झोपाळ्यावर झुलत वर्तमानपत्र वाचताना अचानक तात्यांनी पेपर बाजूला ठेवला, आणि कपाळावर हात मारून एक लांब सुस्कारा सोडला. डावा हात पाठीवर घेऊन ओणव्याने अंगणाचा कचरा काढणाऱ्या बाबल्याला हे दिसताच त्याने स्वच्छता अभियान बाजूला ठेवले, ‘काय झालां तात्यानूं?’ त्याने चिंतातुर चेहऱ्याने विचारले, आणि तात्या करवादले. ‘आजपासून मला तात्या म्हणायचं नाही. सांगून ठेवतो’.. बाबल्या आणखीनच चक्रावला. ‘त्या ट्रम्पला आपल्याकडे सगळे तात्या म्हणतात. त्यानं तिकडं मुक्ताफळं तोडलान, म्हणून मी आजपासून तात्या या नावाचा त्याग करत आहे..’ स्वत:शीच बोलत तात्यांनी पानाचा डबा समोर ओढून अडकित्त्यात सुपारी पकडली, आणि लांबवर कुठे तरी नजर लावून तात्या बोलू लागले.. ‘मोठय़ा लोकांना प्रखर तपश्चर्येच्या बळावर लोकांकडून पदव्या मिळण्याचा तो काळ वेगळाच होता. म्हणून टिळक लोकमान्य झाले, आणि फडके  ‘आद्यक्रांतिकारक’ ठरले. त्यांना त्यांच्या त्यागातून या पदव्या मिळाल्या होत्या रे.. क्रांतिवीर, लोकशाहीर, कर्मवीर, अशा अनेक पदव्या त्या माणसांमुळे मोठय़ा झाल्या.. गांधीजी महात्मा उगाच नाही झाले रे.. बापू ते महात्मा हा त्यांचा प्रवास म्हणजे, त्यागाचं आणि सत्याचं प्रतीक. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यावर त्यांनी भारतभ्रमण केले, स्वातंत्र्यलढय़ात झोकून दिले, आणि जनतेने त्यांना महात्मा ठरविले. ते राष्ट्रपिता झाले, कारण त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाला दिशा दिली.. त्यांची अहिंसा चळवळ, सत्याचे प्रयोग, असहकार आंदोलन अशा देशव्यापी चळवळीने ब्रिटिश साम्राज्य हादरले होते’.. अडकित्त्यात काडकन सुपारी मोडून तात्यांनी बाबल्याकडे बघितले. तो अचंबित होऊन तात्यांच्या तोंडाकडे पाहत होता. ‘आता कशातच काय ऱ्हायलं नाय रे.. पदव्या तर काय, खिरापतीगत झाल्यात. पैसा टाकला की विकत मिळतात’.. तात्यांचा सूर निराश झाला होता. ‘आता कुणीही उठतंय .. दोन-चार बॅनर, पोष्टर, फ्लेक्स लावले, चमच्यांचा घोळका जमवला, ‘हम तुम्हारे साथ है’ बोलणाऱ्यांची फौज मागे जमवली, की कार्यसम्राट होतंय’.. तात्या असे म्हणाले, आणि बाबल्याला गावातल्या सरपंचाच्या पोराने कुत्र्याच्या वाढदिवसाला लावलेला फ्लेक्स आठवला. ‘तात्या, सरपंचाच्या पोरग्यान पन लावला व्हता तां काय तां ब्यानर’.. तो भोळसट हसत बोलला, आणि तात्यांनी सुपारी तोंडात टाकली.. ‘असंच असतंय रे बाबल्या.. त्या ट्रम्पतात्यानं तेच तर केलान.. म्हणून म्हणतो, आजपासून मला तात्या म्हणायचं नाही.. अरे बाबल्या, मला सांग, पिता म्हणजे कोण?’.. बाबल्या गांगरला.. ‘अरे, पिता म्हणजे वडील.. आपले राष्ट्र म्हणजे, भारतमाता, आणि बापू म्हणजे, राष्ट्रपिता.. होय की नाही?’.. बाबल्याने मान डोलावली.. ‘मग दुसरा पिता कसा रे असेल?’ .. ‘बाबल्या, सध्या ‘एक राष्ट्र – एक भाषा’, ‘एक राष्ट्र – एक पहचान’ अशा मोहिमा सुरू आहेत. मग, ‘एक राष्ट्र, दोन दोन पिता’ असे कसे रे चालणार?’.. बाबल्याने पुन्हा मान डोलावली, आणि गुडघ्याला हाताचा आधार देत उठून त्याने पुन्हा ‘स्वच्छ भारत’ मोहिमेनुसार अंगणाचा कचरा काढावयास सुरुवात केली. ‘बरोबर हाय तात्यानूं तुमचं’.. बाबल्या म्हणाला. तात्या गरजले.. ‘बाबल्या, मला तात्या म्हणायचं नाही.. सांगून ठेवतोय!..’

Story img Loader