भक्त असावा तर इंदुवालु सुरेशसारखा! हा कर्नाटकातील काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि चि. राहुलबाबा यांच्यावर त्याची एवढी भक्ती की त्यापुढे नमोभक्तही फिके पडावेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात आपल्या या प्रिय नेत्यांना जामीन मिळावा याकरिता इंदुवालुने तिरुपती बालाजीला नवस केला होता. असे नवस तर काय सगळेच करतात. चार पसे असले की ते फेकून नवस पूर्णही करता येतात. पण इंदुवालुचा नवस असा साधासुधा नव्हता. तो होता थेट अवयवदानाचा. सोनिया, राहुलबाबा यांना जामीन मिळाला तर तिरुपतीला करंगळी वाहीन, अशी प्रतिज्ञा त्याने केली होती. नुकतीच त्याने ती पूर्ण केली. तिरुपतीच्या दानपेटीत त्याने आपली करंगळी अर्पण केली. तीही हजार रुपयांच्या नोटेत गुंडाळून. त्याची ही अगाढ भक्ती पाहून त्याच्यावर आकाशातून देवगंधर्वानी पुष्पवृष्टी केली की काय ते समजू शकले नाही. एक मात्र नक्की की खुद्द तिरुपतीलाही क्षणभर सोनिया आणि राहुलबाबा यांचा हेवा वाटला असेल. असे आधुनिक एकलव्य ज्या पक्षाकडे आहेत त्या   पक्षाचा ध्वज आचंद्रसूर्य फडकत राहणार यात शंका नाही. पण मुळात इंदुवालुसारख्या भक्तांना असे नवस करण्याची आवश्यकताच नाही. कारण त्यांनी आधीच आपले मस्तक, त्यातील उरल्यासुरल्या मेंदूसह आपल्या नेत्यांना अर्पण केलेले असते. या दृष्टीने त्यांची तुलना होऊ शकते ती दशाननाशीच. त्याने शंकराला आपली दहाही शिरकमले  स्वहस्ते अर्पण केली होती. अशा प्रकारे एकदा डोकेच काढून ठेवल्यानंतर करंगळीसारखा बिनवापरातला अवयव कापून दिला काय वा न दिला काय, त्याचे फार कौतुक करण्याचे कारण नाही. खरी मातब्बरी असते ती डोके काढून ठेवण्यामध्ये. दक्षिणेत एकुणातच अशी भक्तिपरंपरा थोर आहे. गेल्या फेब्रुवारीत जयललिता यांच्या एका भक्ताने त्या मुख्यमंत्री व्हाव्यात म्हणून, हातापायात खिळे ठोकून स्वत:ला क्रूसावर लटकवले होते. भक्तीचा हा जरा वेदनामयी प्रकार. तो सर्वानाच जमतो असे नाही. म्हणून तर थोरामोठय़ांनी डोळे झाकून डोके अर्पण करण्याचा मध्यम आणि सुलभ मार्ग सांगितला आहे. यामध्ये फार काही देहदंड घ्यावे लागत नाहीत. आपल्या नेत्याप्रती अपार निष्ठा ठेवायची. जगदोद्धारासाठीच त्याचा अवतार असा खिळा मस्तकी ठोकून घ्यायचा. रात्रीचा दिवस करून ट्विटर, फेसबुकवरून त्यांच्या आरत्या ओवाळायच्या आणि जमेल तसा विरोधकांना -मग तो पक्षातील असो की बाहेरचा- प्रसाद द्यायचा. अलीकडे आत्मपीडन करणाऱ्या भक्तांपेक्षा असे परपीडक भक्त वाढतच चालले आहेत हे आपल्या विकासाचेच लक्षण आहे. यातूनच अखेर लोकशाही बळकट होत असते. कधी कधी तर ती इतकी बळकट होते की तिच्यातच सामंतशाही, हुकूमशाही यांची लक्षणे दिसू लागतात. क्रांतीच ती एक प्रकारची. त्या गोवर्धनाला इंदुवालुसारख्या कानडय़ा भक्ताची करंगळी नक्कीच हातभार लावत असते. अशा भक्तांचा विजय असो.