खरे म्हणजे, क्रिकेटच्या क्षेत्रात आपण पुरते निरक्षर आहोत, हे माहीत असल्यामुळे याआधी कधीच आम्ही विश्वचषक वगैरे सामन्यांच्या वाटेलाही गेलो नव्हतो. पण रविवारी इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्याचा फारच बोलबाला होऊ लागल्याने आम्हीही दूरचित्रवाणीसमोर बसलो. सोफ्यावर बैठक मारून इंग्लंडविरुद्धच्या सामन्याचा आनंद घेण्यास आम्ही सुरुवात केली, आणि नेमके काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी सोबतच समाजमाध्यमांवर फेरफटकाही सुरू ठेवला. समोरच्या छोटय़ा पडद्यावर सुरू असलेल्या महायुद्धाचे कंगोरे साक्षात् ‘समाजमाध्यम विद्यापीठा’द्वारे आमच्यासमोर खुले होऊ लागले. पुढे जसजसा भारतीय संघाचा फलंदाजीचा डाव सुरू झाला, तसतसे समाजमाध्यमांवर दाटत चाललेले पराभवाच्या भयाचे ढग आमच्याही मनावर दाटू लागले. आता या युद्धसदृश स्थितीतून आपल्या संघाचा बचाव काही शक्यच नाही असे वाटून समाजमाध्यमांवरील प्रतिक्रियांमुळे मन निराशेच्या गर्तेत सापडत असतानाच, विजय किंवा पराजय, काहीही झाले तरी पाकिस्तानी संघाची गच्छंती अटळ असल्याची आनंदचर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली, आणि आमची पराभवाची हुरहुर कुठल्या कुठे पळूनही गेली. संघाच्या या संथगती खेळामागे नक्कीच काही तरी डावपेच आहेत, असा स्वयं-समजुतीचा मध्यममार्ग स्वीकारून या चर्चेशी आम्ही सहमतही झालो.. एवढय़ा थोडक्या वेळातच समाजमाध्यमांवरील चर्चामुळे आपणासही क्रिकेटच्या सामन्यामागील आंतरराष्ट्रीय गणितांचे सखोल ज्ञान एव्हाना प्राप्त झाले आहे याची जाणीव होऊन आम्हीही बसल्या जागेवरून सल्लागाराची भूमिकाही बजावू लागलो, आणि समाजमाध्यम विद्यापीठाच्या नियमानुसार तेथे काही तरी लिहिले पाहिजे या जाणिवेने काही तरी खरडूनही मोकळे झालो. अशा तऱ्हेने जेमतेम समाधान साधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यात भारताचा लाडका खेळाडू महेंद्रसिंह धोनी चेंडू अडविण्यापुरता आपल्या बॅटचा वापर करू लागला, आणि समाजमाध्यमांवर उमटलेल्या निराशा, संताप, संशयाची सारी भुते आमच्याही मानगुटीवर आम्ही बसवून घेतली. पहिल्या काही वेळात उमटलेली पराजयाची चिन्हे पुसून विजयाच्या आशेचे अंकुर उमलू लागलेले असतानाच या भरवशाच्या गडय़ाने कच खाल्ल्याचा संताप समाजमाध्यमांवरील तमाम तज्ज्ञांच्या बोटांतून उमटणाऱ्या अक्षरांद्वारे समाजमाध्यम व्यापू लागला. आता व्हॉट्सॅप, ट्विटर वा फेसबुकावर तरी भावनांना वाट करून दिलीच पाहिजे या जाणिवांचे उमाळे आमच्याही मनात उसळ्या मारू लागले. मागचापुढचा विचार न करता आम्ही धोनीच्या नावाने दोनचार फुल्या नोंदवूनही टाकल्या.
शेवटच्या चेंडूनंतर सहज समाजमाध्यमांचा फेरफटका मारला, तेव्हा आमच्यासारखेच अनेक जाणकारही तेथे धोनीच्या नावाने फुल्यांचा वर्षांव करत असल्याचे जाणवल्याने आम्ही सुखावून गेलो, आणि तसेच फिरत फिरत धोनीच्या एका ट्विटर पेजवर स्थिरावून चमकलो.. ‘माझे तीन पाळीव कुत्रे आहेत.. विजय वा पराजयानंतरही ते माझ्यावर सारखीच माया करतात’, हे धोनीचे वाक्य वाचून आमच्या ‘प्रगल्भते’च्या जाणिवांचा फुगा टचकन फुटून गेला.