दोन-तीन महिने झाले असतील. बॉलीवूडचे ‘डायलॉग किंग’ कादर खान उपचारासाठी रामदेव बाबांच्या आश्रमात दाखल झाले, तेव्हा पतंजलीच्या प्रभावाने त्यांच्यावरही ‘नमोनामा’ची ‘जादू छा गयी’ की काय असे वाटू लागले होते; पण या जादूची छाया त्यांच्याकडे फिरकलीच नाही. गेल्या चार-पाच दशकांपासून, अमिताभपासून गोविंदापर्यंत अनेक कलाकारांना संवाद पुरवणारा हा अवलिया कलाकार एक वेदना सोबत घेऊनच वयाच्या ऐंशीव्या घरात पोहोचला. ‘हमे तो लगत है भगवान ने खाली पदा कर दिया है. तकदीर लिखना ही भूल गया’ हा कादर खानचा एक डायलॉग खूप गाजला होता. बॉलीवूडच्या विश्वात ‘कॉमेडी किंग’ ठरलेल्या कादर खानच्या कॉमेडीची एक करुण किनार साध्या चष्म्यातून दिसणारीच नव्हती. ती पाहण्यासाठी एक तर नेहमीचा चष्मा बाजूला ठेवावा लागतो किंवा कादर खानच्या चष्म्यातूनच जगण्याकडे पाहावे लागते. ‘दुख जब हमारी कहानी सुनता है तो खुद दुख को दुख होता ..’ असे तो पूर्वी कधी तरी एका सिनेमातील भूमिका वठवताना बोलून गेला होता. आज कादर खानच्या रसिकांना त्याच्या त्या संवादाची नक्की आठवण झाली असेल. आयुष्यात कधी कुणापुढे गोंडा घोळला असता, तर कदाचित एखाद्या पद्म पुरस्काराचा तुरा आपल्याही शिरावर चढला असता, असे कादर खानना का वाटले असावे, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याच चष्म्यातून अनुपम खेर यांना मिळालेल्या पद्मभूषण पुरस्काराकडे पाहिले पाहिजे. अनुपम खेर यांना मिळालेल्या पद्मभूषण पुरस्कारावरील कादर खानची प्रतिक्रिया हा त्यांच्या खोचक कॉमेडीचा आविष्कार नाही आणि त्यांचा निशाणा एकटय़ा अनुपम खेर यांच्यावरही नाही. पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांच्या गुणवत्तेवर त्यांनी ठेवलेले बोट बॉलीवूडच्या विश्वात घुसळण करणार यात आता शंका नाही. दिल्लीच्या नेत्यांचे गुणगान करणे हीच पद्म पुरस्कारासाठी पात्रतेची अट असते का, या सवालातून त्यांनी अनेक पद्मविजेत्यांच्या कामगिरीकडे त्यांच्या चष्म्यातून पाहावयास भाग पाडले आहे. पद्मभूषण मिळालेल्या अनुपम खेर यांनी अशी कोणती कामगिरी करून दाखविली या त्यांच्या एका सवालातून बाहेर पडलेला बाण पुरस्काराच्या अनेक मानकऱ्यांचा वेध घेत सुटला आहे. हा वाद कादर खान आणि अनुपम खेर यांच्यापुरता नाही. कादर खान यांचा डायलॉग कधीच एका बाणाने एकच एक वेध घेत नसे. त्यातून अनेकांची दांडी गुल होत असे. ‘कोट पँट पहन के खुद को राजकोट समझ रहे हो, लेकिन हमसे उलझोगे तो हम तुम्हें पठानकोट बना देंगे.. याद रखना’ असे बजावत पडद्यावरच्या दांडय़ा उडविणाऱ्या या कलाकाराचा निशाणा आज ऐंशीव्या वर्षीही पक्का आहे. कारण कधी तरी त्यानेच बजावून ठेवले होते, ‘हम नही तीर और तलवार से मरने वाले, कत्ल करना है तो एक तिरछी नजर काफी है!’.. म्हणूनच, अब आयेगा मजा!

Story img Loader