राजकीय रंगमंचावरील काही पात्रांची भूमिका पार पाडून झाल्यानंतर त्याच्या सेवेची पावती देण्याचे औदार्यही राजकारणातच दाखविले जाते, हे या क्षेत्राचे महानपण!.. इतर अनेक क्षेत्रांत, बिनकामाच्या माणसाला घरी बसावे लागते. राजकारणात तसे नसते. बिनकामाची माणसेही येथे प्रसंगानुरूप उपयोगी पडत असतात, त्यामुळे त्यांचा ‘सांभाळ’ केला जातो. काहींना राज्यपालपदी बसविले जाते. विरोधी पक्षांची सरकारे खिळखिळी करून राजकीय अस्थैर्य निर्माण करणे व त्यानंतर स्वपक्षाचा वरचष्मा निर्माण करणे या ‘राष्ट्रीय कर्तव्या’त या पदावर बसलेली बिनकामाची माणसे ‘कामाची’ भूमिका बजावतात, हे वेळोवेळी सिद्ध झाल्याने, हल्ली राज्यपालास कुणीच ‘रबरी शिक्का’ म्हणत नाही. उलट, राजकीय पुनर्वसनाची परतफेड म्हणून जोमाने काम करत राजनिष्ठा दाखवताना वयोमानाचा अडसरदेखील अनेकांच्या आड येत नाही. एखाद्याची राज्यपालपदी नियुक्ती झाली, की त्या व्यक्तीच्या इतिहासाची, राजकीय कर्तबगारीची आणि लागेबांध्यांचीही चर्चा होत असते. मग राज्ये आकाराने किती का लहान असेनात. अरुणाचलचे ज्योतिप्रसाद राजखोवा, मेघालयचे व्ही. षण्मुगनाथन किंवा गोव्याच्या मृदुला सिन्हा यांना ‘परिवारा’शी दीर्घ निष्ठेमुळे राज्यपालपदे मिळाली, ही चर्चा झालीच. या राज्यांहूनही कैकपटीने लहान- मुंबईपेक्षाही आकाराने लहान अशा अवघ्या ४२९ चौरस किलोमीटरचा भूभाग व्यापणाऱ्या- पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदावर नियुक्ती झालेल्या किरण बेदींनाही या साऱ्या सोपस्कारांना सामोरे जावे लागणार! गेल्या तीन वर्षांपासून सारे मानापमान गिळूनही ‘मोदीपंथा’शी एकनिष्ठता दाखविणाऱ्या बेदी यांना सनदी पोलीस अधिकारी म्हणून दिल्लीकरांनी डोक्यावर घेतले, पण राजकारणात मात्र दणकून आपटले. दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगल्यावर राजकीय अडगळीकडेच चाललेल्या बेदींना त्यांची तीन वर्षांची – म्हणजे पाव तपाचीच- तपश्चर्या कधी आणि कशी पावणार, एवढीच उत्सुकता साऱ्यांना होती. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता किरण बेदी यांच्या गळ्यात पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाची माळ अखेर पडली. कुणाला यात राजकीय पुनर्वसन दिसेल, तर कुणाला बेदी यांच्या कर्तबगारीची पावती मिळाल्याचे भासेल. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुद्दुचेरीत काँग्रेसला कौल मिळाल्यामुळे आता किरण बेदी यांना राज्यपाल म्हणून ‘कर्तबगारी’ दाखविण्याच्या कसोटीतून जावे लागणार आहे. अशा प्रसंगी पदावरील व्यक्तीने काय करायचे असते, ते इतिहासावरून शिकून घ्यावे लागेल. राजकारणात फारशा मुरलेल्या नसल्या, तरी निष्ठेच्या गुणामुळे त्या ते सारे जमवून आणतील असा श्रेष्ठींचा होरा असेल, तर बेदींना ते सिद्ध करावे लागेल. ‘म्हातारपणीच्या पुनर्वसनाची सोय’ किंवा ‘रबरी शिक्का’ म्हणावे एवढे आता राज्यपालपद सोपे राहिलेले नाही!
पाव तप पावले!
विरोधी पक्षांची सरकारे खिळखिळी करून राजकीय अस्थैर्य निर्माण करणे
Written by लोकसत्ता टीम
First published on: 24-05-2016 at 04:05 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran bedi selected as puducherry governor