इंग्लिश फुटबॉलमध्ये सर अलेक्स फर्ग्युसन या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या प्रशिक्षकाच्या निवृत्तीनंतर प्रशिक्षक या संस्थेपेक्षा मालक आणि त्याच्या मर्जीतले खेळाडू यांचे महत्त्व पुन्हा एकदा वाढलेले आहे. खेळापेक्षा खेळाडू मोठे म्हणूनच इंग्लिश प्रीमियर लीग ही फुटबॉल जगतात सर्वाधिक लोकप्रिय लीग असली, तरी इंग्लिश फुटबॉल संघाला १९६६ मधील जगज्जेतेपद वगळता अलीकडे काहीही खास जिंकून दाखवता आलेले नाही. एक संघ म्हणून इंग्लंड हा फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इटली या इतर युरोपियन देशांइतका यशस्वी ठरलेला नाही. प्रशिक्षक हा तर फुटबॉलमधला सर्वात महत्त्वाचा घटक. त्याच्या आराखडय़ावर आणि कल्पनेनुरूप मैदानावर हालचाली होतात. डावपेच आखले जातात. मैदानावर तर प्रत्यक्ष खेळत नसूनही तोच राजा असतो. त्याचा आदेश शिरसावंद्य मानावा लागतो. किमान तशी अपेक्षा असते. पण चेल्सी फुटबॉल क्लबमध्ये तशी संस्कृती अद्याप रुजलेली नसावी.
त्यातूनच परवा एक ‘विनोदी शोकांतिका’ पाहायला मिळाली.
चेल्सी आणि मँचेस्टर सिटी या मातब्बर संघांमध्ये एका स्पर्धेतला अंतिम सामना होता. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीतून सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जाणार होता. इतक्यात चेल्सीचा गोलरक्षक केपा अरिझाबलगा याच्यात पायात गोळे आल्यामुळे प्रशिक्षक मारियो सारी यांनी त्याला बदलून काराबालो नामक दुसऱ्या गोलरक्षकाला मैदानात धाडण्याचा निर्णय घेतला. यामागे अर्थात आणखी एक विचार होता. काराबालो पेनल्टी फटके थोपवण्यात निष्णात मानला जातो. सारी यांनी केपाला माघारी बोलावले.. पण.. केपा गेलाच नाही. आपण ठीक आहोत आणि खेळत राहणार, असे त्याने ओरडून आणि हावभावातून सारी यांना सांगितले. सारी प्रथम संतप्त आणि मग निशब्द. केपा हे स्वस्तातले प्रकरण नव्हते. चेल्सी क्लबचे तेलदांडगे रशियन मालक रोमान अब्रामोविच यांनी केपाला विक्रमी किंमत मोजून चेल्सीमध्ये आणला आहे. तो उन्माद केपाच्या हावभावांमध्ये होताच.
आता इतके करून केपाने एखाद-दोन पेनल्टी थोपवून चेल्सीला सामना जिंकून दिला असता, तर केपाच्या उन्मादाला ‘विराटवलय’ तरी लाभले असते! पण त्याचा उन्माद आणि त्या दिवशी मैदानावरील कामगिरीतच विराट अंतर दिसून आले आणि चेल्सीने सामना गमावला! इतके घडल्यानंतर चेल्सी क्लबवाले म्हणतात, ‘दोघांनी एकमेकांशी बोलायला हवे!’ सारी म्हणतात, ‘मी केपाशी बोलेन’, आणि केपा म्हणतो, ‘मला सारींना दुखवायचं नव्हतंच. थोडा गैरसमज झाला!’ स्टार खेळाडूंशी जुळवून घेण्याचा ‘रविमंत्र’ कुणी तरी सारी यांना द्यायला हवा. खरे तर जगातल्या सर्वात महागडय़ा गोलरक्षकाला सारींसारख्या फुटकळ प्रशिक्षकाने आघाडी, मधली फळी, बचाव फळी, गोलरक्षक अशा सर्व स्थानांवर खेळवायला हवे.
सारी इंग्लिश क्लब संस्कृतीत अजून पुरेसे रुळलेले नाहीत, हा त्यांचा दोषच!