एखादे काम किंवा जबाबदारी शिरावर घेतल्यानंतर ती पार पाडण्यात यश येणार नाही आणि नराश्यच पदरी पडणार याची अगोदरच जाणीव असेल, तर अशी जबाबदारी घेण्यासाठी कुणी स्वत:हून धडपड करेल काय? पण अशी हमखास अपयशाची जबाबदारी स्वीकारणारी एक जिद्दी जमात अस्तित्वात आहे. एक वर्षांपुरती अध्यक्षपदाची झूल अंगावर चढवून वर्षभर भरपूर मिरवून घ्यावे, सत्कार सोहळ्यांचा सुखावणारा अनुभव घ्यावा, काही गुळगुळीत झालेले तेच तेच विचार पुन:पुन्हा लोकांच्या -म्हणजे रसिकांच्या- माथी मारण्यासाठी भरपूर प्रवास करावा आणि सत्काररूपाने मिळालेल्या शाल-श्रीफळांचे दान गरिबांना करून त्याचेही कौतुक करून घ्यावे एवढी हौस तरी पुरी करून घ्यायला काय हरकत आहे?.. हे काही नाटय़संहितेचे सार नाही. वास्तवच आहे. तरीही त्यामुळे नाटय़कर्मीच्या जीवनाला एका नाटय़मय वास्तवानुभवाची झूल चढतेच! शंभरीत पदार्पण केलेल्या मराठी नाटय़ संमेलनाला आता शतकानंतरच्या पहाटेची रम्य स्वप्ने पडू लागली आहेत. नाटक ही एक इंडस्ट्री आहे, हे आधी जाहीर करावे, म्हणजे आपोआपच नाटय़क्षेत्राला उद्योगाची झळाळी येईल, हे म्हणणे म्हणजे, आधी अंडे तयार करा, त्यातून कोंबडी जन्माला येईल अशा दुर्दम्य विश्वासाचेच द्योतक आहे. मराठी नाटय़सृष्टी हा सळसळत्या चतन्याचा झरा आहे, असे मानण्यासारखी परिस्थिती नसतानाही त्या झऱ्याची जेमतेम धार खळाळती ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे कौतुकच केले पाहिजे, पण अशाच काही ध्येयवेडय़ांच्या मनातील नराश्याचे सूर याच रंगभूमीच्या रंगमंचावर घुमू लागतात, तेव्हा हे सूर मुखवटय़ांच्या मुखातील की खऱ्या चेहऱ्यांचे, असा प्रश्नही पडतो. नाटय़ संमेलने हा नाटय़परंपरेचा वार्षकि सोहळा. त्या सोहळ्यामुळे नाटय़क्षेत्राच्या झळाळीचे पदर दोन-तीन दिवसांपुरते का होईना, झगमगीतपणे रसिकांसमोर उलगडत असतात. अशा वेळी संमेलनाच्या झगमगत्या मंचावर मात्र, निराशेच्या सुरांचाच सप्तक का लावला जातो? नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद हा उत्सवातील गणपतीसारखा औपचारिक प्रकार आहे, वर्षभराच्या कारकीर्दीत काहीच करता येत नाही, असा खंतावलेला सूर संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा फय्याज यांनी लावल्यानंतर त्याच सुरात अनेक सूर मिसळले गेले आणि त्यावर शिक्कामोर्तबही झाले. वर्षभराच्या काळात आपण काहीही करू शकणार नाही याची जाणीव असतानाही अध्यक्षपदाची झूल अंगावर घेण्यासाठी अनेकजण उत्सुक का असतात, नाटय़कर्मीच्या क्षेत्रात राजकारणे का उफाळतात, हे कोडे असले तरी त्याची उत्तरे शोधण्याची गरज नाही. संमेलनाध्यक्षपद ही शोभेची वस्तू आहे, हे अध्यक्षपदावरून पायउतार होतानाच जाणवते, की अध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कारकीर्दीत या वेदनादायी वास्तवाची जाणीव होऊन अध्यक्षपदाच्या भावनेवर नराश्याची झूल चढते, याचे मात्र उत्तर शोधले गेले पाहिजे. ते काहीही असले तरी पुढच्या संमेलनाध्यक्षपदासाठी पुन्हा तीच मोच्रेबांधणी सुरू होणार, हे ठरलेले असते. वास्तव जगण्यातला एक रंजक नाटय़ानुभव म्हणून तर तो खटाटोप नसेल?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा