साहित्य संमेलनस्थळी साप व बिबट्यांचा वावर असल्याने तिथे सहभागी होणाऱ्या निमंत्रितांनी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावयाची आहे.
१) साहित्यवर्तुळात सध्या बुशकोटची फॅशन लोकप्रिय ठरली आहे. अनेकदा हा पेहराव करताना रंगसंगती भडक होते. त्यामुळे बिबट्या बिथरू शकतो अशी सूचना वन खात्याने केल्याने येथे वावरताना पेहराव भडक असणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी.
२) कार्यक्रम सुरू असताना साप दिसला किंवा बिबट्या मांडवात शिरला तर विचलित न होता सादरीकरण करावे अथवा व्यक्त होत राहावे. घाबरून मंच सोडून पळून जाऊ नये. तसे झाल्यास साहित्यिक भेकड असा संदेश अकारण जाईल.
३) आम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोतच. तरीही परिस्थिती पाहता व्यक्त होताना ‘डरकाळी’, ‘फूत्कार’ असे शब्दप्रयोग टाळावेत.
४) आजकाल कवी संमेलनाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. मग वैतागलेले कवी संमेलनस्थळीच एखादा ‘कोपरा’ पकडून ‘कट्टा’ भरवतात. तसे करण्याला काहीही हरकत नाही. फक्त मांडवाच्या दक्षिण भागात हे करू नये कारण त्याच भागातून बिबट्याचे दर्शन वारंवार घडते आहे.
५) खबरदारीचा उपाय म्हणून या स्थळी चारही बाजूला पिंजरे ठेवलेले आहेत. बिबट्या अडकावा म्हणून त्यात शेळ्याही असणार आहेत. कृपया त्यांना कविता ऐकवू नयेत. मुक्या प्राण्यांचा मान ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे याचे भान ठेवावे.
६) अनुभवातून येणारी समृद्धी सकस साहित्यनिर्मितीसाठी पोषक असते हे आम्ही जाणतोच. त्यामुळे काहींना पिंजऱ्यात जाण्याची ऊर्मी दाटून येऊ शकते. तसा प्रयत्न कुणी करू नये. तसे केल्यास संबंधिताला लगेच वन खात्याच्या ताब्यात देण्यात येईल याची नोंद घ्यावी.
७) संमेलनस्थळी जागोजागी तैनात करण्यात आलेले सर्पमित्र व वन खात्याच्या कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे. ते आयोजक अथवा महामंडळाचे पदाधिकारी नाहीत याचे भान ठेवावे.
८) या स्थळी बिबट्या येण्याच्या वेळा मध्यरात्री दरम्यानच्या आहेत. त्यामुळे रात्री होणारे कवी संमेलन वेळेत उरकले जाईल याची खबरदारी सूत्रसंचालक व निमंत्रित कवींनी घ्यावी. उगीच लांबण लावू नये.
९) विचाराच्या तंद्रीत भान हरपून दूरवर फिरत जाण्याची सवय साहित्यिकांना असते. या परिसरात फिरताना असे भान हरपणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
१०) पिंजरे हे तुरुंगाचे प्रतीक तर साहित्यिकांची प्रतिभा मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी. त्यामुळे या पिंजऱ्यांना बघून प्रतिभा कुंठित होईल असा गैरसमज कुणी करून घेऊ नये.
११) पुस्तक प्रदर्शन असलेल्या भागाच्या मागेच शिवार आहे. तिथे बिबट्याचा वावर असतो. त्यामुळे प्रदर्शनात फिरताना दक्षता बाळगावी. फुकटात वाचायला मिळतात म्हणून तिथेच पुस्तक घेऊन ठिय्या मांडू नये व विक्रेता तसेच स्वत:चा जीव धोक्यात घालू नये.
१२) संमेलन काळात एखादा बिबट्या जेरबंद झालाच तर पिंजऱ्यासमोर उभे राहून छायाचित्रे काढण्याचा मोह आवरावा आणि साहित्यिक व सामान्यांमध्ये फरक आहे हे दर्शवून द्यावे.
१३) या काळात बिबट्याच्या हल्ल्यात एखादा निमंत्रित जखमी झालाच तर मोफत उपचार केले जातील व बरे झाल्यानंतर दुप्पट मानधनासह घरी सोडले जाईल.
तरी न घाबरता या संमेलनाला येऊन आमचा आनंद द्विगुणित करावा. – स्वागत समिती, नाशिक.