ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड! तशी कुणा कुणाल वैद्य नामक तरुणाच्या आयुष्यात २०१३ पासून सुरू झालेली गुन्हे अन्वेषण शाखेचा तपास, पोलीस, न्यायालयातील खटला वगैरे कहाणी अखेर २०१९चा मार्च सरता सरता सुखान्त झाली. त्याने चष्मा ‘चोरला’ नाही, असेच न्यायालयाने गृहीत धरले. या तरुणाला चष्मा परत करायचा होता. तो त्याने टपालाद्वारे परत धाडण्याचा प्रयत्नही केला होता, पण टपालखात्याच्या कहाण्याच इतक्या लाखो, की त्यापैकी एखादी नाही सुफळ संपूर्ण होत. तसेच झाले. चष्मा परत मिळालाच नाही. मात्र, हा चष्मा परत मिळाला नसल्याचा आधारही कुणा तरुणाची निदरेष सुटका होण्यास पुरेसा ठरला, हे विशेष. खरे तर चष्म्याचे काय एवढे?
पण तो चष्मा होता गांधीजींचा. राष्ट्रपिता ठरण्याआधी, नव्या राष्ट्राची आखणी वध्र्याजवळच्या सेवाग्राम आश्रमात दहा वर्षे राहून गांधीजींनी केली, त्या काळातला. गांधीजींच्या अनेक वस्तूंसह चष्माही इथे जतन करून ठेवला होता. देश-विदेशातील बडय़ा-बडय़ा असामी या आश्रमात येत, साऱ्या वस्तू पाहत.. इथल्या ‘गेस्टबुका’त लिहिताना किंवा एखादे रोपटे लावताना फोटो काढवून घेत आणि निघून जात. त्या साऱ्या वस्तूंमध्ये चष्मा नाही, हेच सात महिन्यांनंतर लक्षात आले! एरवीही काही पाहायचे असेल, तेही नीट पाहायचे असेल, तरच चष्म्याची आठवण होते.. खरे की नाही? तसेच झाले इथे. गांधीजींच्या चष्म्यातून कुणी कधी काही पाहायचेच नाही, मग कशी आठवण राहणार त्या चष्म्याची? पण कुणाल वैद्यने हा चष्मा हाती घेऊन, त्यातून आरपार पाहण्याचा प्रयत्न केला होता म्हणतात. त्या गडबडीत तो त्याच्या हातातच राहिला आणि पुन्हा बापूकुटीत जाऊन तो ठेवणे काही कारणाने जमले नाही म्हणून टपालाने पाठवण्याचा विचार करावा लागला, ही गोष्ट २०१० सालची. पण २०१३ साली गांधीजींचा चष्मा गहाळ झाल्याचे गांभीर्य साऱ्यांनाच जाणवले. पुढले वर्षभर- २०१४ मध्ये – तपास सुरू होता; पण निवडणुकीच्या धामधुमीत त्या तपासाच्या बातम्या मागे पडल्या असतील.
आता मात्र, गांधीजींनी जो क्षमाशील न्याय केला असता, तोच झाला आहे. चष्माच तो, हरवायचाच! तेवढय़ासाठी देशातील तरुणांना का जबाबदार धरायचे? संबंधित न्यायालयाने केवळ कायदेशीर तरतुदींचा उचित अर्थ लावला असेल. ते योग्यच. पण तात्त्विक आणि तार्किक पातळीवरही किती थोर ठरतो हा न्याय.. आता गांधीजी नाहीत, त्यांची नजरही नाही, तेव्हा चष्मा असला काय नि नसला काय.. दोन्ही सारखेच. नजर असेल तरच चष्म्याचा उपयोग, खरे ना?
आणि हा नवा भारत आहे. नव्या भारतात गांधीजींचा चष्मा पाहण्यासाठी वध्र्याला, तिथून सेवाग्रामला जाण्याची गरजच काय? नोटानोटांवर असतो हल्ली गांधीजींचा चष्मा! नोटा कुणालाही मिळोत, कोणत्याही कारणासाठी मिळोत, टेबलावरून मिळोत, टेबलाखालून मिळोत की मिठाईच्या खोक्यातून मिळोत.. ज्याच्या हाती नोटा आहेत, त्या प्रत्येक देशवासीयाला गांधीजींचा चष्मा पाहायला मिळतोच! पण गांधीजींच्या त्या चष्म्याला आज काय दिसते? तो सध्या काय पाहतो, कोण जाणे.