चष्मा सुलटा करा किंवा उलटा.. चष्मा काळा असो की पारदर्शक.. चष्मा नाणावलेल्या कलासमीक्षकाचा असो की ‘आम्हाला नायबॉ चित्राबित्रातलं कळत’ असे म्हणणाऱ्यांचा.. युरोपीय अभिजात कलेतील नग्नचित्रे कधी कपडे घातलेली दिसणार नाहीत. ती दिसतात, तेव्हा मानवी देहाचे सारे सौष्ठव चौदाव्या-पंधराव्या शतकापासूनच्या कलेची अभिजात मूल्ये लेवून आपल्यासमोर उभे ठाकते. नग्नदेहाचे अंतर्बाह्य़ सौष्ठव दाखवण्याची भारतीय परंपरा जशी खजुराहोत दिसते, तशी या देहाचे यथातथ्य- किंबहुना स्नायुसौष्ठवाला काहीसे अधिकच महत्त्व देणारे- शिल्पसौंदर्य साकारण्याची परंपरा इटलीत दिसते. मायकलँजेलो, लिओनादरे हे दृश्यकलावंत १४९५ वगैरे सालात ज्या कलाकृती घडवीत होते, त्या आजही पाश्चात्त्य कलेचे मापदंडच ठरतात. सततच्या अभ्यासाने तसेच परंपरा म्हणून कुरवाळत न बसता नावीन्य हुडकण्याचा ध्यास या परंपरेच्या पाईकांनी कायम ठेवल्याने केवळ पाश्चात्त्यांचीच कलापरंपरा आजही जिवंत आणि जगभर पोहोचलेली ठरते, हे आपापल्या परंपरांचा कितीही अभिमान बाळगला तरीही नाकारता न येणारे वास्तव आहे. एखाद्या कलासमीक्षकाप्रमाणे एवढे सारे उलटय़ा चष्म्यातून पाहण्याचे कारण एरवी सापडले नसते.. पण इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांनी ते दिले. हे रूहानी परवाच इटलीत होते. इराण हा अगदी गेल्या महिन्याभरापर्यंत अमेरिकाधार्जिण्या पाश्चात्त्य देशांनी वाळीतच टाकलेला देश होता. अणुकराराचे गोमूत्र शिंपडून एकेका देशाला पावन करून घेणाऱ्या अमेरिकेने इराणशीही असा करार केला तेव्हा इराणशी व्यापारउदीम वाढवण्यासाठी पहिल्या उडय़ा घेतल्या त्या इटली आणि फ्रान्सने. फ्रान्स कुणाशीही गोड बोलू शकतो आणि व्यापारी फायद्यासाठी परक्या देशातील कुठल्याही नेत्याचे कितीही वाभरेपण फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद हे सहन करीत असतात, याचे प्रत्यंतर गुरुवारी घडणार असलेल्या रूहानी-ओलां भेटीच्या वेळी येऊ शकतेच; पण त्यापूर्वी रूहानी इटलीत असताना इटलीसारखा पाश्चात्त्य इतिहासाचा मेरुमणी देश रूहानींपुढे किती वाकला, हे रोममधल्या नग्नशिल्पांनी जगाला दाखवून दिले. रोमच्या संग्रहालयात असलेली ही नग्नशिल्पे रूहानींना दिसू नयेत, म्हणून चहूबाजूंनी झाकून टाकण्यात आली. या शिल्पांच्या फार तर डोक्यावरील केस तेवढे दिसतील इतकी लाकडी तटबंदीच त्यांच्या चहूबाजूंनी उभारण्यात आली आणि मगच रूहानींचे या वस्तुसंग्रहालयात स्वागत झाले. का? तर आधी रोममध्ये रूहानींसोबतच्या अधिकाऱ्यांनी मार्क्स ऑरेलियसचा अश्वारूढ पुतळा पाहिला तेव्हा अश्वाची जननेंद्रियेदेखील दाखवणे हे आमच्या देशात पसंत नसते, असे निरोप त्यांनी इटलीच्या राजनैतिक गोटात पोहोचवले. इराणशी तब्बल १७ अब्ज युरोंचे व्यापारी करार होणार असल्याने मग लगोलग, संबंधवृद्धीसाठी नग्नशिल्पांची झाकपाक करण्यात आली. संस्कृतीपेक्षा आमचा संबंध व्यापाराशीच, हे इटलीने दाखवून दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा