प्रति, मा. संपादक, कृपया खालील पत्र आपल्या दैनिकातील ‘वाचकांचे मनोगत’मध्ये प्रसिद्ध करावे ही विनंती :
‘दारू दुकानांबाहेर लागणाऱ्या रांगेत सारेच समतावादी असतात’ अशा आशयाचे केरळ उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण नुकतेच वाचले. आम्ही काही मद्यप्रेमींनी संघटितपणे, आमच्या मंडळाच्या माध्यमातून याच मुद्दय़ावर काही वर्षांपासून जनप्रबोधन हाती घेतले आहे. प्रारंभी आमच्या या प्रयत्नांची खिल्ली उडवली गेली, आम्हाला वाळीत टाकण्याचे प्रयत्न झाले, पण आता न्यायालयाने यावर सविस्तर भाष्य केल्याने आमचा हुरूप वाढला आहे. विषमता नष्ट होऊन समता प्रस्थापित व्हावी यासाठी आजवर जगभरातल्या थोर सुधारकांनी अनेक प्रयत्न केले. लाखोंच्या संख्येत असलेल्या अनुयायांनी या विचाराची पालखी वाहिली तरी विषमता कायम राहिली. ती केवळ आणि केवळ दारूमुळे दूर होऊ शकते यावर आमचा ठाम विश्वास आहे. न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे ‘पिणारे’ कधीही अनुदान, आरक्षण या प्रश्नावर भांडणच काय टोकाची भूमिकासुद्धा घेत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी होणारे वाद, कलह, तंटा यांवर मद्यप्राशन करताना काढलेला तोडगा हा दीर्घकाळ टिकणारा असतो असा अनुभव मंडळाला काम करताना अनेकदा आला आहे. आज जगात गरीब व श्रीमंतांमधील दरी सातत्याने वाढतेय. ती कमी करायची असेल तर दारू हाच उपाय.. मद्यप्राशन करताना हा भेद आपसूकच गळून पडतो असा अनुभव अनेकांना येतो, पण याकडे कुणीही गांभीर्याने बघितलेले नाही. मद्यप्राशनानंतर होणारे वाद व भांडणाचे प्रकार किरकोळ किंवा कौटुंबिक असले तरी आजवर त्यालाच जास्त प्रसिद्धी मिळाली. सार्वत्रिक चित्र मात्र वेगळे आहे. दारूमुळे समता निर्माण होते याचा साक्षात्कार आपल्याकडे सर्वात आधी प्रतिभावंतांना झाला. गालिब ते ‘मधुशाला’कार हरिवंशराय बच्चन असा हा मद्यमहतीचा प्रवास. मात्र, समाजाने त्याकडे केवळ साहित्य म्हणून बघितले. या प्रतिभाविष्काराला वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न फारसा झाला नाही. आता न्यायालयानेच त्यावर परखड पण योग्य भाष्य केल्याने समाज याकडे गांभीर्याने बघेल अशी आशा मंडळाला वाटते.
आजही कार्पोरेट सेक्टरमध्ये कनिष्ठ-वरिष्ठ असा भेद मिटवण्यासाठी मद्यपानाचा आधार घेतला जातोच की नाही? यातून जी समानता निर्माण होते त्याचा फायदा व्यवसायवृद्धीतून दिसून येतो! काही जण अजूनही दारूबंदीची मागणी करतात. ती चुकीची आहे. गुजरातमध्ये ती बंदी नसती तरी तिथली सामाजिक विषमता कधीच कमी झाली असती. सामाजिक दुही व वादाचे प्रसंग टेबलावरच सुटले असते असे मंडळाला नेहमी वाटत आले आहे. आजही कौटुंबिक व सामाजिक पातळीवर दारूविषयी अनेक प्रवाद आहेत. पगार कमी असला तरी चालेल, पण मुलगा पिणारा नको अशी भूमिका वधुपिते घेत असतात. ते दूर करण्यासाठी मंडळाने सरकारच्या नशाबंदीला विरोध करतानाच प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम गेल्या काही वर्षांत राबवले आहेत. माफक प्रमाणात मद्यप्राशनाने सुसंवाद कायम राहतो, वाद टळतात अशीच मंडळाची भूमिका आहे. ‘शांत व संयमी’ समाज घडवायचा असेल तर दारू हेच त्यावरचे उत्तर. न्यायालयानेही हेच सूचित केल्याने मंडळाच्या समतावादी लढाईला मोठे बळ मिळाले आहे. त्यामुळे आता सरकारने ‘रांगा’ कमी करण्यासाठी दुकानांची संख्या त्वरित वाढवावी अशी मंडळाची मागणी आहे.
– तळीराम मद्यप्रेमी मंडळ, समतापूर ( दैनिकाच्या कार्यालयात हे पत्र सर्वानी वाचले, पण रात्री उशिरापर्यंत प्रसिद्धीचा निर्णय झाला नव्हता.)