माकडाच्या हातात कोलीत, चेव सुटणे असल्या म्हणी/ वाक्प्रचार फक्त भारतीय समाजासाठी थोडय़ाच आहेत? आम्ही सारे कमालीच्या शिस्तीत वाढलेले आहोत. बौद्धिकवर्गातील शिस्त ही सरकारच्या दुसऱ्या पाच वर्षांच्या कालावधीत समाजात येणारच, असा नेत्याचा समज होण्यात चूक ती काय? किती दाब असेल ना प्रेशरकुकर सारखा, घरात बसण्याचा. पाच वाजता शिट्टी वाजवून वाफ बाहेर काढा, असे म्हटले होते. पण आपल्याला दम कोठे निघतो? आता विषाणूची लक्षणे दिसण्याचा काळ १४ दिवसांचा आहे. पण मग तेवढे दिवस घरात बसायचे कसे, किती उद्योगी समाज आहोत आपण. सकाळी उठल्या-उठल्या गायछाप किंवा सूरजचा तोटा फोडून दोन्ही हातानी तंबाखू मळण्यापासून ते रात्रीच्या नारंगी रंगाच्या पाण्याची हौस करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची आपली तयारी असते. हो, आणि काही जण असतात शंख वाजवणारेसुद्धा. शंखामुळे विषाणू नष्ट होतात, असाही त्यांचा समज असतो.
हा समाज नेहमी पाठराखण करतो, भक्तासारखे वागतो. प्रत्येक इव्हेंटला दाद देतो. मग रात्री दीड वाजता चांद्रयानाचा असो किंवा आठ वाजताच्या नोटबंदीचा. प्रतिसाद देणे आणि टाळ्या वाजविणे चुकत नाही त्यांचे. करोनासाठी कटिबद्ध होत दिवसभर स्वत:ला कोंडून घेणारे दिवसभर कमालीचे गंभीर होते. किती काळजी दाटली होती घराघरात. सकाळी योगा, नंतर जेवण करून घरगुती गप्पा केल्यानंतर करोनाच्या विरुद्ध लढणाऱ्यांचे कौतुक करताना गरबा खेळला म्हणून कोणाच्या पोटात दुखत असेल तर दुखो. गर्दी करायची नाही, अशा सूचना आहेत. गरबा खेळताना, रबरी चेंडूवर गल्लीत क्रिकेटचा डाव खेळल्याने करोना कसा पसरला? किती उदात्त हेतूने टाळ्या वाजविल्या आपण! आपले प्राण वाचविण्यासाठी जिवाची पर्वा न करणारी डॉक्टर मंडळी, परिचारिका यांना प्रोत्साहन देण्यासाठी वाजवले चार फटाके, अंगविक्षेप करून केले नृत्य, तरी तुम्ही असे चिडू नका, उत्सवप्रियतेला इव्हेंटची जोड आहे. प्रसंग कोणताही असो, स्वप्रतिमा महत्त्वाची असते. माणसे भयाने ग्रस्त असताना आनंद मिळतो आहे ना, हे महत्त्वाचे.
गंगाआरतीचे कसे लखलखते दिवे लावले होते. गंगास्वच्छतेचे किती धडे गिरवले आपण! आता आपण खात्रीने सांगू शकू, गंगेत आता प्रदूषण होत नाही. तेव्हा किती अभिमानाने चरख्यावर सूत काततानाचे छायाचित्र प्रकाशित केले. खादी वापर वाढला. कापसाला चांगला भाव आला त्यामुळे! रोकड वापरणे बंद झाल्यानंतर अर्थव्यवस्थेची गणिते सुधारू लागली होती. आकडे न कळणारी माणसे ओरड करतात उगीचच.
तुम्ही बोचरे शब्द उगीच नका वापरू. टाळ्या वाजवा, घंटानाद करा, नाही तर थाळी वाजवा किंवा शंखनाद करा. उगाच चष्मा उलटा करून पाहता राव तुम्ही. बरं नाही हे वागणं! लढा किती गंभीर आहे, याचे भान ठेवा आणि थाळी वाजवा, नाही तर टाळी वाजवा…