मध्य प्रदेशाच्या राजधानीत, भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सध्या नेमके काय चालले आहे? कालपरवा भोपाळमध्ये अचानक- काहीशा पवित्र अशा- धुराचे साम्राज्य पसरले. मंत्रोच्चार घुमू लागले आणि शेकडो साधू राजधानीत दाखल होऊन आपल्या अंगी कमावलेल्या कथित आध्यात्मिक शक्तीला आवाहन करू लागले. जनता अचंबित होऊन हा सारा प्रकार न्याहाळत होती. कोणी म्हणाले, ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातील आध्यात्मिक लढाई आहे, तर काहींना ही साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांच्यातील लढाई असल्याचे भासू लागले. ते खरेही होते, पण मध्य प्रदेशातील एक प्रसिद्ध राजकीय संत कॉम्प्युटरबाबा यांनी मात्र, ही धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे, असे ठासून सांगून टाकले. आता, अशा लढाईत धर्माची म्हणून जी एक बाजू असायला हवी, ती ‘भगवी’ असणार असाच कोणाचाही समज होण्याची शक्यता अधिक. साहजिकच, साध्वी प्रज्ञा या ‘भगवाधारी’ असल्यामुळे, आणि त्या भाजप या धर्मनिरपेक्ष नसलेल्या पक्षाच्या उमेदवार असल्याने त्यांची बाजू हीच धर्माची बाजू असणार, असेच कोणासही वाटू शकते. पण कॉम्प्युटरबाबा मात्र, काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यासाठी प्रचाराच्या मैदानात शड्डू ठोकून आणि आपली सारी धार्मिक, आध्यात्मिक आयुधे घेऊन साध्वीच्या शक्तीशी दोन हात करण्याच्या तयारीनिशी उतरलेले असल्याने, दिग्विजय सिंह यांचीच बाजू धर्माची आणि साध्वीची बाजू अधर्माची आहे, असे या बाबांना म्हणावयाचे आहे, हे स्पष्ट आहे. भाजप हा धर्माच्या नावावर मते मागणारा आणि धर्माच्या नावावर मतांचे ध्रुवीकरण करणारा पक्ष असल्याचा काँग्रेस व भाजपेतर राजकीय पक्षांचा नेहमीचाच आरोप असल्याने, काँग्रेसच्या विजयासाठी धर्माला साकडे घालण्याचा प्रश्नच येत नसला, तरी ती या पक्षाची राष्ट्रीय स्तरावरील भूमिका झाली. पण स्थानिक पातळीवर किंवा दिग्विजय सिंह यांच्या भोपाळ मतदारसंघापुरता विचार करताना, मतदारांच्या भावनांचा व प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या आव्हानास तोंड देऊ शकेल अशा उपायांचा विचार करावाच लागतो. त्यामुळेच दिग्विजय सिंह यांच्या विजयासाठी कॉम्प्युटरबाबांनी राज्यातील एक हजार साधूंचा मेळावा भरविला आणि भोपाळमध्ये महायज्ञाचे आयोजन करून आपल्या अंगीच्या हठयोगाचेही दर्शन घडविले. दिग्विजय सिंह यांच्या पाठीशी आता संतांची शक्ती उभी असल्याने एकटय़ा साध्वीच्या शक्तीचा त्यापुढे निभाव लागणार नाही- दिग्विजय सिंहांचा विजय निश्चित असेल, असा दावा करून कॉम्प्युटरबाबांनी यज्ञाच्या धुनीमध्ये विजयमंत्राची आहुती दिली, तेव्हा साहजिकच धर्माच्या नावावर मते मागणाऱ्या राजकारण्यांच्या नावाने खडे फोडणाऱ्या साऱ्या शक्ती शहारल्या असतील यात शंका नाही. कॉम्प्युटरबाबांच्या महायज्ञ आहुतीस साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या एका यज्ञयागाने प्रत्युत्तर दिले अशीही चर्चा आहे. त्यामुळे भोपाळ मतदारसंघाच्या मैदानात रंगलेल्या निवडणुकीच्या आखाडय़ातील लढाई ही आता केवळ साध्वी प्रज्ञा आणि दिग्विजय सिंह यांच्यातील लढाई राहिलेली नाही. ती कॉम्प्युटरबाबा व त्यांच्यासोबतच्या हजार साधूंच्या आध्यात्मिक शक्ती व साध्वीची आध्यात्मिक शक्ती यांच्यातील लढाई ठरली आहे. यामध्ये कॉम्प्युटरबाबांचा देव शक्तिशाली ठरतो की साध्वीचा देव बाजी मारतो याकडे आता भोपाळकरांचे लक्ष लागून राहणार आहे. काहीही झाले, तरी लोकांची कोणत्या तरी एका देवावरील श्रद्धा दृढ होईल व धर्मनिरपेक्षतेच्या विचाराची आहुती घेऊन विजययज्ञाची सांगता होईल, यात शंका नाही. त्यामुळे, लगे रहो..
‘विजय’यागाची सांगता..
कॉम्प्युटरबाबांनी यज्ञाच्या धुनीमध्ये विजयमंत्राची आहुती दिली
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-05-2019 at 01:08 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2019 computer baba campaign for digvijay singh in mp