नॅशनल पार्कच्या पायथ्याशी एका सोसायटीच्या गच्चीवर तो शांतपणे संध्याकाळची हवा खात बसला होता. तेवढय़ात त्याचे लक्ष समोरच्या बिल्डिंगमधील एका खिडकीकडे गेले. एक आजी नातवाला कडेवर घेऊन त्याच्याकडेच बोट दाखवत होती. त्याला राग आला. त्याने नाखुशीनेच खांद्याखाली खाजविले. शेपूट उंचावून कंबर वाकडीतिकडी केली. कानही टवकारले. आजी नातवाला त्याचीच गोष्ट सांगत होती. इथे माणसांची वस्ती सुरू झाल्यापासून हजार वेळा त्याने ती गोष्ट ऐकली होती. त्या टोपीविक्या माणसाने माकडांना कशी टोपी घातली, त्याची गोष्ट! तो वैतागला. शेपटी उंचावून त्याने ‘हुपारा’ केला, आणि दणादण छपरावरून उडय़ा मारत त्याने जंगल गाठले. त्याचा नूर बघून टोळीतले सारे जण त्याच्याभोवती जमले. तो अजूनही चिडलेलाच होता. ‘कधीकाळी यांच्यातल्या एका माणसाने आपल्या पूर्वजांना टोप्या घातल्या, त्याची गोष्ट ते अजूनही पुढच्या पिढय़ांना सांगतायत.. बस्स झाले. आता आपण ऐकून घ्यायचे नाही. आता माणसाला टोप्या घालायच्या.. ही माणसे आपली कोणीही नाहीत.’ आपण त्यांचे पूर्वज नाही, हे सत्यपालबाबांनी सांगितल्यापासून त्यांना त्या माणसाविषयी कमालीचे प्रेम वाटू लागले होते. ‘एकदा तरी हा बाबा मुंबईत येईल तेव्हा त्याला भेटून त्याचे आभार मानायचे आणि माणसाला टोपी घालायचीच’.. फांदीवर मूठ आपटून तो जोरात म्हणाला, आणि टोळीतील सर्वानी कलकलाट केला. मग त्यांची बैठक सुरू झाली. पण यासाठी नीट आखणी करायला हवी.. तो जोशात म्हणाला, आणि टोळीतल्या म्हाताऱ्याने इशारा केला. बरीच वर्षे मुंबईत राहून त्याने भरपूर भटकंती केली होती. त्याला आख्खी मुंबई माहीत आहे, त्यामुळे तो काय सांगतो याकडे साऱ्यांचे कान लागले. म्हातारा बोलू लागला, ‘ही दोन्ही कामे करायची असतील तर तुम्हाला तिकडे, दक्षिण मुंबईकडे जावे लागेल. सत्यपालबाबा मुंबईत आला की तो तिकडेच उतरेल, आणि टोपीवाली माणसंही तिकडेच वावरतात.. सगळे पांढऱ्या टोप्या वापरतात. मंत्रालयाच्या आसपास, आमदार निवासाच्या आवारात टोपीवाली माणसं असतात. तिकडे जा. तुम्हाला माणसाच्या नात्यातून मुक्त करणारा सत्यपालबाबा कधीतरी तिकडे मंत्रालयात, राजभवनात कुठेतरी, कधीतरी नक्की भेटेल. तोवर धीर धरा. तिकडेच राहा. नवी घरे शोधा. तिकडेही तुम्हाला इथल्यासारखाच अनुभव येईल. येत्या काही दिवसांत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होईल. मग टोप्याच टोप्या.. तुम्ही सगळ्यांनी मिळून डाव  नीट आखलात, तर टोप्या लांबविणे अवघड नाही!’ ..एवढे बोलून म्हातारा थांबला. बऱ्याच दिवसांनी खूप बोलल्यामुळे त्याला काहीसा थकवा आला होता. हुप्प्याने त्याच्या पाठीवरून हात फिरविला, इकडेतिकडे पाहून शेपटी उंचावली, आणि त्याचा आवाज आसपासच्या परिसरात घुमला. बघताबघता टोळी एकत्र   आली. सारे झाडावर जमा झाले. सर्वानी खांद्याखाली मनसोक्त खाजवून घेतले, आणि टोळीने कूच केले. मजल दरमजल करीत टोळी दक्षिण मुंबईत पोहोचली. काही जण कुलाब्यात थांबले, काहींनी आमदार निवासाशेजारच्या झाडावर मुक्काम ठोकला. काही जण मंत्रालयाच्या आसपास वावरू लागले. काहींना राजभवनाचा परिसर आवडला..  आता ते सारे जण सत्यपालबाबाची वाट पाहातायत आणि टोपीवाल्या माणसांना हेरतायत, असे कळते!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा