समोरच्या तलावातील तरंग न्याहाळत लोकशाही हॉटेलच्या लॉबीमध्ये एकटीच बसली होती. पाच-सहा दिवसांपूर्वी कधी तरी सुरक्षा व्यवस्थेला चकवा देऊन विधान सौंधातून चौदा जणांसोबत बाहेर पडून थेट हॉटेलमध्ये दाखल झाल्यापासून लोकशाहीची बेचैनी वाढलीच होती. लपूनछपून राहण्याची सवयही नसल्याने आलिशान हॉटेलमध्येही ती अस्वस्थ होती. उद्या काय होणार तेही तिला कळत नव्हते. त्या चौदा जणांची मात्र सरबराई सुरू होती, हे पाहताना लोकशाहीला आनंदही झाला; पण लगेचच आपल्या एकाकीपणाच्या जाणिवेने तिने लांबलचक सुस्कारा सोडला. तेवढय़ात सोसाटय़ाचा वारा आला. ढगांची दाटी झाली, जोराचा पाऊस सुरू झाला. समोर काहीच दिसेनासे झाले. लोकशाहीला काळजी वाटू लागली. तेवढय़ात पाऊस थांबला. ढग येतात आणि जातात, पाऊसही थांबतो, आणि पुन्हा सारे स्वच्छ होते, हा तिचा अनुभव नवा नव्हता. तिने पुन्हा बाहेर पाहिले, अचानक पोलिसांची मोठी फौज आसपास पाहून लोकशाही घाबरून गेली. ते आपल्या रक्षणासाठी आहेत की आपल्याला त्यांच्यापासूनच धोका आहे, हेही तिला कळत नव्हते. पोलिसांच्या गराडय़ातील इसमास पाहताक्षणी लोकशाहीने त्याला ओळखले. सौंधात असताना त्या माणसाच्या दालनात होणारी गर्दी, त्याचा दबदबा आणि त्याची प्रतिमा सारे काही लोकशाहीस लख्ख आठवले, आणि हा माणून आपली सुटका करण्यासाठीच आला असणार याचीही तिला खात्री झाली. बाहेर त्याची पोलिसांशी हुज्जत सुरू होती. सारे त्राण कंठात आणून तिने त्याला हाकही मारली. ती काहीतरी बोलण्याचाही प्रयत्न करू लागली.. ‘डीके, डीके, मी इथे आहे!’.. पण मध्ये काचेची मोठी भिंत असल्याने लोकशाहीचा आवाज तिथवर पोहोचलाच नाही. पोलिसांच्या गराडय़ातील त्या इसमाकडे तिने हतबलपणे पाहिले. आपल्याला आत जाण्याचा हक्क आहे, असे काहीतरी तो इसम त्यांना बजावत असावा असेही तिला वाटले. मनात पुन्हा आशेचा अंकुर उमलला, आणि लोकशाहीची नजर हॉटेलमधील त्या चौदा जणांच्या खोल्यांकडे वळली. ते शांतपणे बाहेरचा नजारा न्याहाळत होते. काहीही झाले तरी हा इसम आत येऊ शकणार नाही, असा विश्वास त्यांच्या नजरेत दिसत होता. लोकशाहीला कळेना.. आपण सुरक्षित आहोत की संकटात आहोत, याचे तिला कोडे पडले. या जागेत आपल्या अस्तित्वाला अर्थ नाही, असेही तिला वाटून गेले. तोवर बाहेरचा खेळ संपला होता. त्या इसमास गाडीत कोंबून पोलिसांची ती गाडी शानदार गिरकी मारून निघूनही गेली होती. त्या चौदा जणांनी एकमेकांकडे पाहिले आणि दोन बोटेही उंचावली. लोकशाहीला वाटले, आपला विजय झाला.. तोवर गर्दीचा आणखी एक घोळका बाहेर गोळा झाला होता. ‘लोकशाहीला वाचवा’ असे कुणी तरी ओरडते आहे, असा भासही तिला झाला. आपण संकटातच आहोत असे तिला वाटू लागले. पण काही वेळ घोषणा देऊन घोळका निघून गेला, आणि लोकशाही पुन्हा एकाकी झाली. बसल्या जागेवरून तिने पुन्हा बाहेर पाहिले. समोरच्या अथांग तलावाच्या पाण्यात तरंग उमटतच होते. मग लोकशाहीने सुस्कारा सोडला आणि समोरचे सुंदर दृश्य पाहून ती स्वतशीच म्हणाली, ‘या देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे!’..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा