तुम्हाला आठवतंय? मागे एकदा, विकास वेडा झाल्याची चर्चा होती. पण आता अचानकच सारे जण त्याला विसरले. विकासाला वेड लागले, की विकास शहाणा होतोय, तो सुधारतोय की बिघडतोय, याकडे लक्ष द्यायला आता कुणालाच वेळ नाही. उलट, विकासाचे काय झाले याच्याशी जनतेला देणे-घेणे नाही असाच सगळ्यांचा समज आहे. जनतेला नेमके काय हवे आहे हे आपणच ठरवायचे, त्याची उत्तरे आपणच तयार करायची, आणि तीच उत्तरे जनतेच्या माथी मारायची. वर, जनता मूर्ख नाही असे म्हणत, जनतेच्या भावना कुरवाळत, आपण ठरविलेली उत्तरे जनतेच्या मनात ठासून कोंबण्यासाठी काहींना कामाला लावायचे..
विकास वेडा झाला किंवा शहाणाच राहिला, याचा फारसा परिणाम होत नाही हे लक्षात येताच, आता नवे काय शोधायचे यासाठी साऱ्यांनी आपापल्या बुद्धिभेदमंतांचे तांडे कामाला लावले. तिकडून मणिशंकर तर इकडून साक्षी महाराज, कधी तिकडून सी. पी. जोशी तर इकडून बिप्लव देव, तिकडून राज बब्बर तर इकडून कुणी साध्वी, अशी एकास एक, तोडीस तोड बुद्धिभेदकांची स्पर्धा सुरू झाली. निवडीच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्ये उतरलेले सारे जण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून त्यांना स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीसाठी मदानात उतरविण्यात आले आहे. असे काही झाले, की असेच गुण अंगी असलेल्या इतरांची रुखरुख वाढते. आपल्याकडेही एकाहून एक सरस कल्पनांचे भांडार असताना आपली वर्णी लागत नसेल तर खंत वाटणारच ना?
..काँग्रेसकडे एकटे दिग्विजय सिंह होते, तेव्हा, अशीच गुणसंपदा स्वतच्या अंगी यावी यासाठी अन्य काही नेत्यांनी प्रयत्न केले, त्यात त्यांना यशही आले. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर गांधी घराण्याचा एकतर्फी उद्धार होणार नाही, याची खात्रीच पटली! आता दोन्हीकडील फळ्या एकमेकांसमोर तयारीनिशी उतरल्या आहेत. काँग्रेसचे सी. पी. जोशी यांनी मोदींची जात काढली, तर रुपयाच्या किमतीवरून बब्बर यांना मोदींच्या आईचे वय आठवले. मग, त्याचा परिणाम दिसू लागला हे जाणवताच काँग्रेसचे विलास मुत्तेमवार जागे झाले. गेल्या काही वर्षांपासून मुत्तेमवारदेखील विकासाच्या मुद्दय़ासारखेच विस्मरणात गेले होते. जात आणि आईच्या मुद्दय़ावरून एवढी प्रसिद्धी मिळत असेल, तर बापाचा मुद्दा याहून प्रभावी ठरेल हे त्यांनी ताडले असावे.. मुत्तेमवारांचा अंदाज खरा ठरला. त्यांनी नवा धुरळा उडवून दिला, आणि त्या धुरळ्यातूनच मुत्तेमवार हे नव्या बुद्धिभेदकाच्या रूपाने उदयास आले.
आई-बाप आणि राजकारण हे समीकरण मंदिर-मशिदीच्या वादापेक्षाही प्रभावी ठरणार असेल, तर आगामी निवडणुकीच्या मदानात उभय पक्षीयांच्या या बुद्धिभेदमंतांचे महत्त्व वाढेल, अशी चिन्हे आहेत. आता या फळ्यांच्या नेतृत्वासाठी स्पर्धा लागेल, तेव्हा याहूनही भेदक मुक्ताफळांची उधळण सुरू होईल, आणि विकासाचे काय झाले हा मुद्दा कायमचाच पुसला जाईल. आपण ठरवू तो निवडणुकीचा मुद्दा असा समज असलेल्या या विद्वानांच्या फौजांमध्ये नवी भरती सुरू झाली आहे!