अगदी कालपरवा समाजमाध्यमावर सहज फिरत असताना भूपेश बघेलांशी संबंधित एक पोष्ट दृष्टीस पडली. चित्रफीत व त्याखाली मजकूर बघून उत्सुकता चाळवली गेली. न राहवून चित्रफीत बघू लागलो तर काय आश्चर्य! छत्तीसगडचे हे मुख्यमंत्री एका सामान्य शेतकऱ्याच्या हातून चाबकाचे फटके खात उभे.. भलेही ते फटके गोवर्धन पूजेची परंपरा म्हणून मारले जात असले तरी ते मारणाऱ्या माणसाचा आम्हास हेवा वाटला. काय नशीब असते एकेकाचे. थेट सीएमलाच बडवण्याची संधी मिळालेल्या त्या कुणा विकास ठाकूरचा चेहरा डोळ्यांत नीट सामावून घेतल्यावर आम्ही मजकुराकडे वळालो. ‘राज्याच्या हितासाठी फटके खाणाऱ्या बघेलांचे अभिनंदन, राज्यप्रमुख हवा तर असा!’ हे वाचून आमच्या मनी प्रश्नांचे कोंब फुटू लागले. या परंपरेनुसार मार खाणाऱ्याचे विघ्न दूर होते असे वाचून होतो. याचा अर्थ आमदारांची दिल्लीवारी दोनदा वाया गेली असली तरी बघेलांचे विघ्न अजून दूर झाले नाही असे आम्हास कळून चुकले. फटक्याचा मथितार्थ कळल्यावर मजकुराखालच्या टिप्पण्या वाचू लागलो तर तिथे दोन गटांत युद्ध सुरू असल्याचे चित्र दिसले. ‘वळ सुकायला किती दिवस लागले’, ‘ठाकूर तुम्ही खरे सांगा, जोरात मारले की हळूहळू’, ‘संकट येताच माणसाला परंपरा आठवते’, ‘अशा प्रकारावर कायद्याने बंदी आणायला हवी’, ‘माइक लावला असता तर कण्हणे ऐकायला मिळाले असते, मग आणखी मजा!’, ‘थांबा, तुम्हाला लोक मतपेटीतून फटके लगावतील’, ‘आता का बरे लिबरल चूप बसलेत’, ‘स्वत:च्या अंगावर वळ उमटवून घेण्यापेक्षा विरोधकांच्या अंगावर उमटवा, दीदींसारखे’, ‘हा आत्मक्लेशच, याने आत्मबळ उजळून निघते’, ‘हा प्रकार म्हणजे प्रागतिक विचाराचा पराभवच’, ‘आता फटके खाण्याची पाळी राजा सिंगदेवांची’, ‘शर्टावरून जानवे घालणे काय आणि फटके काय, दोन्ही एकच’, ‘आमच्या बालोदला मंडई आहे. येता का फटके खायला, लोक तयार आहेत’, ‘मुख्यमंत्री असावा तर असा, राज्याचे विघ्न दूर व्हावे म्हणून स्वत: वेदना सहन करणारा’, ‘काँग्रेसही आता भाजपच्या मार्गावर’, ‘शाबास बघेलजी! निर्णय फसला तर चौकात फटके मारा असे पाच वर्षांपूर्वी सांगणारे ते कुठे गेले?’- हे सगळे वाचताना चांगलीच करमणूक झाली. बघेल यांच्या अधिकृत फेसबुक खात्यावर फटक्यांची ती चित्रफीत ‘आवडणारे’ १२ हजार जण आतापर्यंत झाले आहेत. मग कुतूहल म्हणून बघेलांचे ‘प्रिय’ सहकारी आणि छत्तीसगढचे सध्याचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांच्या फेसबुक भिंतीवर डोकावलो. तिथे तेही कदाचित हातावर मारून घेत असतील.. पण तसे काही तिथे दिसले नाही. स्थानिक परंपरांचा आदर सिंगदेवांना नाही की काय? की ते आता महाराष्ट्रातल्या नेत्यांची शिकवणी लावून, स्वत:वरील फटके चुकवण्यासाठी प्रतिस्पर्ध्यावर तोंडानेच फटकेबाजी करणार आहेत? असा विचार करीत असतानाच ‘विकास ठाकूर’ यांच्या फेसबुक खात्यावर पाहिले, तर तिथली नोंद- ‘ या परंपरेचा वापर करून साऱ्यांची विघ्ने दूर करण्याची जबाबदारी माझी नाही. त्यामुळे यापुढे राज्यातील मंत्र्यांनी व आमदारांनी कृपया माझ्याकडे गर्दी करू नये.’
विघ्ननाशक फटकेबाजी
छत्तीसगडचे हे मुख्यमंत्री एका सामान्य शेतकऱ्याच्या हातून चाबकाचे फटके खात उभे..
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-11-2021 at 01:52 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma chhattisgarh cm bhupesh baghel getting whipped by farmer zws