काय गरज होती त्या विनामुखपट्टी फिरणाऱ्या आमदार महोदयांवर कारवाई करण्याची? मंत्रालयातच फिरत होते ना! कारवाईकर्त्यांना माहीत नाही की काय, की मंत्रालय म्हणजे तर मुखवट्यांचे आगारच. येथे सारेच मुखवटेधारी. मुखपट्टीपेक्षा मुखवटा मोठा व जास्त संरक्षक असतो हे जाणून घेण्याचीही तसदी घेतली नाही त्यांनी दोनशेचा दंड करण्याआधी. बिचारे! नाहक बदनामी झाली त्यांची. अहो, इथे नियमित येणाऱ्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा वरकरणी स्वसामथ्र्य दर्शवणारा असला तरी आतून इतका पोलादी असतो की करोनाच नाही तर कोणताही विषाणू त्यातून प्रवेश करूच शकत नाही. फक्त पक्षांतराच्या विषाणूलाच आत जाण्याची सोय ठेवलेली असते म्हणे त्यात. तेही त्यांनी ठरवले तरच, अन्यथा प्रवेश नाही म्हणजे नाहीच. आता काहींना तो उद्दामपणाचा मुखवटा वाटतो त्याला काही इलाज नाही. नेत्यांनासुद्धा त्यांनी धारण केलेल्या मुखवट्याच्या मजबुतीविषयी खात्री असते. मग का म्हणून त्यांनी मुखपट्टी लावायची? या भव्य इमारतीच्या सहाही मजल्यांवरचे कोपरे न् कोपरे ठाऊक असलेले काहीजण लोकसेवकाचा मुखवटा लावून फिरत असतात. ते स्त्री, पुरुष असा भेदाभेद करत नाहीत. जे सत्तेत येतील त्यांच्या चरणी निष्ठा अर्पण अशीच त्याची प्रतिमा असते. ते येथे वावरून इतके सराईत झालेले असतात की प्रसंगी विषाणूलासुद्धा ते पटवू शकतील, की बाबा रे, माझ्या नाही, दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश कर! चपराशांपासून साहेबांपर्यंत ‘व्यवहार’ करून ते इतके मैत्रीवार्दी झालेले असतात की वेळ आली तर ते विषाणूशीसुद्धा मैत्री करू शकतात. आता एवढी पोहोच असलेल्या मुखवट्याने मुखपट्टी लावली काय आणि नाही काय? काय फरक पडणार? या इमारतीत बसणाऱ्या अधिकाऱ्यांची तर बातच और! शासनाने निर्माण केलेल्या योजनांचे प्रवाहक असे दर्शवणारा त्यांचा मुखवटा प्रत्यक्षात अनंत अडचणी निर्माण करण्यातही कुशल असतो. त्याला कायदे, नियम सांगण्याची इतकी सवय झालेली असते की प्रसंगी तो विषाणूलासुद्धा हे दोन फॉर्म भर व मगच कायाप्रवेश कर असे सांगेल. तसेही तो आपल्या कक्षात वर्दळीचे झेंगट फारसे लावून घेत नाही. त्यामुळे विषाणूही त्यांना घाबरून असतो म्हणे! वरिष्ठांच्या पावलावर पाऊल टाकत चालण्यात तरबेज असलेल्या सामान्य कर्मचाऱ्यांना तर मुखवटा धारण करण्याशिवाय काही पर्यायच नसतो. तो वरवर निरुपद्रवी भासणारा पण आतून समोरच्याला पूर्णपणे जोखणारा असतो. त्याचा साळसूदपणा बघून कशाला त्याच्या मागे लागायचे असा ग्रह विषाणूचासुद्धा होऊ शकतो. एवढे सगळे झाल्यावर मग उरतो कोण? तर मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणारा सामान्य माणूस. आता त्याला मुखवट्यांच्या वर्तुळात प्रवेश करायचा असेल तर स्वत:ही तो धारण करावाच लागणार ना! त्याशिवाय त्याला तिथे वावरताच येत नाही. ‘साहेब, होईल का माझे काम’ असे विचारणारा हा मुखवटा बरेचदा परिस्थितीशरण भासत असतो. व्यवस्थेतल्या विषाणूशी लढून त्याच्यात इतकी प्रतिकारशक्ती निर्माण झाली असते की इतर विषाणू त्याच्यापर्यंत जायला धजावत नाहीत. एव्हाना खरे तर विषाणूही शहाणे झाले असतील. जिथे शरीरात शिरण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात अशा मुखवट्यांच्या जगात ते कशाला वावरतील? तेव्हा जनकल्याणाचा वसा घेतलेल्या या स्थळी साध्या मुखपट्टीवरून कारवाई करण्याचे धाडस दाखवून मुखवट्याचा अपमान करू नये हीच अपेक्षा.
मुखपट्टीआडचे मुखवटे
तेही त्यांनी ठरवले तरच, अन्यथा प्रवेश नाही म्हणजे नाहीच
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-12-2021 at 00:19 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection without mask bjp mla action akp