‘निश्चलनीकृत’ अर्थव्यवस्थेत माणसांची काय अवस्था होते, त्याचे वास्तव दर्शन घडविणारी एक चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालतेय. ती पाहिली तर माकडांना बोलता येत नाही तेच बरे आणि आपल्यासारख्या बोलक्यांनाही माकडासारखाच ‘एक धागा’ कमी असता तर बरेच झाले असते, असे दोन्हीही विचार मनात येऊ शकतात. एका बंद गाडीतील केळ्याचा घड काचेतून पाहता येतोय, भुकेली माकडे त्याकडे पाहात मिटक्याही मारत आहेत, पण दोहोंच्या मध्ये पारदर्शक काच असूनही, केळ्याचा घड मिळविण्यासाठी माकडांची केविलवाणी धडपड सुरू आहे, असा सध्याच्या ‘निर्थ’क स्थितीचे वास्तव दर्शन घडविणारा तो व्हिडीओ पाहताना, बोलता येत नसतानादेखील हावभावातून आणि हालचालीतून नेमकी अवस्था व्यक्त करण्याची माकडाची हातोटी प्रामाणिक आणि पारदर्शक वाटते. तशी अवस्था साधणे माणसासाठी कठीणच. कारण, मन!.. माणूस आणि माकड यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. त्यापैकी एक फरक म्हणजे, वाचा! माणसाला बोलता येते, हे त्याचे त्याच्या पूर्वजापासूनचे वेगळेपण आहे. माकडांच्या आणि माणसाच्या स्वरयंत्ररचना सारख्याच असतात, असे आता संशोधनानंतर सिद्ध झाले असले तरी स्वरयंत्राचा मेंदूला जोडणारा एक धागा फक्त माणसालाच मिळालेला आहे. माकडे आणि माणसे उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यात हातात हात घालून वर्तमानकाळात पोहोचली असली, तरी सारीच माकडे अजूनही माणसे झालेली नाहीत. आजही, माणसाच्या मेंदूच्या उत्क्रांतीचे वारे त्याच्या मनाला शिवलेले नाही. म्हणूनच, मनात जे असते, ते कृतीने दाखविण्याचा पारदर्शकपणा माकडाकडे असतो, तर ‘मनातली बात’ कृतीपासून लपविण्याचे कसब माणसाला प्राप्त झालेले असते. डार्विन नावाच्या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीच्या सिद्धांताची उकल केली, तरीही मनुष्यगणाचा हा पूर्वज बोलू का शकत नाही, हा प्रश्न काल-परवापर्यंत माणसाला छळतच होता. त्याचे उत्तर आता मिळाले आहे. माकडालाही माणसासारखेच स्वरयंत्र असल्याने, ते मेंदूला जोडणारा धागा तयार झाल्यास माकडालाही वाचासिद्धीची समान संधी मिळू शकते, असा निष्कर्ष एका संशोधनातून निघाला आहे. उत्क्रांतीवादाच्या नियमानुसार, आज ना उद्या माकडेदेखील माणसासारखे बोलू शकतील, हे नक्की आहे. तसे झाले तर पूर्वजगणाशी संवाद साधण्याची संधी माणसाला मिळेल आणि अनुभवांची देवाणघेवाणही करता येईल. पण हे लगेचच झाले असते, तर काचेपलीकडचा केळ्याचा घड पाहताना भुकेल्या मनात काय विचार येत होते, ते जाणून घेता आले असते. पण माणसाची ती संधी सध्या तरी हुकली आहे. माकडांना माणसासारखे बोलता येईल, तेव्हाची परिस्थिती काय असेल ते आज आपण सांगू शकत नाही!