सामथ्र्य असते चळवळीचे हे राजकीय पक्षांना वेगळे सांगावयास नको. त्यांची त्यावर हार्दिक श्रद्धा असते. त्यामुळेच ते सतत काही ना काही- उदाहरणार्थ रिक्षा जाळा, आपल्या अटकेतील प्रिय नेत्याच्या भुजांना बळ देण्यासाठी रस्ते अडवा अशा चळवळी करीत असतात. या चळवळींना भगवंताचे अधिष्ठान हवे की नको यावर मात्र चांगलेच मतभेद आहेत. उजव्यांच्या दृष्टीने चळवळीत देव, देश आणि धर्म हवाच. या तीन गोष्टी मते मिळवून देण्यास अत्यंत उपयुक्त असतात हा जगभरातील अनुभव आहे. ना उजवी, ना डावी अशी जी मधली मंडळी असतात त्यांचाही या अधिष्ठानाला तसा विरोध नसतो. थोडेसे लाजत, थोडेसे लपवत ते हे अधिष्ठान मिळवण्याचा प्रयत्न करीतच असतात. त्यांच्या या राजकीय तत्त्वज्ञानाला सेक्युलर असे नाव आहे. डाव्यांचे मात्र तसे अजिबात नसते. ते तसे आंतरराष्ट्रीयवादी. त्यामुळे देशाला माता वा पित्याच्या रूपात पाहणे त्यांना सक्त अमान्य. त्यांचा देव आणि धर्म या संकल्पनांना कडवा विरोध. म्हणजे डाव्यांच्या पोथ्यांमध्येच तसे लिहिलेले आहे. असे असताना परवा पश्चिम बंगालमधील काही डावी मंडळी चक्क एका दग्र्यात वगैरे गेली. त्याचे नाव फुरफुरा शरीफ. हे म्हणजे अगदीच अब्रह्मण्यम घडले. त्यामुळे अन्यांचे सोडा, पण आपल्याकडील आंग्ल माध्यमांच्या शेंडय़ांनाही झिणझिण्या आल्या. म्हणजे काँग्रेस, तृणमूलादी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक हंगामात या दग्र्यात जाऊन माथा टेकणे हा नेहमीचा भाग झाला. भाजपनेते तिकडे जाऊन आले तर तो केवळ भुवया उंचावण्याचा भाग झाला. पण डाव्यांनी तिकडे जाऊन मार्क्‍सबाबाशी द्रोह करावा? हा जो दर्गा आहे त्याचे संस्थापक सुफी हजरत अबुबक्र सिद्दिकी हे एक समाजसुधारक संत. पुढे फुरफुरा शरीफतर्फे अनेक समाजोपयोगी संस्था उभ्या करण्यात आल्या. आज हा दर्गा तेथील इस्लामी समाज-संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून तर सगळ्याच राजकीय पक्षांना त्याचे अधिष्ठान हवे असते. पण धर्म ही अफूची गोळी असते असे मानणाऱ्या डाव्यांनीही तेथे जाऊन अफूपान करावे हे जरा अतिच झाले. पण अन्य डावे आणि बंगाली डावे यांत एक फरक आहे. ही बंगाली डावेमोशाय मंडळी तशी दुर्गापूजेतही रमणारी. आता हे त्यांच्या डावेपणात कसे बसवायचे? की हे काही वेगळेच डावेपण आहे? हे डाव्या विचारांचे भारतीयीकरण तर नाही? धार्मिक महोत्सव हे अखेर समाजाच्या सांस्कृतिकतेचाच भाग असतात. त्या संस्कृतीपासून माणूस डावा झाला तरी कसा दूर राहू शकणार? समाजकारण करायचे तर समाजाच्या भावभावनांशी, हर्षवेदनांशी एकरूप व्हायलाच हवे. दुर्गोत्सवात सहभागी होणे, एखाद्या सुफी दग्र्यात जाणे यातून समाजाशी नाळ जुळवण्याचा प्रयत्न साम्यवादी करीत असतील, तर ते एका ऐतिहासिक चुकीचे परिमार्जनच म्हणायला हवे. मात्र हे जर निवडणुकीपुरतेच आणि मतदारांच्या अनुनयाचा भाग म्हणून झालेले उघडच दिसत असेल, तर त्याला अफूपानाखेरीज काय म्हणावे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा