आन्हिके आटोपून नमूतात्या झोपाळ्यावर बसले, तेवढय़ात ताजे वर्तमानपत्र काखोटीस मारून दादूअण्णा दाखल झाले. आता जुगलबंदी रंगणार हे चाळीतल्या संज्याने ओळखले आणि तोही नमूतात्यांच्या समोरच्या खुर्चीत बसला. दादूअण्णांनी थोडासा अदबीनेच नमूतात्यांना नमस्कार केला. नमूतात्या म्हणजे, पक्का भक्त आणि दादूअण्णा कट्टर विरोधक!.. कालपरवापर्यंत एकमेकांच्या पाठीमागे परस्परांवर पुरेपूर तोंडसुख घेण्यात दोघांनाही कमालीचा आनंद व्हायचा. दादूअण्णांनी तर एकदा नमूतात्यांना चाळकऱ्यांच्या मीटिंगमध्येच चोर म्हटले होते. हे कळल्यापासून नमूतात्या दादूअण्णाकडे खाऊ की गिळू नजरेने पाहात असत. आता दोघांचे कायमचे फाटले, असे चाळीत सगळेच म्हणायचे, पण ‘दादूअण्णाचं काही खरं नाही, दोघंही संधी पाहून एकमेकांच्या गळ्यात गळा घालतील आणि आपले मात्र दात घशात जातील,’ असेही काही जण बोलून दाखवायचे. अखेर तसेच झाले. काहीतरी निमित्त झालं आणि दादूअण्णांना कळून चुकलं. देव, देश आणि धर्माच्या विषयांवर आपली मते नमूतात्यांच्या मतांशी जुळू शकतात असे दादूअण्णांना वाटले. अलीकडे नमूतात्या याच विषयांवर पोटतिडकीने बोलू लागले आणि दादूअण्णा विरघळले. आज नमूतात्या चहा घेत असताना दादूअण्णा हळूच त्यांच्याकडे आले आणि त्यांनी प्रेमाने नमूतात्यांना नमस्कारही केला. त्यांनीही फारसे आढेवेढे न घेता दादूअण्णांना शेजारी बसण्याची खूण केली. दादूअण्णा बसले, तोवर समोर चहा आलाच होता. दादूअण्णा खुलले. चाय पे चर्चा सुरू झाली. दादूअण्णा आणि नमूतात्या एकमेकांशी कसली चर्चा करतात, याचे चाळीतल्या संज्याला जाम कुतूहल होते. तो नमूतात्यांच्या घरात घुसलाच.. समोरचे एक जुने वर्तमानपत्र गुंडाळून त्याने बूमसारखे दोघांसमोर धरले. आता संज्या एकाच वेळी दोघांची ‘रोखठोक’ मुलाखत घेणार होता. नमूतात्या म्हणजे त्यांच्या ‘घरघर नमू’ आहे, हे त्याला माहीत होते. अलीकडेच त्यांनी स्वत:च्या घरावरील नावाच्या पाटीवर ‘चौकीदार’ असा शब्द रंगवूनही घेतला होता. संज्याने बूमदादूअण्णांसमोर धरला. ‘अण्णा, तुम्ही नमूतात्यांसोबत चाय पे चर्चा करताय. तुम्हीही चौकीदार झालात का?’ संज्याने दादूअण्णासमोर एक खडा टाकला आणि चहाचा घोट घशातच अडकून दादूअण्णास ठसका लागला.. ‘चौकीदार?.. छे छे.. मी तर सैनिक आहे!’ दादूअण्णा सावरत म्हणाले आणि नमूतात्या कावरेबावरे झाले. ‘असे कसे?.. आपण सारे चौकीदार आहोत आता..’ झोपाळ्यावर मूठ आपटत नमूतात्या जोरात म्हणाले आणि संज्याने पुन्हा बूम दादूअण्णांसमोर धरला. ‘नाही.. मी सैनिकच’.. दादूअण्णा ठामपणे म्हणाले.. आता या मुद्दय़ावर दोघंही बाह्य़ा सरसावणार हे ओळखून संज्याने बूम मागे घेतला. काही मिनिटे दोघंही धुसफुसले. पुन्हा शांत झाले आणि संज्याने नमूतात्यांसमोर वर्तमानपत्राची गुंडाळी धरली. ‘तात्या, मंदिर वही बनायेंगे असं तुम्ही म्हणत होता. आता तरी होणार का मंदिर?’ काहीच उत्तर न देता नमूतात्यांनी दादूअण्णांकडे बोट दाखविले. ‘यांना विचार.. तुम्ही बांधत नसाल तर आम्ही बांधून देतो असे ते म्हणाले होते.. त्यांनी बांधलं काय आणि आम्ही बांधलं काय.. शेवटी मंदिर तर होणारच’.. ठेवणीतलं हसत दादूअण्णाकडे पाहात नमूतात्या म्हणाले आणि पानाचा डबा समोर ओढून भलामोठ्ठा विडा बनवून तोंडात कोंबला.
चाय पे चर्चा!
आता तरी होणार का मंदिर?’ काहीच उत्तर न देता नमूतात्यांनी दादूअण्णांकडे बोट दाखविले.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-04-2019 at 01:01 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2019 sanjay raut interview uddhav thackeray