बेंगळुरूमधले बिबटे बहुधा अशिक्षित असावेत, अन्यथा त्यांना शाळेत जावेसे वाटते ना! गेल्या काही वर्षांत हा प्राणी मानवी वस्तीत अनेकदा फिरायला येऊन गेला आहे. माणसांनी त्याच्या जगण्यावर केलेले आक्रमण परतवून लावण्याचे त्याचे हे अखेरचे प्रयत्न. पण शाळेत सगळ्या मुलांच्या आधीच जाऊन बसलेल्या या बिबटय़ाला जे ज्ञान हवे होते, ते शाळेत मिळेल, असे का बरे वाटले असेल? शहरांच्या रस्त्यांवर आणि निवासी परिसरात क्वचित प्रसंगी दिसणाऱ्या बिबटय़ांना जंगलातून शहरात का यावेसे वाटले, याचे कारणच मुळी कुणी समजावून घ्यायला तयार नाही. एके काळी बिबटय़ांची वस्ती असलेल्या जंगलांवर आक्रमणे करून आपली घरे बांधणाऱ्या माणसाने तिथे राहता राहता आपल्या जगण्यासाठी आणि सुखासाठी अनेकविध सुविधांची सोय केली. हे घडत असताना बिचारे बिबटे मात्र गपगुमान आकुंचित पावत असलेल्या जंगलात निघून गेले. हे आक्रमण थांबवायचे, तर त्यासाठी पुढाकार घेणार कोण? या शाळांमधून तर अतिक्रमणाच्या शिक्षणाचे बाळकडू मिळत नसेल ना, या कल्पनेने बिबटय़ाने तिथे जायचे ठरवले असेल, तर त्यात त्याची काय चूक? आपणही हे अतिक्रमणाचे तंत्र शिकून घेतले पाहिजे, असे त्याला वाटले असेल. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वीच तो दृष्टीस पडला नसता, तर कदाचित तो एखाद्या वर्गातही दिसला असता! माणसांच्या वस्तीत आलेला बिबटय़ा ही बातमी आता नवी राहिलेली नसली, तरीही तिच्याबद्दलचे पत्रकारांचे, विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आकर्षण काही कमी झालेले नाही. बेंगळुरूतली ही घटना कानावर येताच सर्वात आधी तिथे पोहोचले ते ‘पहले हम’ म्हणणारे वाहिनीवाले. बिबटय़ाचे काय होते, यापेक्षा आपल्या प्रेक्षकांना ते दाखवण्याचीच त्यांची धडपड अधिक. बिबटय़ाच्याही हे लक्षात आलेच असणार. त्याने लगेच हल्ला करून जायबंदी केले ते त्या वाहिनीवाल्या कॅमेरामनला. हे सारे घडत असताना, हा माणूस जखमी होत असताना त्याचेही चित्रीकरण करणारे तिथे हजर होतेच. बिबटय़ाचे असे येणे ही त्यामुळेच आता काळजीची बाब होऊ लागली आहे. माणसाने तर त्याबाबत यापुढे अधिक काळजीपूर्वकच राहायला हवे, असेही येणे सुचवते आहे. बिबटय़ा शाळेत जाऊन शिकला की नाही, यापेक्षा आपण काही ‘धडा’ घेतो की नाही, हे महत्त्वाचे.

 

Story img Loader