मुंबईच्या शिरपेचात अखेर तो मानाचा तुरा खोवला गेला. प्रत्येक शहराकडे आपले स्वत:चे असे, अभिमानाने सांगता यावे असे वैशिष्टय़ असते. मुंबईकडेही काही तरी दाखविण्यासारखे आहे, हे आता जगाला कळले आहे. ही बातमी कालपरवा जेव्हा माध्यमांनीच उभ्या जगाला कळविली, तेव्हा साहजिकच प्रत्येकाच्या मनातील उत्सुकता उसळून उठली असेल यात शंका नाही. अनेक प्रश्न प्रत्येकाच्याच मनात उमटलेही असतील. त्याची उत्तरे काल मिळाली. गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून या बातमीकडे तमाम मुंबईच्या नजरा लागल्या होत्या. ‘खरोखरच हा मान मुंबईला मिळणार का’ यावर चर्चाही झडू लागल्या होत्या. मग मुंबईच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला जावा यासाठी अनेकांनी हातभार लावला. मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डय़ांच्या संख्येने जागतिक विक्रम प्रस्थापित करावा म्हणून, असे जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या लिम्का, गिनीजसारख्या संस्थांकडे एका राजकीय पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने पाठपुरावा सुरू केला. सुरुवातीस काही काळ यश आले नाही. पण या विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. मुंबईच्या रस्त्यारस्त्यावरील खड्डय़ाची गणती करून त्याची एका जालनिशीवर नोंद करण्याचे प्रयत्न जारी ठेवले. मुंबईकरांनीही त्या कामी हातभार लावला आणि विक्रम प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्येच्या जवळपास पोहोचण्यासाठी, मुंबईच्या रस्त्यांवरील एक एक खड्डा आपली हजेरी येथे नोंदवू लागला. रस्त्यावरील खड्डय़ांच्या संख्येचा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यासाठी २७ हजार ३६३ खड्डय़ांची संख्या ओलांडली पाहिजे, हे गेल्या ऑगस्टमध्येच निश्चित झालेले होते. मग न थकता, विक्रमाच्या ध्यासाने पछाडलेल्या या कार्यकर्त्यांने नव्या नोंदींसाठी रस्ते, गल्ल्या पालथ्या घातल्या. चिकाटीने जालनिशीवर त्याच्या नोंदी करत राहिला. अखेर विक्रमाचा आकडा गाठण्याची ती वेळ आली आणि मुंबईला सुवर्णपदक मिळाले. ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डय़ांचा हा जागतिक विक्रम अखेर मान्य केला.. आजवर प्रत्येक मुंबईकर रस्त्यांवरील प्रत्येक खड्डय़ानिशी बसणाऱ्या हादऱ्यासोबत प्रशासनाचा उद्धार करत होता. पण त्याच खड्डय़ांनी एका जागतिक विक्रमाच्या यादीत मुंबईला आपले नाव कोरण्याची संधी मिळवून दिली आहे, हे पाहता, ‘खड्डे चांगले आहेत’, असेच म्हणावे लागेल. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर करण्याची स्वप्ने मुंबईकरांनी याआधी अनेकदा पाहिली. ‘मुंबईचे शांघाय करू’, असेही अनेकांनी अनेकदा सांगितले, तेव्हा खड्डेमुक्त रस्त्यांच्या कल्पनेने मुंबईकर हरखूनही गेला होता. पण तसे झाले नाही हे बरेच झाले असेच आता म्हणावे लागेल. कल्पना करा, मुंबई खरोखरीच जागतिक दर्जाचे शहर झाले असते, किंवा खरोखरीच मुंबईचे शांघाय होऊन गेले असते, तर जागतिक विक्रमाची ही अनोखी संधी मुंबईच्या नशिबी आली असती का? तुम्हाला पटो अथवा न पटो.. शेवटी ललाटरेषेवर जे काही अदृश्य भाग्ययोग लिहिलेले असतात, ते टाळता येतच नसतात. आता खड्डय़ांचा जागतिक विक्रम झाला आहे. आता मुंबईचे शांघाय होवो, नाही तर जागतिक दर्जाचे शहर होवो.. शिरपेचावरचा हा मानाचा तुरा कोणीही हिरावून घेऊ शकणारच नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा