वर्षभरात तोंडातून बाहेर टाकता न येणारे (अप) शब्द एकाच दिवशी ओरडून टाकण्याची परंपरा आपल्या स्वभावाला धरूनच असल्याने आता शिमगा हा राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करावा, अशी मागणी कशी होत नाही हेच नवल. मनातल्या मनात आपण शिव्यांची जी लाखोली वाहत असतो, तिचा मुखावाटे उच्चार केल्यानंतर किती मोकळे झाल्यासारखे आणि मनही कसे स्वच्छ, निरभ्र झाल्यासारखे वाटते! अधिकृतपणे अशा शिव्या देता येणाऱ्या या सणाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत असतात. होळी करण्यासाठी काटक्या गोळा करणे, त्यासाठी शेजाऱ्यांच्या झाडांवर त्यांच्या नकळत चढून छोटीशी चोरी करणे, त्याच वेळी शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे मिळणाऱ्या होळीपूर्व लाखोलीचाही आस्वाद घेणे.. हे सारे होळीच्या सणाशी निगडित असते. लहान वयातला तो खोडकरपणा गेल्या काही वर्षांत म्हातारे होईपर्यंत जपून ठेवण्याचा नाद गेल्या काही वर्षांत वाढला आहे. त्यामुळे ‘म्हातारा न इतुका’ म्हणवून घेणाऱ्यांना शिमगा हा त्यांचा लाडका सण वाटणे अगदीच योग्य. पण अशा सगळ्यांना हा सण वर्षांतून एकदाच साजरा करणे मात्र अमान्य असते. रोजच्या रोज वेगवेगळ्या कारणांवरून शिमगा करणे हा तर अनेकांचा पोटापाण्याचाही उद्योग होऊन बसला आहे. प्रत्यक्ष होळी पेटवून तिच्यासमोर उभे राहून बोंबा मारण्याला परंपरेचे काही संदर्भ असतीलही, पण प्रत्येक वेळी होळीच कशाला पेटवायला पाहिजे, असा या सगळ्यांचा सवाल असतो. होळी न पेटवताही बोंब मारण्याची पद्धत जर सर्वमान्य होत असेल, तर मग वर्षांतल्या एका विशिष्ट दिवसाला कशाला एवढे महत्त्व द्यायचे, अशीही त्यांच्यापुढील गहन समस्या आहे. एक दिवस सार्वजनिक सुटी घेऊन शिमगा करण्याऐवजी जर तो रोजच्या रोजच होत असेल, तर त्या सुटीचे तरी असे काय महत्त्व? त्यामुळे वर्षभर चालणाऱ्या शिमग्यासाठी एक दिवस अधिकृत करणे हेच मुळी अत्यंत चुकीचे आणि अन्यायकारक आहे, असे या सगळ्या ‘शिमगाकारां’चे म्हणणे आहे. होळी न पेटवून पर्यावरणाला मदत करणे आणि शब्दांची लाखोली वाहून परंपरा टिकवणे अधिक उपयुक्त असल्याने, हा सण वर्षभर साजरा करणेच अधिकृत मानावे, असा हट्टाग्रह प्रत्यक्षात आणणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत सतत ऐकायला येणारे शिव्याशाप हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहे. संसद असो की विधिमंडळ, इलेक्ट्रॉनिक माध्यमे असोत की जाहीर सभा, सगळीकडे एकमेकांना धारेवर धरण्यातच आनंद मानणारे अधिक संख्येने दिसतात. वर्षभर आपसूकच साजरा होणाऱ्या या एकमेव भारतीय सणाचे महत्त्व नव्याने समजून घेऊन त्यास सरकारने बारमाही दर्जा देण्यास खरे तर काहीच हरकत नाही.