अखेर तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा ती रम्य पहाट उगवली. कधीपासून ज्याची प्रतीक्षा होती, तो क्षण आल्याच्या समाधानाची झाक चिंतूच्या बापाच्या चेहऱ्यावर सकाळीच झळकू लागली. पाच वर्षांपूर्वी, लाल किल्ल्यावरील आपल्या पहिल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बाबूशाही’ला तंबी भरली होती, याची आज त्याला पुन्हा आठवण आली आणि त्याचे मन आनंदाने भरून आले. ‘चलता है’ संस्कृती चालणार नाही. ‘काम दाखवा नाही तर बाजूला व्हा’ असे पंतप्रधानांनी पाच वर्षांपूर्वी बजावले; त्यानंतर जेव्हा जेव्हा सरकारी कार्यालयात जायची वेळ येत असे, तेव्हा तेव्हा ते शब्द कानात घुमत असल्याचा भास चिंतूच्या बापाला होई. बऱ्याचदा बाबूंची खुर्ची रिकामी दिसे आणि पंतप्रधानांचे ते कठोर शब्द कानाबाहेर येऊन खदाखदा हसत समोर नाचतात, असाही भास होई. हळूहळू याची त्याला सवय होऊन गेली. तरीही त्याने आशा सोडली नव्हती. आज वर्तमानपत्रात ती बातमी वाचली आणि तब्बल पाच वर्षे आपल्याला खिजविणाऱ्या ‘चलता है’ संस्कृतीने केविलवाणे होऊन आपल्यासमोर मान टाकली आहे, असा भास चिंतूच्या बापाला झाला. मंत्री परिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना पुन्हा एकदा तोच इशारा दिला होता. घरातून खात्याचा कारभार हाकण्याच्या दरबारी संस्कृतीला लगाम लागला आहे, सकाळी साडेनऊ वाजता सारे मंत्री आपापल्या कार्यालयात येऊन कामकाजात दंग झाले आहेत, अधिकारीही वेळेवर हजर आहेत,  असे एक सुंदर काल्पनिक दृश्यही त्याच्या नजरेसमोर तरळू लागले. अलीकडे मंत्र्यांच्या निवासी कार्यालयाबाहेरची वाढती गर्दी पाहून चिंतूचा बाप उगीचच चिंतातुर व्हायचा. आपल्या खात्याचे मंत्रालय घरबसल्या हाकण्याच्या या ‘सुशासन पद्धती’चा त्याला हेवादेखील वाटायचा. मंत्र्यांच्या घरातल्या सकाळच्या दरबारात हजेरी लावल्यानंतर बाबूशाहीनेही आपल्या कार्यसंस्कृतीला ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीचा साज चढविला होता, हेही त्याला माहीत होते. खात्याचा कारभार घरातून सुरू झाल्यापासून बाबू संस्कृतीने टाकलेले सुटकेचे सुस्कारे चिंतूच्या बापाला अस्वस्थ करायचे. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर कामासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविण्यात अर्थ नाही, हे त्याने केव्हाच मनाशी ठरवून टाकले होते. आता पंतप्रधानांनी मंत्र्यांचेच कान टोचल्याने, मंत्री वेळेवर कार्यालयांत येऊन बसणार असल्याने, अधिकाऱ्यांचाही नाइलाज होईल, या विचाराने चिंतूच्या बापाचे मन उगीचच भरून आले. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी जेव्हा हाच इशारा दिला, तेव्हा पुढचे काही दिवस सरकारी कार्यालयांमध्ये तशी कार्यसंस्कृती निर्माण झाली होती. ते चित्र पाहून तेव्हाही आपल्याला असेच आनंदाचे भरते आले होते, हे चिंतूच्या बापास आठवले, आणि जुन्या अनुभवाचीच आता नव्याने पुनरावृत्ती होणार अशी एक उतावीळ उत्सुकताही चिंतूच्या मनात जागी झाली. आता लगेचच एखादे सरकारी कार्यालय गाठायचे आणि नव्या कार्यसंस्कृतीचे दर्शन घेऊन समाधानाने घरी परतायचे, असे चिंतूच्या बापाने ठरविले. वर्तमानपत्रातील त्या बातमीचे कात्रण काढून त्याने सवयीनुसार आपल्या वहीत चिकटविले, पानावर तारीख लिहिली, आणि त्याने मनातल्या मनात स्वत:शीच जोरदार घोषणा दिली, ‘कार्यालय संस्कृतीचा विजय असो’!

Story img Loader