सकाळ झाली. तात्या मसुरकरांनी दरवाजाला लटकावलेल्या पिशवीतून दुधाची पिशवी घरात नेऊन ठेवली आणि ते बाहेर आले. काल तुळशीचं लग्न लागल्यानंतर पोरग्यांनी फोडलेल्या फटाक्यांचा पसारा चाळीच्या ग्यालरीत तसाच पडला होता. तात्यांनी केरसुणी आणून दरवाजासमोरचा कचरा शेजाऱ्याच्या बाजूला ढकलला. दारावर टांगलेली उसाची कांडकी अलगद काढून आत नेऊन ठेवली. पाटावर डालडय़ाच्या डब्यातली तुळस खंगल्यागत मरगळली होती. तात्यांनी तुळशीचा डबा उचलला, ग्यालरीच्या लाकडी रेलिंगला नेहमीच्या जागी नव्या दोराने बांधला आणि डोळे मिटून तुळशीपुढे हात जोडले. ‘बाय माजे आयशी, आता पुढल्या वर्सापतुर हयसरंच सुखानं ऱ्हंव, आणि माझ्या घरादारा, मुलामान्सां, कुटुंबावर नजर ठेव, त्यांचो सांबाळ कर’.. मनातल्या मनात तुळशीच्या रोपटय़ासमोर प्रार्थना करताना नकळत तात्यांच्या घशात गावाकडच्या आठवणीनं आवंढा आला.. मुंबैला आल्यापास्नं कधीच दिवाळीची गावाकडची खेप चुकली नव्हती. थंडीचे दिवस सुरू झाले, की गावात रात्री दशावतारी नाटकाचे प्रयोग सुरू व्हायचे. रात्र जागवून पाहिलेल्या दशावतारी नाटकांचे ‘सीन’ तात्यांच्या नजरेसमोरून सरकू लागले. खानोलीच्या दशावतार नाटय़मंडळाचा ‘नरसिंह अवतार’, कवठीच्या दशावतारी मंडळाचे ‘सुदामा भेट’, मोचेमाडकराचा ‘दीनदुबळ्यांचा कैवारी’, आजगावकराचे ‘प्रल्हादपुत्र विरोचन’, तातू चेंदवणकराचे ‘तुळशीचे पान अमृतासमान’, आरोलकराचा ‘भक्तिमहिमा’, वालावलकराचे ‘मल्हारी मरतड’, वेंगुल्र्याच्या दशावतारी नाटय़मंडळाचा ‘ट्रिकसीन’वाला ‘संत चोखामेळा’चा प्रयोग, मामा मोचेमाडकराचा ‘दत्तमहिमा’, अशी किती तरी नाटके पाहताना लहानपणी रात्रीच्या वेळी केलेली वेगळ्याच दुनियेची सफर आठवून तात्यांच्या डोळ्यांतही पाणी आले. गावाकडच्या आठवणीने ते क्षणभर व्याकूळ झाले. तेवढय़ात पेपरवाला आला. तात्यांनी जड हातांनी पेपर घेतला, आणि घडी उलगडली. आतल्या पानावरच्या गावाकडच्या बातम्या अगोदर वाचायची त्यांची सवयच होती. तसंच झालं. नेमकी ‘तीच’ बातमी तात्यांना दिसली, आणि पुढची अक्षरं डोळ्यांच्या पाण्यात धूसर झाली. ‘आता संपलं ते आपल्या आठवणीतलं कोकण’.. तात्या स्वत:शीच म्हणाले, आणि त्यांनी सुस्कारा टाकला.. ‘रात्री दहानंतर दशावतारीचा आणि डब्बल बारीचा प्रयोग बंद करणार म्हणजे, कोकणातून दशावतारीचा गाशा गुंडाळायला लावायचाच प्रकार’.. तात्या स्वत:शीच पुटपुटले आणि खोलीत येऊन ते आरामखुर्चीत बसले. तेवढय़ात फोन वाजला. बालमित्राचा, बाळू आजगावकराचा फोन होता. पुन्हा लहानपणीच्या आठवणींची देवाणघेवाण झाली. बाळूनं तात्यांना तीच बातमी सांगितली. पुन्हा उभय बाजूंनी सुस्कारे झाले. तात्यांनी फोन ठेवला, आणि पेपरची घडी हातात घेतली. जोगेश्वरीच्या मैदानावर मालवणी जत्रोत्सवाची मोठी जाहिरात दिसली, आणि तात्या सुखावले. संध्याकाळी तिकडे चक्कर मारायची, कोंबडी-वडय़ाच्या स्टॉलवर हात मारायचा, आणि ‘रात्री घरातच सीडी प्लेयरवर ‘मोचेमाडकरा’च्या दशावतारीचा तो आवडता प्रयोग बघायचा.. एक, दोन कितीही वाजले तरी बघायचा.. बघू या कोण बंद करतो ते’.. तात्यांनी निर्धार केला, आणि पेपर गुंडाळून ते बाहेर ग्यालरीत आले. रेलिंगला बांधलेल्या डालडाच्या डब्यातली तुळसही टवटवीत झाली.. की असे तात्यांना वाटले?
दशावताराची दशा..
पाटावर डालडय़ाच्या डब्यातली तुळस खंगल्यागत मरगळली होती.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-11-2016 at 02:05 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dashavatar natak issue