‘दुपारची सवयीची वामकुक्षी टाळून येथे गेल्या तीन तासापासून जमलेल्या माझ्या बंधूंनो, गोदाकाठी वसलेल्या या पवित्र शहाराचे नाव भविष्यात बदनाम होऊ नये म्हणून आपण आज एकमताने या तीर्थस्थळी सर्वप्रकारच्या पूजेचे दर नव्याने निश्चित केले आहेत. साऱ्यांचेच पोट भरावे हीच उदात्त भावना ही दरनिश्चिती करताना दिसून आली हे कौतुकास्पदच. पूजा करणे हा धंदा नसून पवित्र व्यवसाय आहे यावरही साऱ्यांनी माना डोलावून प्रतिसाद दिला याचे मी पुरोहित मंडळाच्या वतीने स्वागत करतो. व्यवसाय म्हटले की स्पर्धा आलीच. मात्र ती निकोप हवी यावरही साऱ्यांनी शिक्कामोर्तब केले हे चांगलेच झाले. स्थळ एकच असले तरी आपण सारे वेगवेगळ्या ठिकाणी वसलेलो असल्याने येणाऱ्या यजमानासाठी रिक्षांप्रमाणे ‘नंबर सिस्टीम’ आपण लागू करू शकत नाही. येणाऱ्याला जो पटेल त्याच्याकडे तो जाईल. त्यात दु:ख वाटून घेण्याचे काही कारण नाही. राग तर अजिबात येऊ द्यायचा नाही. भांडण व मारामारी तर दूरची गोष्ट राहिली. तरीही सध्याचे स्पर्धेचे युग लक्षात घेऊन व यासंदर्भात साऱ्यांनीच आग्रह धरल्याने यजमानांसाठी वेगवेगळे पॅकेज जाहीर करण्याची मुभा तुम्हा साऱ्यांना देण्यात येत आहे, त्याचे फलकही तुम्हाला लावता येतील; मात्र त्यावर ठळक अक्षरात ‘पूजेचे दर सर्वत्र समान आहेत’ असे नमूद करावे लागेल. या पॅकेजचे वेगळे पैसे तुम्हाला आकारता येणार नाही. कुणाच्याही पोटावर पाय पडू नये म्हणूनच ही अट ठेवण्यात आली आहे. दरफलक तयार केल्यावर ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मंजूर करून घ्यावे लागतील. मान्यता मिळाल्यावरच ते तुमच्या आवासाच्या दर्शनी भागात टांगता येतील, शहरभर नाही. मला आशा आहे की तुम्ही सारेजण ही स्पर्धा निकोप राहील याची कसोशीने काळजी घ्याल. आता माझ्या या भाषणाचा हिंदी अनुवाद आपले उपाध्यक्ष कथन करतील व शेवटी मंत्राच्या गजरात सभा संपेल.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा