सलग दोन दिवस विचार करून अखेर चिंतूचा निर्णय पक्का झाला. ‘येत्या वर्षांत कोणताही संकल्प करायचाच नाही, जे होईल ते पाहायचे आणि जशी परिस्थिती समोर येईल त्याला सामोरे जायचे’ एवढाच संकल्प करण्याचे चिंतूने ठरविले आणि त्याने मेजावरची डायरी उचलली. कव्हरवर साचलेली धूळ झटकताच, त्यावरची जुनी सोनेरी अक्षरे पुन्हा चमकू लागली. चिंतूने एकदा त्या चमकणाऱ्या अक्षरांकडे पाहिले आणि एक नवा सुस्कारा सोडला. आता ही अक्षरे कितीही चमकली तरी त्याचा काही उपयोग नाही, असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने कव्हरचे पान झटक्यात पालटले. सारी पाने कोरीच होती. चिंतूने डायरीचे शेवटचे पान उघडले. त्यावर ३१ डिसेंबरची तारीख होती. त्या पानावर आज तरी अखेरचा काहीतरी मजकूर लिहावा असे त्याने ठरविले आणि ‘बायबाय २०१८’ असे लिहून त्याने डायरी मिटली. नव्या वर्षांत जुन्या वर्षांतील सारी रद्दी काढून टाकायची असे ठरवून त्याने या डायरीची रवानगीही रद्दीत केली. पण लगेचच त्याचा विचार बदलला. खरे तर, नवे वर्ष, सरते वर्ष, असे काहीही नसते, हा नवाच विचार त्याच्या डोक्यात चमकला. केवळ दिवस बदलतो. जुना दिवस मावळतो, नवा दिवस उजाडतो. त्याला कॅलेंडरवर महिन्याच्या आणि वर्षांच्या पानावर जागा मिळते, म्हणून आपण तसा विचार करतो. केवळ तारीख आणि कॅलेंडर बदलून आयुष्य बदलणार नसते.. त्यामुळे कॅलेंडरने कितीही प्रयत्न केला, तरी आपण फसायचे नाही. कॅलेंडरावर दिसणारा नव्या वर्षांचा पहिला दिवसही आपण नेहमीसारखाच घालवायचा असा विचार चिंतूने पक्का केला, आणि संकल्पाच्या चिंतेमुळे होणारी त्याच्या मनाची घालमेलही संपली. आता चिंतू बराचसा सैलावला होता. त्याने पुन्हा नव्या वर्षांतील पहिल्या दिवसाचे वर्तमानपत्र उघडले.नववर्षांची बातमी वगळता, बाकीच्या बातम्या तर नेहमीसारख्याच होत्या. आपण केलेला विचार योग्यच होता या विचाराने चिंतूला मनातल्या मनात समाधान वाटले आणि त्याने सोफ्यातूनच स्वयंपाकघराकडे पाहात फक्कड चहाची ऑर्डर दिली. आता कपबशी आदळल्याचा आवाज येणार अशी त्याला भीतीही वाटली.  त्याने त्या अपेक्षित आवाजाकडे कान लावले, पण तसे काहीच झाले नाही. उलट काही वेळातच हातात वाफाळत्या चहाचा कप घेऊन बायको हसतमुखाने समोर उभी राहिलेली त्याला दिसली. चिंतूने बायकोच्या नकळत स्वत:स एक चिमटा काढला. ‘काहीतरी बदल झालाय’.. तो स्वत:शीच बोलला आणि बायकोने हसून त्याच्याकडे पाहिले. मग चिंतूही हसला,आणि त्याने हात पुढे केला. ‘हॅप्पी न्यू इयर’..  तो हसत बोलला आणि बायकोने त्याला तसेच ‘विश’ केले. नवे वर्ष चांगले जाणार याची त्याला खात्री पटली. आता नक्कीच काहीतरी संकल्प केला पाहिजे, असे ठरवून चिंतू पुन्हा विचार करू लागला आणि समोरच्या वर्तमानपत्रात काहीतरी शोधू लागला..चिंतूचा संकल्प तयार झाला होता. नव्या वर्षांत ओला कचरा वेगळा काढायचा आणि प्लास्टिकबंदीला संपूर्ण पाठिंबा द्यायचा,असे ठरवून नव्या वर्षांच्या डायरीची भेट कुणाकडून मिळेल का, याचा विचार चिंतू करू लागला..