स्वयंपाकघरातील भांडय़ांच्या खडखडाटाने मोरूला जाग आली. त्याने घडय़ाळाकडे पाहिले, आणि तो ताडकन अंथरुणातून उठला.  सोफ्यावर बसलेल्या मोरूच्या बापाने वर्तमानपत्रातून डोके बाहेर न काढता नापसंतीचा एक मोठा सूर काढला आणि स्वयंपाकघरातून एक भांडे जमिनीवर आदळत मोरूच्या आईने त्याला प्रतिसाद दिला. वातावरण तंग आहे हे मोरूने ओळखले होते. पण आता चर्चेस वेळ नव्हता. कष्टाळू कार्यकर्ता म्हणून विभाग प्रचारकाने कालच त्याची पाठ थोपटली होती.  कित्येक निवडणुकांत पक्षाच्या प्रचारसभा आणि बैठकांच्या पूर्वतयारीची सारी जबाबदारी मोरूवरच असायची. सभेआधी सतरंज्या अंथरणे आणि सभा संपवून नेतेमंडळी पुढे रवाना होताच आवराआवर करणे यात मोरूचा हातखंडा होता. त्याने घातलेली सतरंजीची घडी पाहात राहावी अशी असल्याची प्रशंसा मागे एकदा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीरपणे केली, तेव्हा अंगावर मूठभर मांस वाढल्याचा भास होऊन मोरू उगीचच जडावलादेखील होता. आपल्या कामात आणखी चोखपणा असला पाहिजे, असे तो स्वत:स बजावत असे. त्यामुळेच घरातील तापलेल्या वातावरणाकडे लक्ष द्यायचे नाही असे मोरूने ठरविले होते. तोवर आईने नाष्टय़ाची प्लेट टेबलावर  ठेवली. मोरूने घाईघाईनेच नाश्ता संपविला, आणि डोक्यावरची काळी-तपकिरी टोपी सावरून तो घराबाहेरही पडला. सभेची वेळ होण्याआधी सतरंज्या अंथरायची जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे होते. या वेळी मतदारसंघात खास बाहेरून आणलेला मातब्बर उमेदवार असल्याने यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची आहे असे पक्षश्रेष्ठींनी बजावल्याने सारे कार्यकर्ते झपाटून कामास लागणार होते. ठरल्याप्रमाणे मोरू आणि त्याचे साथीदार सभास्थानी आले. पक्षाचे राज्याचे नेते बाजूच्याच इमारतीतील वातानुकूलित दालनात नाश्ता करत होते. त्यांच्या सरबराईचे काम मोरूने एका पन्नाप्रमुखाकडे सोपविले, आणि सतरंज्यांची भेंडोळी खांद्यावर घेऊन मोरू मैदानात उतरला. त्याच्या अंगात जणू वीरश्री संचारली होती. नव्याने पक्षात आलेल्या नेत्याकडून शाबासकी मिळाली की आपल्या श्रमाचे चीज होईल, असे मोरूला वाटत होते. नाश्ता आटोपून सारे नेते उमेदवारासोबत मैदानावर आले. तोवर सतरंज्या अंथरून झाल्या होत्या. गर्दीही जमू लागली होती. विभाग कार्यवाहांनी समाधानाने मोरूकडे पाहिले. पक्षाचा प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी स्वार्थनिरपेक्ष भावनेने झटणारी कार्यकर्त्यांची फौज हीच आपली ताकद आहे, असे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आणि परमपूज्य नेत्यांनीही पूर्वीच सांगितलेले असल्याने मोरूने श्रद्धापूर्वक ही जबाबदारी स्वीकारली होती. सभा सुरू झाली. प्रदेशाध्यक्षांनी नव्या उमेदवाराची ओळख करून दिली. ‘हाच उमेदवार हवा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता’ असेही ते म्हणाले, आणि मोरूने टाळ्या वाजविल्या. भावी बूथप्रमुख टाळ्या वाजवतो हे पाहून पन्नाप्रमुखांनीही टाळ्या वाजविल्या. अशा तऱ्हेने सभेच्या सुरुवातीसच टाळ्यांचा कडकडाट झाल्याने सभा चांगलीच रंगली. उमेदवाराचे भाषण झाले. सभा संपली, आणि मोरूने कार्यकर्त्यांसोबत सतरंज्यांची आवराआवर सुरू केली. सभेच्या प्रतिसादामुळे सारे खूश होते. सतरंजीची नीट घडी घालत मंचावरच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहात मोरू स्वत:शीच पुटपुटला, ‘मेरा बूथ, सबसे मजबूत!’

Story img Loader