‘एकदा राजाचा दरबार भरलेला असतो. राज्यकारभारावरील चर्चा ऐकण्यासाठी काही सामान्य लोकही हजर असतात. चर्चा संपल्यावर राजाच्या इशाऱ्यावरून एक सैनिक घोडा घेऊन आत येतो. त्याला पाहताच राजा म्हणतो, ‘हा बैल किती सुंदर आहे’ हे ऐकताच एक तरुण धीटपणे, हा बैल नाही घोडा आहे असे सांगतो. राजा संतापतो व तरुणाला दहा फटके मारण्याचा हुकूम देतो. मार सहन केल्यावर राजा घोडय़ाकडे इशारा करत तरुणाला विचारतो, ‘आता सांग.’ मग तो तरुण मुकाटय़ाने म्हणतो, ‘महाराज हा बैल खरोखरच सुंदर आहे.’ हे ऐकताच जमलेले सारे त्या घोडय़ाची बैल म्हणून तारीफ करू लागतात. तात्पर्य हेच की, जे दिसते ते खोटे व जे दिसत नाही तेच खरे. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या.’ ही गोष्ट सांगून आजोबा नातवाला म्हणाले, ‘तुला या देशात सुरक्षितपणे जीवन जगायचे असेल तर हे कायम लक्षात ठेव. उगीच टीव्हीवरच्या चर्चा पाहून प्रश्न विचारू नको. या देशात रामराज्य आणणारे विश्वगुरू हेच सर्वात यशस्वी नेते. गरिबांचा विचार करणारे. कारण त्यांनी चहा विकला. त्यांची विकासाची संकल्पना विश्वव्यापी. चाणक्याची ही वाक्ये मनात रुजवताना तुला त्यांनी अचानक नोटाबंदी केली, त्यामुळे शेकडो लोक मेले, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो मजुरांना साथकाळात स्थलांतर करावे लागले, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडले असले प्रश्न पडायलाच नको. तू जे टीव्हीवर बघितलेस तो आभास होता, वास्तव नव्हते. तू जे काही पेपरात वाचलेस ते असत्यावर आधारलेले होते.’ त्यांना मध्ये थांबवत नातू म्हणाला, ‘अहो पण एकाच वेळी इतके सारे लोक खोटे कसे बोलतील’ हसत आजोबा म्हणाले, ‘पुन्हा तू प्रश्न विचारलास! ही सवय तोडायची असेल तर चाणक्यांना सतत फॉलो करत राहा. आता आठ दिवसांपूर्वीच त्यांनी सांगितले. विश्वगुरू हेच खरे लोकशाहीवादी. ते सर्वाशी बोलून निर्णय घेतात. निर्णय लादत नाहीत. ही वाक्ये मनात घोळवताना ते पत्रकार परिषद घेत नाहीत, त्यांच्या टीकाकारांवरच छापे घातले जातात, विरोधकांनाच जेलची हवा खावी लागते,  त्यांनी असहमतीच्या संस्कृतीला पूर्णविराम दिला असले मुद्दे डोक्यात यायला नकोत.’ हे ऐकून नातू उत्स्फूर्तपणे म्हणतो, ‘अहो पण इंग्रजीत एक वचन आहे, असहमतीच्या अस्तित्वाशिवाय लोकशाही अस्तित्वात राहू शकत नाही या अर्थाचे.’ त्याला थांबवत आजोबा सुरू होतात. ‘हे बघ, ते वचन आपल्या देशाला आता लागू होत नाही. सात वर्षांपूर्वीच आपण ते हद्दपार केले. याच काळात देशात खऱ्या लोकशाहीला सुरुवात झाली. चाणक्य म्हणाले त्याप्रमाणे आधी संकटात आलेली बहुपक्षीय पद्धत या सात वर्षांत ‘स्थिरावली’. ही वाक्ये आत्मसात करताना तुझ्या डोक्यात नानाविध विचार येतील. मग काँग्रेसमुक्त देश या घोषणेचे काय, निषेधाचा साधा सूरही उमटू दिला जात नाही, कुणी प्रयत्न केलाच तर त्याला देशद्रोही ठरवले जाते. सहासहा महिने एखादा प्रदेश बंद करून ठेवला जातो. असल्या प्रश्नार्थक विचारांना मनात अजिबात थारा देऊ नको. गेल्या सात वर्षांत देश सुजलाम् सुफलाम् झाला. विश्वगुरूंनी बहुतेक सारे प्रश्न सोडवलेले. महागाई कमी होऊन गरिबांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा झाला. चाणक्य जसे म्हणाले तसे लोकांना आता संविधानाचा खरा अर्थ कळू लागला आहे. जे दिसत नाही तेच खरे, या पद्धतीने विचार केलास तरच तू चांगला, राष्ट्रप्रेमी नागरिक होशील – तुझे जीवन सुखकर होईल.’ हे ऐकल्यावर नातू खूप वेळ विचार करून हळूच म्हणतो, ‘आजोबा, तुम्ही आजोबा नाही, नातू आहात’ हे ऐकताच आजोबा जोरात हसतात. ‘आता तुला खरे समजू लागले’ असे म्हणत टाळीसाठी हात समोर करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा