आन्हिके आटोपून न्याहारीची प्रतीक्षा करत भगवान शंकर निवांत बसले होते. नंदी समोरच बसून मान हलवत होता. शंकरांनी काहीशा शंकेने नंदीकडे पाहिले, आणि धडपडत उठून नंदी बाहेर गेला. तो पुन्हा आला तेव्हा त्याच्या तोंडात एक वर्तमानपत्र होते. पुन्हा पुढचे दोन पाय मुडपून नंदीने वर्तमानपत्र शंकरासमोर ठेवले. भगवान शंकरांनी ते उघडले, आणि त्यांची नजर समोरच्या बातमीवर खिळली. त्यांच्या नजरेत काळजीचे भाव उमटले. त्यांनी स्वयंपाकघराकडे पाहत पार्वतीला हाक मारली. पार्वती बाहेर आली. शंकरांनी दाखविलेली ती बातमी पार्वतीने लांबूनच पाहिली, आणि तिनेही काळजीने शंकराकडे पाहिले. नंदीही गोंधळला. शंकरांनी शयनगृहाकडे नजर टाकली. गणपती अजूनही अंथरुणातच होता. ‘खरेच त्यांनी बाळास राष्ट्रदेव म्हणून जाहीर केले तर?’ पार्वतीचा प्रश्न ऐकून शंकरांनी डोळे मिटले. भविष्याचा वेध घेण्यासाठी सूक्ष्मदेहाने ते पृथ्वीवरच्या मराठी मुलुखात पोहोचले. ‘गणपतीला राष्ट्रदेव म्हणून जाहीर करा’, अशी मागणी रमेशभाई ओझा नामे कोणा आध्यात्मिक गुरूने पुण्यात केली, आणि लगोलग गणेशोत्सव मंडळांच्या तातडीच्या बैठका सुरू झाल्या. गल्लोगल्लीच्या राजाचा पुढच्या वर्षीचा उत्सव डबल दणक्यात साजरा करायचा, असा ठराव सर्वत्र संमत झाला. आता जो कुणी पाच हजाराच्या खाली वर्गणी देईल, त्याला सरळ इंगा दाखवायचा, असेही काहींनी सुचविले. राष्ट्रदेवाचा उत्सव दणक्यातच साजरा व्हायला हवा, यावर सर्व मंडळांचे एकमत झाले होते. तिकडे मंडळांनी हा ठराव केल्याचे पाहून डीजे, बँजो, ढोलताशा पथके, लेझीम पथके, बॅण्ड पथके खूश झाली. आता आवाजावर मर्यादा लादण्यास कोणीही धजावणार नाही, असेही एकाने सुचविले. ‘आवाज वाढव डीजे, तुला आईची शप्पत हाय’.. म्हणत एका डीजेप्रमुखाने उत्साहाने उडीच मारली. तिकडे सरकारी बैठका सुरू झाल्या होत्या.. उड्डाणपुलांची कामे रद्द करण्याची विनंती कुणी तरी केली, आणि सारे जण त्याकडे पाहू लागले. ‘आता राष्ट्रदेवाचा उत्सव म्हणजे, बाप्पाच्या मूर्तीची उंची आणखीनच वाढणार ना?’ त्याने चाचरतच मनातली शंका बोलून दाखविली. मग लगेचच ती सूचना मान्य झाली. इकडे मंडळांच्या बैठकांत मंडपांच्या उभारणीवर चर्चा सुरू होती. ‘आता रस्त्यावरचा कोपरा अपुरा पडेल.. संपूर्ण रस्त्यावरच मंडप उभारला पाहिजे. राष्ट्रदेवाचा उत्सव दणक्यात झाला पायजेल’.. कुठल्याशा राजाच्या उत्सव मंडळाने ठराव केल्याची बातमी पालिकेत पोहोचली, आणि तातडीची बैठक सुरू झाली. उत्सव मंडपांसाठी रस्ते राखून ठेवण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या. पुढच्या वर्षी उत्सवकाळात रुग्णालयांनी, प्रसूतिगृहांनी आणि आजारी, ज्येष्ठ नागरिकांनी आपापल्या जागा ‘साऊंडप्रूफ’ करून घ्याव्यात, असा फतवा काढण्याचेही ठरले, आणि राष्ट्रदेवाच्या उत्सवात कुठेही कमतरता नको, म्हणून भन्नाट आवाजांचे नवनवे फटाके बनविण्यासाठी चीनमधील कारखान्यांचा खल सुरू झाला..

..मिनिटभर डोळे मिटल्यावर जे काही दिसले, ते पाहून शंकरांना थकवा आला होता. त्यांनी पुन्हा शयनगृहाकडे पाहिले. गणपती अंथरुणावर डोळे चोळत मिस्कीलपणे त्यांच्याकडे पाहत हसत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजीचा लवलेशही दिसत नव्हता. ‘म्हणजे, असे काही होणार नाही तर!’.. पार्वती बाळाला कुरवाळत म्हणाली. नंदीने पुन्हा मुंडी हलविली, आणि सगळे जण न्याहारी करू लागले..

Story img Loader