दिल्लीची सत्ता मिळाल्यावर ‘आप’ने इतक्या सुधारणा केल्या, इतक्या केल्या की खरे तर कुणी आजारी पडणे हा त्या सुधारणांचाच अपमान.. पण काय करणार? गेल्या ७० वर्षांत कधी काही कामच झालेले नसल्यामुळे दिल्लीकर आजही आजारी पडतात, त्यांना दुर्धर व्याधीदेखील होतात.. त्यावर इलाज करण्यासाठी दिल्लीची सरकारी रुग्णालये सज्ज आहेतच, पण हे सारे इलाज दिल्लीचे मुख्यमंत्रिपद काँग्रेस वा भाजपकडे असायचे, तेव्हाच्या काळातील वैद्यकीय महाविद्यालयांत शिकवले गेलेले.. त्यांत सुधारणा असलीच, तर ती उपकरणांमुळे झालेली. तेव्हा या इलाज-पद्धतीत काहीतरी आमूलाग्र सुधारणा करणे आप सरकारला क्रमप्राप्तच ठरले. आणि ही सुधारणा शोधण्यासाठी फार लांब जावेच लागले नाही! अगदी दिल्ली सरकारच्याच शाळांमध्ये ती सुधारणा सापडली. लगोलग दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी- सत्येन्द्र जैन यांनी स्वत: गुरु तेगबहादूर रुग्णालयात जाऊन या नव्या उपचारपद्धतीचा प्रारंभ अगदी स्वहस्ते केला.

स्वहस्ते म्हणजे स्वत:च्या हातांनी. पण ही झाली फारच अपुरी माहिती. आरोग्यमंत्री जैन यांनी हा शुभारंभ स्वत:च्या केवळ हातांनीच नव्हे तर पायांनी, हलत्या मानेने, हलत्या कंबरेने.. असा सर्वागाने केला. रुग्णालयातील डॉक्टरमंडळी, परिचारिकावर्ग आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या साथीने हिंदी-पंजाबी गाण्याच्या ठेक्यावर आरोग्यमंत्री स्वत: नाचले, एवढे सारेजण नाचताहेत, त्यांपैकी एखाद्या डॉक्टरदीदी आपल्यालाही खाणाखुणा करताहेत हे पाहून महिला रुग्णांनीही चेहरा हसरा करून, जमेल तेवढे हात हलवून नाचाचा अभिनय रुग्णशय्येवरूनच केला. १७ जानेवारीरोजी या रुग्ण-डॉक्टर-आरोग्यमंत्री समूहनृत्याचे चित्रीकरण दिल्लीतील स्वाइन फ्लूपेक्षाही अधिक वेगाने ‘व्हायरल’ झाले.. सर्वदूर पसरले. त्याच क्षणी, द्वाही फिरली एका नव्या उपचारपद्धतीची- ‘हैप्पीनेस थेरपी’ची!

‘हैप्पीनेस’ला दिल्लीबाहेर, हिंदी पट्टय़ाबाहेर ‘हॅपिनेस’ म्हणूनही ओळखले जाते. या शब्दाचा इंग्रजी-मराठी शब्दकोशातील अर्थ ‘आनंदीपणा, आनंदी असणे’ असा जरी असला तरी दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांच्या थेरपी-कोशात तो ‘नाचणे’ असाच होता. पुढे आरोग्यमंत्र्यांनीच त्यात ‘गाणे, सोपी योगासने करणे, ध्यान लावणे किंवा खो-खो हसणे’ अशी भर घातली. अनेक वर्षे दिल्ली सरकारच्या आरोग्यसेवेत असणाऱ्यांना ‘हैप्पीनेस’चे हे विविध अर्थ इतके नवीन होते की, त्या सेवेतील सारेच जण त्या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ पार विसरून गेले. कुणाच्या जिवाला आज कुठला नाच करू याचा घोर लागला, कुणाला गाणी नीट आठवली नाहीत तर या चिंतेने आवंढा दाटून आला, ध्यान लावण्याच्या ध्यासापायी कुणाचे चित्त थाऱ्यावर राहीना की योगासने करणे कुणाला सोपे जाईना. ‘काम करू की हैप्पीनेस करू’ अशी नाराजीची लाटही या रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांत पसरली म्हणतात.

पण ही अनारोग्यकारक नाराजी मोडून काढणारे फर्मान आरोग्यमंत्री जैन यांनी नुकतेच बजावले आहे. आता केवळ एकाच नव्हे, दिल्लीच्या साऱ्या सरकारी रुग्णालयांत ही ‘हैप्पीनेस थेरपी’ सुरू होणार आहे. ‘हैप्पीनेस थेरपी’चा आग्रह मंत्र्यांनीच धरल्याने कर्मचाऱ्यांचा नाइलाज आहे. दिल्लीची हवा हल्ली फारच प्रदूषित असते, या हवेत आणि पाण्यात रोगजंतूही पसरले आहेत हे खरे.. पण ‘हैप्पीनेस’च्या सकारात्मक ऊर्जेपायी अनारोग्याची सारी ‘निगेटिव्ह एनर्जी’ अर्थात नकारात्मक ऊर्जा रुग्णालयांबाहेर पडल्यामुळे असे घडले असावे, असे मानण्यास जागा आहे.

Story img Loader