वृत्त निवेदिका- नमस्कार, ‘थेट भेट’ या लोकप्रिय कार्यक्रमात आपणा सर्वाचे स्वागत. गेल्या २४ तासांपासून राज्यात ‘सुखाची झोप’ हा विषय सर्वत्र चर्चिला जात आहे. इंदापूरच्या पाटलांनी यासंबंधीचे वक्तव्य केल्यावर राज्यभरातल्या भक्तांनी.. माफ करा प्रेक्षकांनी याविषयी सविस्तर ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचा मान ठेवत आम्ही थेट पाटील यांनाच आज निमंत्रित केले. आपल्या लोकप्रिय वाहिनीच्या माध्यमातून ते आता थेट तुमच्याशी संवाद साधणार आहेत. हं, बोला सर,
पाटील- नमस्कार, सुदृढ शरीरासाठी झोप आवश्यक असते हे तुम्ही जाणताच. माझ्या दिलखुलास व हसऱ्या स्वभावाचे रहस्यसुद्धा झोपेत दडले आहे. शांत व स्वस्थ झोपेचा वारसा माझ्या वाडवडिलांकडूनच मला मिळालेला आहे. मी अपक्ष म्हणून राजकारणात आलो तेव्हा मला झोपेचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्याच काळात राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हाही पलंगावर पडलो की माझे डोळे निद्रेच्या अधीन व्हायचे. युतीची ती पाच वर्षे मजेत गेली. नंतर माझ्या शेजारी असलेल्या बारामती परिसरातून मला त्रास व्हायला लागला. इतका की माझी झोपच उडाली. तेव्हा काय करावे हे सुचेना. अखेर काहींच्या सल्ल्याने मी राष्ट्रीय पक्षात गेलो. हा पक्ष तेव्हा महासागर होता. त्यामुळे इथे राहिल्याने समस्या सुटेल असे मला वाटायचे. या प्रवेशामुळे त्रासाची तीव्रता थोडी कमी झाली. मग मला थोडी झोप यायला लागली. तरी कधीकधी रात्री त्या बारामतीजवळच्या १५ गावांमधून फोन आला की दचकून जाग यायची. त्यामुळे घरी, बाहेर चिडचिड व्हायची. ती लोकांना दाखवायचीही सोय नव्हती कारण माझा हसरा स्वभाव! लोकसभेची निवडणूक जवळ आली की मला होणारा त्रास कमी व्हायचा आणि विधानसभेच्या वेळी तो प्रचंड प्रमाणात वाढायचा. त्यामुळे झोपमोड व्हायची. दोनदा हा प्रकार अनुभवल्यावर आता करायचे काय, असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला. सुखाने झोपता यावे म्हणून मी योगासने केली. दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा प्राणायाम सुरू केले. तरीही त्रास कमी होत नव्हता. निवडणूक जवळ आली की मी रात्रभर जागाच असायचो. मग एकदा सहज मुंबईला नागपूरच्या भाऊंना भेटलो. त्यांनी प्राथमिक उपचार म्हणून काही औषधे दिली. ती कोणती हे मी सांगणार नाही, पण त्यामुळे माझा त्रास थोडा कमी झाला. नंतर शेजारच्या आक्रमणामुळे त्या औषधाची मात्राही काम करेना. रोज काही ना काही त्रासिक गोष्टी कानावर आदळायच्याच. मग मी पुन्हा भाऊंकडे धाव घेतली. त्यांनी काही दिवस थांबा, औषध बदलून देतो असे सांगितले. हा काळ माझ्यासाठी कठीण होता. याच काळात मला बेदखल करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तेवढय़ात भाऊंचा फोन आला व त्यांनी मला पक्षप्रवेशाचा ‘अक्सीर इलाज’ सांगितला. या उपचारानंतर मला होणारा त्रास एकदम थांबला. मला मग रात्रीच काय दिवसासुद्धा झोप यायला लागली. भलेही माझा पराभव झाला, पण झोपेवर अजिबात परिणाम झाला नाही. मी हे गुपित कुणालाच सांगितले नव्हते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून आमच्या शेजाऱ्यांची झोप उडाल्याचे माझ्या कानावर आले. मग मी पुणे, कोल्हापूर, जरंडेश्वर फिरून आलो तर सारे दिवसरात्र जागेच असल्याचे मला दिसले. त्यानंतर मी हे झोपेचे रहस्य उघड करण्याचा निर्णय घेतला. झोपेचे मोल काय असते याची जाणीव सर्वाना यानिमित्ताने झाली याचा मला आनंद आहे. स्वस्थ झोपेसाठी मी घेतलेले उपचार कुणाला हवे असतील तर त्याने माझ्याशी संपर्क साधावा. नमस्कार! (नंतरची दोन मिनिटे वाहिनीचा पडदा नि:शब्द होतो. निवेदिकेलाच झोप लागल्यामुळे असे झाल्याचे प्रेक्षकांना सांगितले जात नाही).