चार राज्यांच्या मतदानोत्तर कलचाचणीमुळे भाजपच्या तळपत्या सत्तासूर्यावर काहीसे शंकेचे मळभ दाटलेले असतानाच महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत भरलेल्या अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनात पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणूक निकालाची भाकिते उघड होणे हा निव्वळ योगायोग मानला तर तो ज्योतिषविद्येचा घोर उपमर्द ठरेल. मुळात, ज्योतिष ही नभांगणीच्या ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून भविष्यकालाचा वेध घेणारी विद्या असल्याने योगायोगासारख्या तकलादू अनिश्चिततेच्या भरवशावर त्याची भाकिते बेतलेली नसतात असेच कोणताही ज्योतिषी ठामपणे सांगेल. अर्थात, पुण्यातील या ज्योतिषी संमेलनात पुढील वर्षीच्या निवडणुकीचे भाकीत वर्तविणार म्हणजे ‘भाजपचे काय होणार’ या सर्वामुखी असलेल्या शंकेवर ‘अ‍ॅस्ट्रॉलॉजिकल’ उजेड पडणार हे ओघानेच येणार असल्याने तमाम राजकीय क्षेत्राचे कान आणि डोळे या परिषदेवर खिळून राहणार हे सांगावयास कोणा ज्योतिषाची गरज नाही. अंतराळातील अनेक लुकलुकते तारे केवळ व्यक्तीच्या जीवनावरच नव्हे, तर राजकारणावरही प्रभाव टाकतात. तसेही, महाराष्ट्राच्या राजकारणात ज्योतिषविद्येला मानाचे स्थान जुनेच असून भविष्यकालीन राजकीय कामनापूर्तीसाठी देव पाण्यात घालून ठेवण्याची परंपरादेखील तशी जुनीच आहे. कोणतीही नवी गोष्ट सुरू करताना मुहूर्त पाहणे ही प्रथा राजकारणात जेवढय़ा प्रामाणिकपणे पाळली जाते, तितका प्रामाणिकपणा अन्यत्र क्वचितच पाळला जात असावा हेही आता सर्वसामान्यांस माहीत असल्याने, ज्योतिषविद्येस छुपी राजमान्यता मिळाली आहे हे सांगण्यासाठीदेखील ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे, चार राज्यांतील निवडणुकांच्या मतदानानंतर ज्याप्रमाणे वृत्तवाहिन्यांनी वर्तविलेल्या भाकितांकडे समाजाने तसेच राजकीय पक्षांनीही विश्वासाने पाहिले, त्याच विश्वासाने ज्योतिषी संमेलनातील राजकीय भाकितांकडे पाहिले जाणार हे सांगण्यासही कुणा ज्योतिषाची गरज नाही. मुळात, भविष्याचे अनिश्चिततेशी जवळचे नाते असल्याने व राजकारण हे अनिश्चिततेच्या पायावरच रचले जात असल्याने या क्षेत्रातील अनेकांच्या डोक्यावर भविष्याच्या अनिश्चिततेची टांगती तलवार असणार हे साहजिकच आहे. त्यामुळे आपला ‘उद्या’ कसा असणार हे आजच सांगणारा कुणी भेटला तर त्याच्यासमोर सर्वात आधी गुडघे टेकणारा जर कुणी दिसलाच, तर तो राजकारणीच असला पाहिजे हे सांगण्यासाठीही अलीकडे कुणा ज्योतिषाची गरज राहिलेली नाही. सांप्रत काळात तर, नवग्रहांच्याही पलीकडे नवनवे ग्रह सापडू लागल्यापासून व दशमस्थान नसतानाही पीडादायक ठरू पाहणाऱ्या काही ग्रहांचा ताप जाणवू लागल्यापासून या विद्येकडे ओढा वाढणे साहजिकच आहे. म्हणून पुण्यातील या संमेलनास केवळ योगायोग समजून दुर्लक्षून चालणार नाही. एक्झिट पोलच्या ताज्या भाकितांनंतर लगेचच या संमेलनाने मुहूर्त साधल्याने या भाकितांनाही तितकेच महत्त्व असणार आहे. आणि समजा, ती अगदी १००  टक्के बरोबर ठरली नाहीत, तर असे काय बिघडणार आहे? वाहिन्यांनी वर्तविलेली व त्यावर दिवसभर चर्चाची गुऱ्हाळे चालविली गेलेली भाकिते तरी कुठे शंभर टक्के तंतोतंत असतात?