अखेर तो अटळ दिवस उगवणार हे नक्की झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून यासाठी सरकारची धडपड सुरू होती. त्यासाठी केवढा खटाटोपही करण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येऊन मनोऱ्यात राहणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून इमारती भाडय़ाने घेण्यासाठी निविदा जारी करण्यात आल्या, तारांकित हॉटेलांमधील  खोल्या भाडय़ाने घेण्यावरही बराच खल झाला, तरीही आपल्या हक्काचा मनोरा सोडण्याची कुणाचीच तयारी नव्हती. किती तरी लोकप्रतिनिधींचे मतदारसंघांतील कार्यकर्ते कामानिमित्त किंवा ‘जिवाची मुंबई’ करण्यासाठी आल्यावर याच मनोऱ्याच्या छताखाली बाडबिस्तरा टाकून, जीव मुठीत धरून विसावले आणि मुंबईतून परतताना आठवणींच्या पुरचुंडीत मनोरादेखील जमा झाला. गेल्या तब्बल २२ वर्षांपासून गावाकडच्या मातीशी नाती जोडणारा हा मनोरा आता खिळखिळा होऊन डोलू लागला आहे. शेकडो कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या मनोऱ्याचा तोल २२ वर्षांतच ढळला आहे आणि तो पाडून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पण आमची सरकारला एक विनंती आहे. मनोरा मोकळा करा, पण तो पाडून टाकू नका. वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने देश-परदेशांतून आणि राज्याच्या कानाकोपऱ्यांतून असंख्य माणसे मुंबापुरीला भेट देत असतात. कामे झाली की मुंबई दर्शन हा त्यांचा एक हळवा विरंगुळाही असतो. ‘मलबार हिल’पासून ‘नॅशनल पार्क’पर्यंत आणि ‘सागरी सेतू’पासून ‘फ्री वे’पर्यंत सगळीकडे फेरफटका होतो. शेकडो वर्षांपासून ताठ मानेने उभ्या असलेल्या व वास्तुकलेचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या ब्रिटिशकालीन इमारती त्याला भुरळ घालतात. यामुळे मुंबई हे केवळ आर्थिक राजधानीच नव्हे, तर एक पर्यटनस्थळही बनले आहे. गेल्या अनेक वर्षांत या यादीत फारशी भर पडलेली नाही. त्यामुळे, मनोरा जमीनदोस्त न करता केवळ रिकामा करून पर्यटकांसाठी खुला करावा, असे सरकारला जनतेने सुचविले पाहिजे. शेकडो वर्षांपासून ताठपणे उभ्या असलेल्या इमारतींच्या गर्दीत, जेमतेम २२ वर्षांतच झुकलेला मनोरा हा सरकारी वास्तुकलेचा नमुना म्हणून इतिहासात नोंदला गेला पाहिजे, यासाठीही प्रयत्न करण्याचे सरकारला सुचविले पाहिजे. महाराष्ट्रातील हा झुकता मनोरा जेमतेम २२ वर्षांतच इटलीतील पिसाच्या मनोऱ्याशी बरोबरी करू पाहत असेल, तर त्याचा अभिमान वाटला पाहिजे. म्हणून ही वास्तू जमीनदोस्त न करता, ‘महाराष्ट्रातील पिसाचा मनोरा’ या नावाने इतिहासप्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न केले जावेत. पिसाच्या मनोऱ्यास आठशे वर्षांचा इतिहास आहे. आमच्या मनोऱ्याने तो इतिहास २२ वर्षांतच घडविला, ही याची आणखी एक अभिमानास्पद बाजू! सातत्याने झुकत चाललेला पिसाचा मनोरा अठरा वर्षांपूर्वी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. आणखी दोनशे वर्षे त्यास धोका नाही, असे सांगण्यात येते. मुंबईतील मनोराही पिसासारखा नाजूक झालेला आहे. त्यामुळे त्यामध्ये पर्यटकांना प्रवेश देणे धोक्याचे असेल, तर लांबून पाहण्यासाठी तरी तो खुला ठेवावा. पिसाच्या मनोऱ्यावरून गॅलिलिओने गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताचे प्रयोग केले होते. कदाचित, नव्या युगाचा आणखी एखादा गॅलिलिओ, आपल्या या मनोऱ्याची मदत घेऊन गुरुत्वाकर्षणाचा एखादा नवा सिद्धान्त मांडू शकेल! त्यामुळे हा झुकता मनोरा जपला पाहिजे.. इतिहास घडविण्यासाठी मोठा काळ जावा लागतो असे नाही. कमीत कमी कालावधीतही इतिहास घडविता येतो, याचे ते भविष्यातील मूर्तिमंत उदाहरण ठरेल, यात शंका नाही.

Story img Loader