’ म्हणून ती दाबून टाकावी लागते. अशा काळात जे सार्वभौम आहे अशा ठिकाणी ऊर्मीला वाट मोकळी करून दिली तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखे एवढे काय? ज्यांची नक्कल होते ते महनीय आणखी मोठे होतात असे म्हणतात. मग महतीला हातभार लावणाऱ्या या प्रकारावर आक्षेप कसला? एकाला संधी दिली तर सारेच नकला करू लागतील ही भीतीही अनाठायी हो! ही कला प्रत्येकालाच कशी जमणार? आणि तसेही गंभीरपणे घ्यावे असे शिल्लकच काय राहिले आजच्या काळात? त्यापेक्षा करू द्या की नकला. तेवढीच प्रसिद्धी मिळेल त्यांना. एरवीही ते याच एकत्र जमण्याची वाट बघत असतात दरवेळी. शेवटी माफी मागितली तरी गेले ना त्यांचे नाव देशभर. यातूनच श्रद्धास्थान अढळ होत जाते हे लक्षात घ्या व करा दुर्लक्ष. त्या नकलाकारांच्या घरी रात्री वीर दास, मुनव्वर फारुकी, कुणाल कामरा आभार मानायला गेले होते म्हणे! ते चौघे मिळून ‘विनोदाची खिचडी’ शिजवतात काय याकडे लक्ष ठेवा हवे तर. त्यातून विनोदाला राजाश्रय मिळाला तर तुमची आणखी पंचाईत व्हायची!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा