भारताने दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेत कमावलेल्या ३०८ पदकांबद्दल (त्यात तब्बल १८८ सुवर्णपदके आहेत राजे हो! आहात कुठे?) आपण आपली पाठ थोपटून घेतलीच पाहिजे. अखेर ‘दक्षिण आशियाचा दादा कोण’ या प्रश्नाचे सणसणीत उत्तर आपण या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिलेले आहे. आता भूगोलातील एखादा कच्चा भिडू विचारील की या दक्षिण आशियात कोणकोणते देश येतात. तर त्यात भारत येतो. भारताचा ‘जानी दुश्मन’ पाकिस्तान येतो. शिवाय बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, नेपाळ, मालदीव, भूतान हे देशही आहेत. या सर्व देशांमध्ये भारताने एवढी देदीप्यमान कामगिरी केली आहे की त्या आनंदाने आपले राष्ट्रप्रेमी मन वा देशभक्त छाती भरूनच यावी. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. अगदी आकडेवारीच्या भावनाशून्य भाषेत बोलायचे झाले तरी, मालदीवच्या तब्बल शंभरपट पदके आपण मिळविलेली आहेत. आता यावर कोणी अखिलाडू संशयात्मा म्हणेल, की भूतान, नेपाळ, मालदीव यांसारख्या देशांबरोबरची ही स्पर्धा म्हणजे अगदी लुटुपुटुचा सामना. त्यात भारताने यश मिळविले तर त्यात एवढे ढोल बडविण्याचे काय कारण? आजकाल भारतात अशा राष्ट्रद्रोह्य़ांची संख्या जरा जास्तच वाढली आहे. येथे अगदी वकिली पद्धतीने त्यांचा समाचार घेता येईल. परंतु सध्या तो मुद्दा नाही. मुद्दा भारताच्या यशाचा आहे आणि त्याचे श्रेय हे स्वाभाविकच आपले परमखिलाडू केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांना आहे. या स्पर्धेत आपले खेळाडू खेळले, पदके त्यांनी मिळविली हे खरे असले, तरी सांघिक विचार करता या सोन्यासारख्या यशाचे शिल्पकार सोनोवाल हेच आहेत. एरवी या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेची पत्रास ती काय? आजवरचा रिवाज असा, की या स्पर्धेत सहसा प्रथम दर्जाचे खेळाडू पाठविले जात नसत. तेथे दुय्यम कामगिरी केलेले खेळाडू पाठविले जात. हेतू हा की, प्रथम दर्जाचे खेळाडू मोठय़ा स्पर्धामध्ये पात्र ठरून उतरत असतात. तर या उरलेल्या खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव मिळावा. अशा स्पर्धेतील यशानंतर त्यांना राज्य सरकारे नोकऱ्या वगैरे देत असतात. तेव्हा त्यांचेही कल्याण व्हावे. पण या वेळी सोनोवालसाहेबांनी ठरविले की ही स्पर्धा यशस्वी करायचीच. हे सोनोवाल म्हणजे कोण ते लक्षात आले ना? ते आसाममधील भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. आता यात कोणी राजकारण शोधू नये, परंतु गुवाहाटीतील या स्पर्धेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताला सुवर्णयश मिळावे हीच त्यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी या स्पर्धेत सर्वसाधारणत: प्रथम दर्जाच्या खेळाडूंना आग्रहाने उतरविले. काहींच्या मते त्यामुळे या खेळाडूंना सरावाचाही लाभ झाला नाही. त्यासाठीही खेळाडू लागतात ते तुल्यबळ. ते काहीही असो. या स्पर्धेतील वासरांत आपली लंगडी गाय जी शहाणी ठरली त्याबद्दल आपण आपली पाठ थोपटलीच पाहिजे.