भारत-पाकिस्तान टी-ट्वेंटी स्पर्धा पाहावी की पाहू नये असा भलताच सवाल सध्या तमाम क्रिकेट प्रेक्षकांसमोर उभा आहे व त्यास सर्वस्वी कारणीभूत आहेत ते भाजपचे तरुण तडफदार नेते अनुराग ठाकूर. परवा तर त्यांचे संसदेतील भाषण ऐकून अनेकांना प्रश्न पडला होता की, आपण यांना यापूर्वी कोणत्या सांस-बहू मालिकेत पाहिले होते? त्यांचा तसा मालिकांशी संबंध आहे, परंतु तो दूरचित्रवाणीवरील साबू मालिकांशी नव्हे, तर क्रिकेटच्या मालिकांशी. ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आहेत. भारतातील असंख्य राष्ट्रभक्तांसाठी अडचणीची बाब ठरली आहे ती हीच. म्हणजे भाजपचे सदस्य असल्याने आपसूकच राष्ट्रभक्त ठरलेल्या ठाकूर अनुरागांचे आपण ऐकायचे की बीसीसीआयचे सचिव असलेल्या अनुराग ठाकूर यांचे ऐकायचे? राष्ट्रभक्त अनुराग म्हणतात की, ‘दाऊद पाकिस्तानात आहे. (पाकचे) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार येथील अलगतावाद्यांना भेटू इच्छितात आणि (तरीही) तुम्हाला (म्हणजे पाकिस्तानला) वाटते की, आम्ही तुमच्यासोबत क्रिकेट खेळावे?’ असे ट्वीटच त्यांनी गत वर्षी २२ ऑगस्ट रोजी केले होते. अनुरागांचा हा राग-दरबारी पाहून कित्येकांच्या छात्या ५६ इंचाच्या झाल्या होत्या. पण बीसीसीआयचे सचिव असलेल्या अनुरागांनी नेमकी त्या राष्ट्रवादाला टाचणी लावली. त्यांचे आताचे म्हणणे असे की, खेळावे की पाकिस्तानशी. आपण देशाबाहेर नाही का त्यांच्याशी खेळत? मग इथे खेळायला काय हरकत आहे? भैयाजींचे हेही म्हणणे बरोबरच आहे. पण मग त्या दाऊदचे काय? पठाणकोटचे काय? ही पंचाईतच झाली. अशीच पंचाईत केली ती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांनी. भारत-पाक सामना हिमाचलातील धरमशाला येथे ठरला. पण तेथे सामना झाल्यास शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावतील, असे भावनिक कारण देत वीरभद्रांनी सामन्यास सुरक्षा देण्यास आपण असमर्थ असल्याचे सांगितले. त्यांचेही बरोबरच आहे. मागे कारगिल युद्धानंतर झालेल्या भारत-पाक सामन्याला हेच महनीय वीरभद्र प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा राष्ट्रवादाची व्याख्या वेगळी होती. आता त्या व्याख्येवर अनुपम खेर, पंडिता स्मृती इराणी यांच्यासारख्या असंख्य विचारवंतांनी काम केले आहे. त्या व्याख्येला धरूनच वीरभद्र यांचा निर्णय आहे. बरोबर चार वर्षांपूर्वी पंडिता इराणी यांनीही हेच म्हटले होते. महाराष्ट्र भाजपने तर १९ जुलै २०१२ रोजी भारत-पाक क्रिकेट सामने सुरू करणे हा हुतात्म्यांचा अपमान असल्याचे ट्वीट केले होते. अशा परिस्थितीत करायचे तरी काय? सामना रद्द करायचा? त्याऐवजी सामन्याचे ठिकाण हलविण्यात आले. आता तो कोलकात्याला होणार आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट रसिकांना प्रश्न असा पडला आहे की, या सामन्याला विरोध करून राष्ट्रवाद जागवायचा – जसा तो गुलाम अलींच्या कार्यक्रमाला विरोध करून जागविला होता – की सामन्याचा आनंद लुटून राष्ट्रद्रोही ठरायचे? फारच अवघड प्रश्न आहे. पण खेळ, कला, संगीत यांचाही आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीशी संबंध असू शकतो हा साधा विवेक सोडला की असे सवाल येतच राहणार. त्याला नाइलाज आहे.

Story img Loader