महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर राष्ट्रीय राजकारणात उतरण्यासाठी शड्डू ठोकले. मुंबईच्या सोमय्या मैदानातील युवा महासंगम मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी याची चुणूकही दाखविली. देशात लोकसभेच्या निवडणुकांचे वारे तर कधीपासूनच वाहू लागले होते. ते तापविण्याची स्पर्धा आता सुरू होईल. मग आग धुमसू लागेल. त्यामध्ये तेल ओतण्याचे कर्तव्य काही नेत्यांना बजावावे लागेल. अशी जबाबदारी स्वतहून शिरावर घ्यायची असते. तिकडे राष्ट्रीय पातळीवर अनेक सर्वपक्षीय आणि ख्यातनाम दिग्गज तेलाचे बुधले घेऊन बसलेले असताना, पहिल्याच उडीत त्यांच्या रांगेत जाऊन बसण्याचा मान मुख्यमंत्र्यांनी सोमय्या मैदानावरील गर्जनेतून मिळविला. महाराष्ट्राच्या राजकारणास एक संस्कृती आहे, असे सगळेच सांगतात. प्रत्यक्षात ही संस्कृती तशी अदृश्यच. त्यातच, निवडणुका आणि राजकीय संस्कृती यांचा थेट संबंध नसतो. सोमय्या मैदानावर मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या राष्ट्रीय आखाडय़ातील धुरळ्याची राळ उडवून दिली, आणि या संस्कृतीने पुन्हा एकदा दडी मारली. आता निवडणुकीची सारी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही संस्कृती आपली मान वर काढणार नाही, याबद्दल कोणाच्याही मनात कोणतीच शंका उरलेली नसेल. त्यामुळे साहजिकच, सामान्य मतदाराच्या मनात मात्र काही शंकांचा उगम होऊ शकतो. पण यातही काही नवे नाही. प्रत्येक निवडणुकीच्या काळात सामान्य माणसाच्या मनातील या शंका नेहमीच डोकी वर काढत असतात. त्यापैकी पहिली शंका म्हणजे, राजकारणाचा माणसाशी काही संबंध आहे की नाही?.. आजवरच्या असंख्य निवडणुकांच्या काळात, अनेक नेत्यांनी प्रचाराच्या रणभूमीवर घोडे, गाढवे, साप, उंदीर, कोल्हे, बैल, रेडे आदी प्राण्यांना मनसोक्त नाचविले, तेव्हाही सामान्य माणसाच्या मनातील या शंकेने आश्चर्याने ‘आ’ वासला होताच! परस्परांवर चिखलफेक केली की मूळ मुद्दे बाजूला राहतात, ज्यांवर चर्चा घडविली पाहिजे, ज्या मुद्दय़ांशी मतदार म्हणून सामान्य माणसाचे थेट नाते असते त्या मुद्दय़ांची मूठ झाकलेली राहते आणि राजकारणाच्या रणातील उंदीर-मांजरांचा, साप-मुंगुसांचा खेळ न्याहाळताना मूळ मुद्दय़ांचा विसर कधी पडला ते मतदारास लक्षातही येत नाही. निवडणुकीच्या राष्ट्रीय राजकारणातील ही ग्यानबाची मेख मुख्यमंत्र्यांनी बरोबर ओळखली हे त्यांच्या रविवारच्या भाषणावरून सहज लक्षात येते. शिवाय, थेट मोदी विरोधकांनाच अंगावर घेऊन ‘हम भी कुछ कम नही’ हेही त्यांनी दाखवून दिले. राजकारण ही कधीकधी एखादी सर्कस असते, तर कधी जंगल असते. सर्कस असो, वा जंगल.. श्वापदांच्या अस्तित्वाखेरीज त्यांची ओळख पुरती होतच नसते. फडणवीस यांनी निवडणुकीच्या राजकारणास जंगलाची उपमा दिल्यावर त्यामध्ये वावरणाऱ्या प्राण्यांचा उल्लेख केला नसता, तर भाषण अपुरे ठरले असते. या जंगलात एकटे मोदी हेच वाघ आहेत, सारे विरोधक, कुत्री, मांजरे, कोल्हे, चोर आहेत. आणि वाघाच्या जबडय़ात हात घालून त्याचे दात मोजणाऱ्यांची जात आता प्रत्यक्ष जंगलात उतरली आहे. एका घनघोर जंगलात फसल्याचा भास आता मतदारास होऊ लागला, तर त्यात आश्चर्य नाही.  तेव्हा आता पुढचे काही दिवस पदोपदी अशी श्वापदे समोर येणार, याची खूणगाठ लोकांनी बांधलेली बरी.

Story img Loader