नियम न पाळण्याचे कौतुक वाटणे हा भारतीय स्वभाव. प्रवेश बंद असलेल्या रस्त्यावर पोलिसाची नजर चुकवून वाहन नेणे हा भारतीयांचा पुरुषार्थ. वाहतूूक नियंत्रक दिव्यांची यंत्रणा वाहनाचा वेग अडवणारी असते, अशी त्यांची तक्रार आणि हेल्मेटची सक्ती हा त्यांच्या स्वातंत्र्यावरील अधिक्षेप अशी त्यांची खात्री. जगाला शहाणपण शिकवण्याचा मक्ता असल्याने महाराष्ट्रातील आणि विशेषत: पुण्यातील वाहनचालकांना, हेल्मेट सक्तीचा आदेश, आपले मूलभूत हक्क आणि त्यावर या सक्तीमुळे येणारी गदा वगैरे आठवू लागले. ते स्वाभाविकच म्हणा. त्यामुळेच हेल्मेट निर्मात्या कंपनीच्या नफ्यासाठीच हे आदेश आहेत, इथपासून ते आमच्या मृत्यूची काळजी सरकारने कशाला घ्यावी येथपर्यंत त्यांच्याकडून सध्या टीकेची झोड सुरू आहे. पुण्यासारख्या शहरांत तर कायम एकमेकांकडे पाठ केलेलेही या सक्तीविरोधात एकत्र आले आहेत. त्यांना आता आपल्या पगडीची आठवण होऊ लागली आहे आणि त्यांनी आंदोलनाची तयारीही सुरू केली आहे. रस्त्यातील खड्डय़ांमध्ये झाडे लावणे किंवा प्रदूषणाच्या विरोधात चेहरा संपूर्णपणे झाकून टाकणे, यांसारख्या घटना फक्त ज्या पुण्यात घडतात, तेथे रस्ते, वाहने आणि माणसे यांचे प्रमाण व्यस्त राहिलेले आहे. जिथे वाहनाचा वेगच ताशी पाच किलोमीटर आहे, तिथे हेल्मेटची कटकट कशाला? अशा त्यांचा सवाल आहे. हेल्मेट सक्तीपाठोपाठ सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांमध्ये हेल्मेट ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही आता करण्यात येईल. हेल्मेट चोरीचे प्रमाण वाढल्याचे कारण दाखवून पोलिसांनी अशा चोरांवर अधिक लक्ष द्यावे, यासाठीही आंदोलन उभारण्यात येईल. स्वत:हून काही गोष्टी करणे हा आपला स्वभाव नसल्यामुळेच तर नियम करणे भाग पडते आणि ते पाळण्याची आपली मानसिकता नसते. चौकात पोलीस असेल, तरच हिरवा दिवा लागेपर्यंत थांबण्याची प्रवृत्ती असल्याने हेल्मेट घालणे हे आपल्या संरक्षणासाठी नसून ते पोलिसांसाठी आहे, असा त्यांचा ठाम समज असतो. चौकात हिरव्या दिव्याची वाट पाहणाऱ्या परगावच्या पाव्हण्यांना ‘काका चला.. हा हिरवा आणखी गडद हिरवा होणार नाहीये’ असे सांगणारे पुण्यातच असू शकतात. नियमाची सक्ती आणि तो न पाळल्यास दंड याची भीती वाटेनाशी झाली की मग मनमौजींना उधाण येते. दंड आला की तो टाळणे आले म्हणजेच चिरीमिरी आली. ही सगळी साखळी जणू आपल्या हक्कांच्या विरोधात असल्याची ही भावना नागरिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्दय़ावर मात्र मूग गिळून गप्प बसते. सक्ती आहे म्हणून विरोध आहे, हा पवित्रा कोणाच्या भल्यासाठी? नागरिकांच्या की पोलिसांच्या?

Story img Loader