‘मज वाटल्यास मी हे करीन, मज वाटल्यास मी ते करीन, कां की माझी मर्जी’ अशा आशयाचे, थोर अभिनेते व त्याहून थोर लोकनेते गोविंदराव अहुजा यांचे हिंदूी गीत लोकप्रिय आहे. आपण भारतवासी साधारणत: अशाच पद्धतीने वागत असतो. त्यामुळे हे भावगीत म्हणजे जणू शंभरातील नव्याण्णवांचे राष्ट्रगानच आहे. पद्मश्री सैफ अली खानसारख्या सेलेब्रिटींप्रमाणे खुद्द गोविंदा यांचीही त्या गीतावर उत्कट श्रद्धा असावी. किंबहुना त्यामुळेच त्यांनी ‘त्या’ एका प्रसंगी कायदा हातात घेतला आणि चित्रीकरणस्थळी तथाकथित बेशिस्तीने वागत असलेल्या एका चाहत्याच्या श्रीमुखात लगावली. वस्तुत: अशा कृत्याबद्दल त्यांना केंद्र सरकारने शाबासकीच द्यायला हवी होती. ती देणे शक्य नसेल, तर किमान पद्मश्री तरी द्यायला हवी होती. नपेक्षा चाहत्यांनी तरी या गोविंदरावांच्या बाजूने किमानपक्षी ट्विटरवरून शब्दमोर्चे तरी काढायला हवे होते; परंतु तसे झाले नाही. उलट त्या श्रीमुखवंत चाहत्याने त्यांच्यावरच खटला भरला. प्रारंभी जनसामान्यांना कळेनाच की, हा आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व जाहिरातीचा भाग आहे की खरोखरच तसे काही चाललेले आहे. कालांतराने खटला न्यायालयात उभा राहिला. सर्वोच्च न्यायालयात गेला. चित्रपटांत आपण कोणाची ‘धुलाई’ केली तर अवघ्या प्रेक्षागृहातून टाळ्यांचा कडकडाट उमटतो आणि येथे एका चाहत्याला साधी कानफटात वाजविली, – तीही एकदाच, वृत्तवाहिन्यांवर दाखवतात तशी सटासट अनेकदा नव्हे. – तर प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात जावे, हा गोविंदरावांसाठीही धक्का होता. या प्रकरणात त्यांना दोनेक वर्षे तुरुंगात जावे लागले असते. त्यात, मा. सरकार व जेल मॅन्युअल यांच्या कृपेने पॅरोलवर सतत बाहेर येता येते वगैरे दिलासादायक भाग असला, तरी तुरुंगातील वास्तव्य हे त्रासदायकच. त्यातून सुटण्यासाठी मग छातीत दुखून आजारी वगैरे पडावे लागते. हे सर्व कुटाणे टाळण्यासाठी अखेर गोविंदरावांनी सामोपचाराचा मार्ग चोखाळला. आपल्याकडे मोठेपण घेत त्या चाहत्यास क्षमस्व म्हणण्याचे ठरविले. त्या क्षमेची किंमत म्हणे पाच लाख रुपये ठरली. प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट असल्याने त्या थपडेच्या मोलाबद्दल काही म्हणता येत नाही; परंतु ते सहा लाख तीन रुपये का नाही असा प्रश्न उभा राहतोच. असो. तो भाग अलाहिदा. हे सर्व प्रकरण येथे मीठ लावून चघळण्याचे कारण एवढेच की, यातून अजाणता एक चांगली गोष्ट घडली आहे. गोविंदराव हे काँग्रेसचे नेते असल्याने त्यांना हे ऐकून आनंदच वाटेल, की या माफी प्रकरणापासून अनेक चाहते बापूजींच्या मार्गावर चालण्याचा सराव करू लागले आहेत. एका चाहत्याने तर आम्हांस स्पष्टच सांगितले आहे, की उद्या त्याच्यावर अशी एका गालावर थप्पड खाण्याची वेळ आली तर तो स्वत:हून दुसरा गाल पुढे करणार आहे. ‘एक थप्पड की गूंज’ पाच लाखांची असेल, तर दोन थपडांची किती असे साधे गणित! या प्रकरणाने तेवढा पाठ दिला, बाकी ज्याची त्याची मर्जी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा