महाराष्ट्रातील सुजाण आणि राष्ट्रप्रेमी जनता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे पिताश्री मुलायमसिंह यांना कदापि माफ करणार नाही. या दोघांनी येथील जनतेच्या जखमांवर मीठ टाकले आहे. त्याकरिता आमचे नेते सक्षम होते. या नेताजींनी त्यात घुसखोरी करण्याची आवश्यकता नव्हती. पण उत्तर प्रदेशातील एक कुठल्याशा द्रुतगती मार्गावर विमान उतरवून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला वाकुल्या दाखविल्या. आमच्या रस्त्यांवरून चक्क विमाने उतरू शकतात हे दाखवीत नाक खाजविण्याचे औद्धत्य केले. बरे हा रस्ताही कसा तर ३०२ किमीचा. सहा पदरी. आग्रा ते लखनऊ असा. त्यावर खर्च केले १३ हजार दोनशे कोटी रुपये. आता ही रक्कम वाढवता आली असती, नाही असे नाही. ती कशी वाढवायची याचा सल्ला मागितला असता तर महाराष्ट्राने त्यांना तो मोफतही दिला असता. पण रस्त्यावरील खर्चाबद्दल कोणाचे काहीच म्हणणे नाही. तो त्यांचा आणि कंत्राटदारांचा अंतर्गत मामला आहे. आक्षेप आहे तो वेळेचा. म्हणजे प्रवासाच्या नव्हे, तर बांधकामाच्या. अवघ्या २२ महिन्यांत कोणी एवढा मोठा मार्ग बांधतो काय? महाराष्ट्राला कमी लेखण्यासाठीच केलेला हा प्रकार आहे. या अशा बाबींमुळे काही अ-राष्ट्रप्रेमी लोकांच्या मनात सरकारबद्दल उगाचच एक नकारात्मक भावना निर्माण होते. त्यातून असंतोष वाढीस लागतो. लोक प्रश्न विचारू लागतात. आता सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे राजद्रोहच. वास्तविक येथील लोकांचे आणि रस्त्यांवरील खड्डय़ांचे एक छानसे नाते जुळलेले आहे. सुरुवाती-सुरुवातीला पाहा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाताना प्रवास कधी संपला हे कोणाला कळतच नसे. प्रवासाची काही आठवणच राहात नसे. आता कसा तो प्रवास लोकांच्या आणि त्यांच्या पाठीच्या, कमरेच्या स्मृतीमध्ये कोरलेला राहतो. हे सर्व साध्य करण्यास किती कष्ट घ्यावे लागतात. त्यावर नेताजींनी एका फटक्यात पाणी ओतले. गतवर्षी यमुना द्रुतगती मार्गावर विमान उतरविले. आता आग्रा-लखनऊ मार्गावर. हे पाहून महाराष्ट्रातील पायलट मंडळींना काय वाटले असेल? आपल्याकडे प्रत्येक ट्रक, टेम्पो, रिक्षा आणि कारमागे सरासरी एक पायलट असतोच. रस्ते खड्डय़ांत असले काय किंवा अगदी नसले काय, ते त्यावरून विमानवेगाने गाडय़ा हाकतात. त्यांच्या डोळ्यांत आता धावपट्टीसारख्या रस्त्यांचे स्वप्न तरळू लागले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? खरे तर या घटनेच्या बातम्या दाखविण्यावर तहहयात बंदीच घालावयास हवी होती. त्या बंदीमुळे वाहिन्यांचा तोटा झाला असता. त्यांना ‘हाईवे से हारेगा चीन-पाकिस्तान’ अशा प्रकारचे मथळे दाखवीत स्टुडिओतून आपली ‘मनोजकुमारी’ दाखविता आली नसती. लोकही त्या मनोरंजनास मुकले असते. पण ते चालले असते. निदान महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत सुळसुळीत, झुळझुळीत रस्त्यांचे स्वप्न तरी तरळू लागले नसते. या गुन्ह्य़ासाठी नेताजींना येथील सुजाण लोक कधीही माफ करणार नाहीत..
एक रास्ता.. आहा आहा!
आमच्या रस्त्यांवरून चक्क विमाने उतरू शकतात हे दाखवीत नाक खाजविण्याचे औद्धत्य केले.
Written by लोकसत्ता टीम
![एक रास्ता.. आहा आहा!](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2016/11/flight.jpg?w=1024)
First published on: 23-11-2016 at 03:14 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flight landed on highway in up