मराठमोळी संस्कृती म्हटली की, सगळ्यात आधी लावणीच का आठवते हे एक कोडेच आहे. ‘ज्वानीची आग’, ‘मशाल’ असे मादक शब्द असलेली लावणी म्हणजे समोरचा प्रेक्षक ‘पेटून’च उठला पाहिजे, असा जणू दंडकच असलेल्या या लावणीने महाराष्ट्राच्या मराठमोळ्या सांस्कृतिक क्षेत्रात असा काही धुमाकूळ घालून सोडला आहे, की परदेशातून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांसमोर लावणीचा फक्कड कार्यक्रम पार पडला नाही तर जणू राज्यात गुंतवणूकच येणार नाही असाच समज व्हावा. आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव व्हावे आणि देशात सर्वात पुढे आहे महाराष्ट्र माझा याची परदेशांनाही खात्री पटावी म्हणून पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातला ‘मेक इन इंडिया’ सप्ताह महाराष्ट्राच्या भाजप-सेना सरकारने शिरावर घेतला आणि गुंतवणूकप्रेमी वातावरणनिर्मितीच्या श्रीगणेशालाच ‘आता जाऊ द्या ना घरी..’चे सूर मंचावर घुमले. रंगमंचासमोर देशविदेशातील मान्यवर बसलेले असल्याने, लावणी सुरू झाल्यावर फेटा उडवत शिट्टय़ा मारायच्या असतात हे माहीत असूनही समस्त प्रेक्षकवर्ग सभ्यपणाने समोरची अदाकारी न्याहाळत असला, तरी लावणीचा फड सुरू झाला आणि डफावर थाप पडली की पेटून उठलेच पाहिजे, हा न्याय बहुधा चौपाटीवरच्या मंचाने व धसमुसळ्या वाऱ्याच्या साथीने पुरेपूर पाळला. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच घरी जायची घाई करणारी ही लावणी मंचावर सुरू झाली आणि कोणत्या कारणाने का होईना, अवघा मंच पेटून उठला. इथे सारे जण गुंतवणूकप्रेमी वातावरणनिर्मितीसाठी जमा झाले आहेत, एकीकडे त्यांना महाराष्ट्राच्या उद्योगसंस्कृतीचे दर्शन घडविले जात असताना इकडे मात्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेची ओळख पटविण्याची स्पर्धा सुरू होती. महाराष्ट्राची सांस्कृतिकता लावणी-तमाशापलीकडे जातच नाही असाच जणू राज्यकर्त्यांचा पारंपरिक जो समज असतो, त्या प्रथेशी प्रामाणिक राहूनच या मंचावरही लावणीचाच फड रंगात यावा, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ज्वानीच्या आगीची एखादी मशाल मंचावर असा उफाळलेला धुमाकूळ घालत असताना एखादी ठिणगी पडू शकते आणि समुद्रकिनाऱ्यावरचा बेफाम वारा या ठिणगीला साथ देऊ शकतो, हे लक्षात घेण्याचे विज्ञान पारंपरिक तमाशा फडाला नसले, तरी ‘फायर ऑडिट’ म्हणून कागदावरचे अहवाल तयार करणाऱ्या यंत्रणेला तरी अवगत असायला हवे होते, असे म्हणण्यात आता अर्थ नाही. एका लहानशा चुकीची किंमत- तीही काही लाख रुपयांत- रविवारच्या रात्री मोजावी लागल्यानंतर आता या दुर्घटनेची कारणमीमांसा शोधली जाईल, तेव्हा कदाचित वाऱ्याचा मुद्दा नजरेआड झाल्याची चूकही लक्षात येऊन जाईल. अशा दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही आणि या दुर्घटनेनंतरही मेक इन इंडिया सप्ताह वेळापत्रकानुसारच सुरू ठेवता आला, हे एक बरे झाले. तरीही या घटनेनंतर त्या आगीलाही वेगवेगळे राजकीय रंग मिळणार, हे अटळ आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातून विस्तवही जात नाही, असे बोलले जात होते, त्यात तथ्य नाही, याचा असाही पुरावा मात्र यातून समोर आला, हे थोडके नाही..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा