भारताचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा अधिकार हा कोणासही नाही, हे जे ३१ टक्के भारतीयांचे मत आहे ते रास्तच आहे. परंतु आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे मोदी यांच्यावर समाजमाध्यमांतून तरी टीका केली जाते. अशा टीकाकारांना धडा शिकविण्यास येथील ट्वीटकरी समर्थ आहेत. परंतु अशा वादांमुळे मोदीजी यांना विकासाची स्वप्ने पाहण्यात नाहक अडथळे येतात. केरळमध्ये नेमके हेच घडले. मोदीजी तेथे प्रचारसभेस गेले होते. तसे ते अहोरात्र प्रचारसभाच घेत असतात. यावेळी केरळमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने ते तेथे जाऊन बोलले एवढेच. त्या सभेत त्यांनी केरळमधील विकासाचा प्रश्न उपस्थित केला. मोदीजी म्हणाले, की केरळमधील आदिवासींमधील बालमृत्यूचे प्रमाण सोमालियापेक्षाही भयंकर आहे. बरोबरच आहे ते. केरळमध्ये हे प्रमाण मुलांसाठी दरहजारी ५७ आणि मुलींचे दरहजारी ६४ आहे. सोमालियात ते १३७ आहे. आणि मोदीजींच्या गुजरातमध्ये ते ५९ आणि ६५ आहे. पण मोदीजींनी केरळात असताना काय गुजरातबद्दल बोलावे? ते केरळबद्दलच बोलले. त्यावरून केरळी जनतेच्या म्हणे भावना दुखावल्या व त्यांनी ट्विटरवर ‘#पो मोने मोदी’ असा ट्रेण्ड चालवला. पो मोने म्हणजे ग्राम्य भाषेत ‘रस्ता पकड’. अखेर या दुखावलेल्या भावनांवर मलमपट्टी करण्यासाठी प्रत्यक्ष भाजपाध्यक्षांना धावून जावे लागले. मलमपट्टीच्या पत्रकार परिषदेत शहाजींनी जनतेला आरसाच दाखविला. ‘आऊटलुक’ मासिकाचा एक जुना अंकच त्यांनी दाखविला. त्यावर केरळमधील कुपोषित बालकाचे चित्र होते. शहाजींच्या हातात कुपोषित बालकाचे चित्र हे चित्र कुणास अगदीच विनोदी वाटेल; परंतु ते गांभीर्याने म्हणाले, पाहा ही केरळची अवस्था. मोदीजी काय चुकीचे बोलले होते? आता त्यांना काय माहिती की मासिकावरचे ते चित्रच बनावट होते.. ते केरळातील नव्हे, तर श्रीलंकेतील कुपोषित बालकाचे होते? तर लोकांनी तेवढय़ावरून त्यांच्यावर टीका सुरू केली, की हे खोटारडेपणा करतात. आजकाल देशामध्ये अशा प्रकारे राईचा पर्वत करण्याची लोकांना खूप सवय लागली आहे. मोदीजी कुठे इतिहासात, भूगोलात, आकडेवारीत, फोटोशॉपमध्ये चूक करतात आणि आपण त्यांच्यावर केव्हा टीका करतो असे काही विरोधकांना आणि विकाऊ पत्रकारांना झालेले असते. हे बंद होण्याची आवश्यकता आहे. ‘आउटलुक’मधील छायाचित्र चुकीचे होते, पण त्यातील लेखाचे काय? तो तर बनावट नव्हता. केरळमध्ये कुपोषण आहेच. मोदीजी त्याबद्दल बोलले तर केरळी लोकांना एवढी मिरची लागण्याचे काहीच कारण नव्हते. महाराष्ट्र वा गुजरात वा मध्य प्रदेशात कुपोषण असल्याने उद्या ते या राज्यांतही सोमालियाहून भयंकर परिस्थिती आहे, असे म्हणू शकतात. ते म्हणाले नाहीत. कारण निवडणूक केरळमध्ये आहे. तेव्हा विकासाची स्वप्ने तेथे विकायची आहेत. त्यावरून एवढा हैदोस करण्याचे काहीच कारण नाही. यापुढे सर्व टीकाकारांनाच पो मोने म्हणण्याची आवश्यकता यामुळे अधोरेखित झाली आहे.
#पो मोने टीकाकार
मोदीजी म्हणाले, की केरळमधील आदिवासींमधील बालमृत्यूचे प्रमाण सोमालियापेक्षाही भयंकर आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-05-2016 at 04:00 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticism on narendra modi