पिणारा वाईट, पाजणारा तर त्याहून वाईट व पिण्यासाठी आवश्यक असलेले मद्यरूपी तरल द्रव्य तयार करणारा तर आणखीच वाईट, या तीन प्रकारात विस्तारलेल्या ठाम (गैर/)समजुतीला तडा जाण्याचा सुदिन जवळ आला आहे. सत्संगाला दारूचा पैसा नको, साहित्योत्सवालाही तर नकोच नको असा (अ/)नैतिक आग्रह करणाऱ्यांच्या काळात दारूवाल्यांकडे आदराने बघण्याचे दिवस आले आहेत. करोनाच्या निमित्ताने अचानक लागलेल्या टाळेबंदीने समस्त देश तळीरामांचा तळतळाट अनुभवत असताना दारू उत्पादकांनी तयार के लेले सॅनिटायझर सध्या तणावात असलेल्या आरोग्य यंत्रणेला दिलासा देणारे ठरेल! सॅनिटायझरने हात स्वच्छ होतात हे वैज्ञानिक सत्य तर दारूमुळे मन आधी तरल व मग स्वच्छ होते ही तळीरामांची ठाम श्रद्धा. या दोहोंतही अल्कोहोल असते. या द्रव्याचा बहुविध उपयोग याआधीही अनेकांना ठाऊक होताच, पण आता साक्षात दारूवालेच सामाजिक बांधिलकीचा नारा देत प्रशासनाच्या मदतीला धावल्याने दारू या शब्दावरच अनैतिकतेचा शिक्का मारून मोकळे होणाऱ्या अनेक धुरिणांची चांगलीच पंचाईत झाली आहे. हा साथीचा आजार बळावण्याच्या आधी देशात दारूचा सुकाळ होता, पण सॅनिटायझरचा दुष्काळ आहे हे कु णाच्या गावीही नव्हते. तो दूर करण्याच्या राष्ट्रव्यापी योजनेत मदतीचा हातभार लावणारे अनेकजण असले तरी त्यात दारूवाल्यांनी उतरून नैतिक अनैतिकतेची सीमाच पुसून टाकली आहे हे एका अर्थाने बरेच झाले म्हणायचे. मुळात कु ठलाही व्यापार व त्यातून होणारे अर्थार्जन याकडे स्वच्छ नजरेने बघण्याची सवयच भारतीयांना नाही. हा धंदा वाईट, तो चांगला अशी वर्गवारी करण्यातच आपला समाज धन्यता मानत राहिला. त्यामुळे दारूचा धंदा वाईट व त्यातून येणारा पैसाही वाईट असा समज सर्वत्र रूढ झालेला. या समजाला छेद देण्याचे काम हे सॅनिटायझर करेल अशी आशा ठेवायला आता काही हरकत नसावी. अजून तरी कु णी या दारूवाल्यांच्या सॅनिटायझरवर आक्षेप घेतलेला दिसत नाही. अन्यथा हे औषध नको असा धोशा लावणारे काहीजण नक्कीच पुढे आले असते. संकटकाळी मदतीचा हात देणाऱ्याचा जात, धर्म, पंथ पाहायचा नसतो. आता त्यात व्यवसाय या शब्दाचाही समावेश करायला काही हरकत नाही. सध्याच्या जीएसटीच्या काळात पोटात रिचणाऱ्या आणि वाहनात टाकण्याच्या इंधनावरच अवलंबून असणाऱ्या राज्यसरकारने दारू उत्पादकांना या पद्धतीने कामाला लावून त्यांची प्रतिमा उजळण्यासाठी के लेला प्रयत्न स्तुत्य म्हणायला हवा. करोनाचे संकट टळल्यावर पुन: मद्यविक्री सुरू होईल तेव्हा ती कायमची बंद करा अशी मागणी करणाऱ्यांना या सामाजिक बांधिलकीचे स्मरण सरकारला सहज करून देता येईल. अर्थात तेव्हाही काही तज्ज्ञ करोनापेक्षा दारूमुळे जाणारे बळी जास्त अशी आकडेवारी मांडतीलच, पण त्याला फारशी साथ मिळणार नाही व त्याचे कारण या संकटकाळातील बांधिलकीत दडलेले असेल. शेवटी संकटकाळी के लेली मदतच भविष्यातील गुंतवणूक असते. सॅनिटायझर हात साफ करते म्हणतात, तसे दारूवाल्यांचेही का नाही होणार? तेव्हा तळीरामांनो जरा धीर धरा, कळ सोसा, आज जरी सॅनिटायझर हे हात साफ करण्यासाठी असले तरी भविष्यातील ‘आस्वादा’ची पायरी ती आहे..!
त्यांचेही हात साफ..
सॅनिटायझरने हात स्वच्छ होतात हे वैज्ञानिक सत्य तर दारूमुळे मन आधी तरल व मग स्वच्छ होते ही तळीरामांची ठाम श्रद्धा.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-04-2020 at 00:02 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma article on scientific fact that sanitizer cleans hands abn