.. आता अगदी नेमकी संधी मिळाल्याच्या आविर्भावात सारे समाजमाध्यमवीर सपासप बोटे चालवून पुण्यावर तुटून पडतील, आणि पुणेकरांना लोकशाहीचा धर्म शिकविण्याची स्पर्धा सुरू होईल. फेसबुक, ट्विटरादी समाजमाध्यमांवर मतदानाच्या टक्केवारीवरून पुण्यास धारेवर धरण्यासाठी सारे कंबरा कसून सरसावतील. एरवी प्रत्येक मुद्दय़ावर हिरिरीने पुढे येऊन शंभर टक्के मते मांडणाऱ्या पुणेकरांनी निवडणुकीच्या मतदानात मात्र हात आखडता घेतला, म्हणून बोचरी नखे बाहेर काढून पुण्यास हिणविण्याचे प्रयोग सुरू होतील आणि पुणेकरांना सल्ले देण्यासाठी कुचेष्टेचे सारे सूर समाजमाध्यमांवर आळविण्यास सुरुवातही होईल. तसेच झाले! ‘दुपारी एक ते चार या वेळातही मतदान सुरू असते, ते फुकटही असते, त्यामुळे तेव्हाही मतदानास बाहेर पडल्यास अपमान होणार नाही’ असा सल्ला काही जणांनी देऊन पाहिला. खुद्द पुण्यातही, मतदानास प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या आकर्षक योजनांची जाहिरातबाजी सुरू झाली. मतदान केल्यास एका मिसळवर दुसरी मिसळ मोफत देण्याची कडक ऑफर जाहीर केली, तर कुणी मोफत आरोग्य तपासणीची आमिषेही दाखविली. खुद्द पुणेकरांचाच पुणेकरांवर विश्वास नाही, असे वाटावे अशीच ही परिस्थिती पुणेकरांनीच निर्माण केल्यावर बाहेरून कुचेष्टेचे सूर तेज होणारच! पण, मुळात पुणे ही विद्येची माहेरनगरी असल्याने मंगळवारचा मतदानानिमित्त अनायासे लाभलेला सुट्टीचा दिवस अनेकांनी ज्ञानसाधनेत व्यतीत केला. अर्थात, उर्वरित पुणेकरांस, म्हणजे, पेठेपलीकडील पुणेकरांस, जे बारामती वगैरेंसारख्या मतदारसंघात साहजिकपणे मोडतात, त्यांना याचे मुळी कौतुकच नसते, हेही या निमित्ताने स्पष्ट झाले. मंगळवारी नेमका जागतिक पुस्तक दिन असल्याने, त्या दिवशी पुस्तके वाचण्यापरते पुण्यकर्म नाही, हे पुणेकरांव्यतिरिक्त फारसे कोणास जाणवलेही नसावे. अशा वेळी, या मुहूर्ताचे सोने करण्यासाठी प्रत्येक घरातील दोन मतदारांपैकी एकाने मतदानास जावे व अन्य एकाने पुस्तकाचे वाचन करून पुस्तक दिन साजरा करावा, यास व्यावहारिकपणाएवढेच ज्ञानसाधनेच्या दृष्टीनेही तेवढेच महत्त्व नाही का?.. शिवाय, आम्हा पुणेकरांमध्ये एकाच घरांतील दोघांचे काही मुद्दय़ांवर एकमत असते, त्यामुळे निम्म्या लोकांनी मतदान करून प्रातिनिधिक स्वरूपात अन्य मतदारांच्या वतीने आपला मतदानाचा हक्क बजाविल्यास, मतदानाचे पुण्य पदरी पडते आणि पुस्तक दिनाचेही पालन होते, हे इतरांच्या पचनी पडणे काहीसे अवघडच आहे. जवळपास ५० टक्के पुणेकरांनी मतदान केले म्हणून आता खिल्ली उडविली जात असली, तरी ज्यास निवडून द्यायचे त्यासाठी असे प्रातिनिधिक मतदानही पुरेसे असते हे आमचे ठाम मत आहे. शिवाय, रांगेत तासन् तास ताटकळून शेवटी ‘नोटा’सारखा ‘सांगता येत नाही’ छापाचा पर्याय निवडणे पुणेकरांच्या रक्तातच नसल्याने कुटुंबामागे सरासरी एक या हिशेबाने केलेल्या मतदानातूनही आम्हास पाहिजे तो उमेदवार निवडून आणता येतो, हे आम्हास माहीत आहे. कारण, विचार करण्याची व त्यानुसार मते बनवून ती अमलात आणण्याची आमची परंपरा आहे आणि ही परंपरा हीच आमची पुण्याई आहे.
हीच खरी ‘पुण्याई’!
पुण्यातही, मतदानास प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या आकर्षक योजनांची जाहिरातबाजी सुरू झाली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 25-04-2019 at 02:58 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections 2019 pune records poor voter turnout