विसरलात काय, गवताची गंजी गोळा केल्यावर गारगोट्या एकमेकांवर घासून आग तयार करण्याचे ते दिवस. भले मग त्या आगीपासून टेंभे पेटायचे, मशाली जळायच्या, मिणमिणते दिवे प्रकाश पुरवायचे पण चकमकीतून गंजी पेटवणे कठीणच होते ना! त्या जाचापासून साऱ्यांची सुटका करणारी मी. आता एक रुपयाने किंमत काय वाढली तर लागले लोक ओरडा करायला. गेल्या सहा वर्षांत इंधनाचे भाव इतके वाढले, गॅस महागला. तेही तर माझ्यासारखेच ज्वालाग्राही. पण म्हणे, ती भाववाढ राष्ट्रहितासाठीआणि माझी गरिबांना झळ सोसायला लावणारी. वा रे वा! कमाल आहे तुमच्या दुटप्पीपणाची. भक्तीत इतके आंधळे होऊ नका रे! खरे तर भक्तीचा व माझा संबंध अजूनही तसाच टिकून आहे. आजही देवाजवळ निरांजन लावायचे असेल तर माझीच गरज भासते साऱ्यांना. तो माझा सावत्र भाऊ, लायटर. त्याचा कुणी वापर करत नाही दिवा जाळण्यासाठी. याच भावामुळे अनेकांच्या खिशातला माझा वावर कमी झाला. काय तर म्हणे, लायटरने धूम्रकांडी पेटवणे हे आधुनिकतेचे लक्षण. तो अनेकदा दगा द्यायला लागला की येतेच साऱ्यांना मग माझी आठवण. आग लावण्याची इतर अनेक साधने उपलब्ध झाली म्हणून भले तुमचे माझ्याकडे दुर्लक्ष झाले असेल; पण तेवढ्याने माझे महत्त्व कमी नाही होत! भाव वाढून वाढून किती वाढले तर एकाचे दोन रुपये. अरे मी इतकी ज्वालाग्रही असूनही एवढी स्वस्त कशी, हा प्रश्न कुणालाच का कधी पडला नाही? मधल्या काळात खाणीतली बारुद असो वा फटाक्यांची दारू, किती वेगाने भाव वाढत गेले यांचे. त्यावर कुणी आक्षेप घेतल्याचे कधी दिसले नाही. माझ्यातून निघणाऱ्या जाळाने भडका घेतला तर अनर्थ घडू शकतो हे ठाऊक असूनही माझी किंमत एवढी कमी का असाही प्रश्न गेल्या १५ वर्षांत कुणाला पडला नाही. सारेच मला गृहीत धरून चालायचे. आता वाढ होताच साऱ्यांना महागाई आठवली. काहींनी तर अलीकडे ‘आगी लावण्याच्या’ घटनांमध्ये बरीच वाढ झाल्याने त्यावर प्रतिबंध आणता यावा म्हणून प्रतीकात्मक पद्धतीने जाणीवपूर्वक माझी किंमत वाढवली गेली अशीही शेरेबाजी केल्याचे वाचनात आले. अरे बाबांनो, त्या विद्वेषाच्या आगी लावण्यात मला काडीचाही रस नाही. माझ्या पेटण्याने भुकेल्याच्या पोटात अन्न गेले, सांजवाती पेटून घरात प्रसन्नता निर्माण झाली, कुणाचा शौक पूर्ण होऊन तरतरी आली, कुणाच्या वाढदिवसाला मी कामी आले तरी पुरेसे आहे मला. असंतोषाच्या आगी लावण्याच्या उद्देशाने माझी निर्मिती झाली नाही. मीर, गालीब, जफरच्या काळात मी नव्हते. अन्यथा त्यांनी निर्मिलेले सौहार्दाचे दोन-चार शेर सहज ऐकवले असते मी! आजच्या दुभंगकाळात. माझी किंमत वाढल्याने आग लावण्याची ‘सुपारी’ घेणाऱ्यांच्या मोबदल्यात वाढ होईल असली तर्कटे अजिबात नकोत. मनामनात धुमसणाऱ्या आगीला मी जबाबदार नाही व माझ्यामुळे ती पेटतही नाही. माझे काम सद्हेतूने आग लावण्याचे. त्याऐवजी भडकणारे असतील ते सवलतीत मिळणारा गॅस सहा वर्षांत दुप्पट कसा झाला यावर विचार करतील. दरवेळी शेगडी पेटवताना लायटरऐवजी माझा वापर करा. माझ्यातली प्रत्येक पेटणारी काडी महागाईचा दाह तुमच्या मनात निर्माण करेल व तोच व्यवस्थेवर दबाव आणण्याच्या कामी येईल. काडीची किंमत वाढली, ‘गुल’ महागले म्हणून माझे भाव वाढले. हे लक्षात घेऊन दररोज होणाऱ्या इंधनवाढीकडे जरा बघा. तुम्हाला गोड बोलून फसवतेय कोण हे सहज उमगेल!
आगपेटी/ महागपेटी
आग लावण्याची इतर अनेक साधने उपलब्ध झाली म्हणून भले तुमचे माझ्याकडे दुर्लक्ष झाले असेल; पण तेवढ्याने माझे महत्त्व कमी नाही होत! भाव वाढून वाढून किती वाढले तर एकाचे दोन रुपये
Written by लोकसत्ता टीम
First published on: 08-12-2021 at 00:01 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fuel gas is expensive light a cigarette with a lighter a sign of modernity akp