सत्ता हे एक मोठे तळे असते आणि राजकारण हे एक जाळे असते. सत्तेच्या तळ्यात शेकडो लहानमोठे मासे संचार करत असतात. असे मासे एकदा राजकारणाच्या जाळ्यात अडकले की कितीही इच्छा असली, कितीही धडपड केली तरी त्यातून बाहेर पडता येत नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि संपुआ सरकारातील (माजी) गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची अवस्था सध्या राजकारणाच्या जाळ्यात गुरफटलेल्या मोठय़ा माशासारखी झाली आहे. तसे, सत्तेच्या तळ्यातले पाणी चाखताना कोणासही जी मौज वाटत असते तशीच मौज त्यांनाही तेव्हा वाटत असावी आणि तसे असल्यास वावगेही नाही. पण सत्तेबाहेर गेल्यावर एखाद्याची केवळ जाळ्यात अडकल्यागत गत होत असेल तर त्यातही काही वावगे नाही. सत्तेत नसल्याने बहुधा आता शिंदे यांना राजकारणाच्या जाळ्यातून बाहेर पडावेसे वाटू लागले असेल, तर हे त्याचेच एक उदाहरण आहे. खरे म्हणजे सत्ता असेल तर राजकारणाच्या जाळ्यात गुरफटून राहण्यातही मजाच असते. पाच वर्षांपूर्वी, संपुआची सत्ता जाणार असे शिंदे यांचा आतला आवाज त्यांना सुचवू लागला तेव्हाच त्यांना राजकारणाच्या जाळ्यात आपण उगीचच अडकून राहिलो आहोत असे वाटू लागले होते. सत्तेच्या तळ्यातून आणि राजकारणाच्या जाळ्यातून अलगद बाहेर पडावे आणि आपल्या शेतावरच्या घरात निवृत्तीनंतरचे आयुष्य मनसोक्त जगावे ही शिंदेंची इच्छा त्यांच्या पक्षाने पूर्ण होऊ दिली नाहीच. उलट त्यांना निवडणुकीत उतरवून राजकारणाच्या जाळ्यात असे काही गुरफटून टाकले, की बाहेर पडण्याचे मार्ग शोधूनही सापडू नयेत! अशी वेळ आली की एखादा कमकुवत मनाचा माणूस हताश होतो. त्याची उमेदच संपते आणि आपल्या इच्छेवर पाणी सोडून तो आपल्याच तळ्यात हतबलपणे हातपाय मारत राहतो. शिंदे यांनी मात्र, आपली निवृत्तीची उमेद जिवंत ठेवली. निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त व्हावे, शेतावरच्या घरात साहित्यिकांसोबत गप्पांचा फड जमवावा, संगीताच्या मैफिलीत रमावे हे स्वप्न शिंदे यांच्या मनात पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीआधीच रुंजी घालू लागले होते. तसे त्यांनी तेव्हाच जाहीरही केले होते. म्हणजे, त्या अर्थाने, पाच वर्षांपूर्वीची लोकसभा निवडणूक हीच त्यांच्यासाठीची शेवटची निवडणूक होती. कुठेतरी एक माशी शिंकली आणि शिंदे जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत तळ्यातच राहिले.

आता पुन्हा त्यांच्या उमेदीने उचल खाल्ली आहे. ‘ही आपली शेवटची निवडणूक’ असे त्यांनी आता पुन्हा एकदा जाहीरही केले आहे. शिंदे स्वत: ज्योतिषाचे अभ्यासक आहेत असे म्हणतात. पूर्वी, शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना ते पायउतार कधी होणार याचा अभ्यास करत कुंडली तपासणाऱ्या त्रिकुटातही ते असायचे असेही म्हणतात. त्यांचा भविष्याचा अभ्यास असेल तर निवृत्तीचे मनसुबे कधी फळाला येणार याचे काही आडाखे त्यांनीही बांधलेच असतील. त्यानुसार, ते निवडून आले तर पाच वर्षांनंतर आणि न आल्यास लगेचच, असे दोन निवृत्तीयोग त्यांच्या कुंडलीत संभवतात, असे जाणकार म्हणतात. पण पक्ष नावाच्या केतूने त्यांच्या नवमस्थानातून त्यांच्यावर अनुग्रह केला तरच हे शक्य आहे. अन्यथा, जाळ्यात राहून तळ्यात हातपाय हलवणे हा कायमस्वरूपी योग ठरलेलाच!!

Story img Loader