‘दुपारची सवयीची वामकुक्षी टाळून येथे गेल्या तीन तासापासून जमलेल्या माझ्या बंधूंनो, गोदाकाठी वसलेल्या या पवित्र शहाराचे नाव भविष्यात बदनाम होऊ नये म्हणून आपण आज एकमताने या तीर्थस्थळी सर्वप्रकारच्या पूजेचे दर नव्याने निश्चित केले आहेत. साऱ्यांचेच पोट भरावे हीच उदात्त भावना ही दरनिश्चिती करताना दिसून आली हे कौतुकास्पदच. पूजा करणे हा धंदा नसून पवित्र व्यवसाय आहे यावरही साऱ्यांनी माना डोलावून प्रतिसाद दिला याचे मी पुरोहित मंडळाच्या वतीने स्वागत करतो. व्यवसाय म्हटले की स्पर्धा आलीच. मात्र ती निकोप हवी यावरही साऱ्यांनी शिक्कामोर्तब केले हे चांगलेच झाले. स्थळ एकच असले तरी आपण सारे वेगवेगळ्या ठिकाणी वसलेलो असल्याने येणाऱ्या यजमानासाठी रिक्षांप्रमाणे ‘नंबर सिस्टीम’ आपण लागू करू शकत नाही. येणाऱ्याला जो पटेल त्याच्याकडे तो जाईल. त्यात दु:ख वाटून घेण्याचे काही कारण नाही. राग तर अजिबात येऊ द्यायचा नाही. भांडण व मारामारी तर दूरची गोष्ट राहिली. तरीही सध्याचे स्पर्धेचे युग लक्षात घेऊन व यासंदर्भात साऱ्यांनीच आग्रह धरल्याने यजमानांसाठी वेगवेगळे पॅकेज जाहीर करण्याची मुभा तुम्हा साऱ्यांना देण्यात येत आहे, त्याचे फलकही तुम्हाला लावता येतील; मात्र त्यावर ठळक अक्षरात ‘पूजेचे दर सर्वत्र समान आहेत’ असे नमूद करावे लागेल. या पॅकेजचे वेगळे पैसे तुम्हाला आकारता येणार नाही. कुणाच्याही पोटावर पाय पडू नये म्हणूनच ही अट ठेवण्यात आली आहे. दरफलक तयार केल्यावर ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मंजूर करून घ्यावे लागतील. मान्यता मिळाल्यावरच ते तुमच्या आवासाच्या दर्शनी भागात टांगता येतील, शहरभर नाही. मला आशा आहे की तुम्ही सारेजण ही स्पर्धा निकोप राहील याची कसोशीने काळजी घ्याल. आता माझ्या या भाषणाचा हिंदी अनुवाद आपले उपाध्यक्ष कथन करतील व शेवटी मंत्राच्या गजरात सभा संपेल.’

दुसऱ्याच दिवशी तीर्थस्थळी मोजकेच असणाऱ्या सुतार व फलक रंगवणाऱ्यांचे काम वाढले. प्रत्येक पुरोहिताकडे पॅकेज काय द्यावे यावर खल सुरू झाला. मग हळूहळू एकेक फलक प्रत्येकाच्या आवासाबाहेर झळकू लागला. ‘पूजेच्या दरातच जेवणाची उत्तम सोय. रात्री फीस्ट दिली जाईल’, ‘विधीसोबतच राहण्याची स्वतंत्र व उत्तम सोय… आंघोळीसाठी गरम पाणी दिले जाईल’, ‘यजमानांसाठी वायफाय व नेटफ्लिक्सची सोय उपलब्ध’, ‘पूजेसह ब्रम्हगिरी पर्यटन, निवृत्तीनाथ समाधी दर्शन मोफत’, ‘उच्च दर्जाचे पांढरे पूजेसाठी कपडे पुरवले जातील. त्याचा कोणताही चार्ज नाही’, ‘कुशावर्तला डुबकी घेतल्यावर कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल’, ‘यजमान ज्या प्रदेशातून आलेले आहेत तेथील खाद्यसंस्कृतीचा (फक्त शाकाहारी) जेवणात समावेश’, ‘सकाळच्या पूजेनंतर दुपारच्या फावल्या वेळात आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी मोफत वाहन, फक्त चालकाचा खर्च करावा लागेल’, ‘पूजेसाठी एकाच वेळेस सर्व यजमानांसोबत बसण्याची इच्छा नसल्यास स्वतंत्रपणे बसण्याची सोय करून दिली जाईल. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. घरचे पाहुणे समजून यजमानांशी वर्तन केले जाईल’, ‘आमचे येथे पूजेच्या दरातच दक्षिणा समाविष्ट आहे’, ‘वृद्ध यजमानांना पायऱ्या चढण्याचा त्रास होऊ नये म्हणून मोफत पालखीची सोय उपलब्ध आहे’

 फलक लागल्यावर महिना शांततेत गेला. नंतर काहीजण गुपचूप पॅकेजचे पैसे घेऊ लागल्याच्या तक्रारी मंडळाकडे येऊ लागल्या. वाद वाढतोय हे लक्षात येताच पदाधिकाऱ्यांनी तातडीची सभा बोलावली पण कुणीही तिकडे फिरकले नाही.

Story img Loader